कृषी महाराष्ट्र

Turmeric Market : अचानक हळदीचे भाव का वाढले ? आणि ते टिकतील का ? वाचा सविस्तर

Turmeric Market : अचानक हळदीचे भाव का वाढले ? आणि ते टिकतील का ? वाचा सविस्तर

Turmeric Market

Turmeric Bajarbhav : गेली दोन वर्षे मंदीत असलेल्या हळदीच्या दरात मागील १५ दिवसांमध्ये चांगली वाढ झाली. वायदे बाजारात हळदीने दीड वर्षानंतर ९ हजारांचा टप्पा पार केला. तर बाजार समित्यांमध्येही ७ हजारांच्या पुढे भाव गेले. तसेच हळदीच्या दरातील ही तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील बाजारात मागील १५ दिवसांमध्ये हळदीच्या भावात चांगली सुधारणा झाली. वायद्यांमध्ये झालेली सुधारणा जास्त होती. वायद्यांमध्ये मागील १० दिवसांमध्ये तब्बल २० ते २२ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती.

१३ जून रोजी हळदीचे वायदे ७ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटलवर होते. २३ जून रोजी, म्हणजेच शुक्रवारी वायदे ९ हजार ३०० रुपयांवर बंद झाले. गुरुवारी वायद्यांनी एकदा ९ हजार ६०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मागील दीड वर्षांत पहिल्यांदाच हळदीच्या वायद्यांनी ९ हजारांचा टप्पा गाठला.

वायद्यांमध्ये मोठी तेजी आली तरी प्रत्यक्ष बाजारांमध्ये मात्र हळदीला मिळणारा भाव यापेक्षा कमी आहे. हळदीचे व्यवहार सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयाने होत आहेत. बाजार समित्यांमध्येही मागील पंधरवड्यात हळदीच्या भावात एक हजार रुपयांची सुधारणा झाली. तर बाजारातील हळद आवकही कमी झाली आहे. यामुळे दराला आधार मिळाला.

उत्पादन निर्यातीची स्थिती काय ?

देशात चालू हंगामात १३ लाख टन हळद उत्पादन झाल्याचे भारतीय मसाला बोर्डाने म्हटले आहे. पण देशातून हळद निर्यातही चांगली सुरु झाली. त्यातच सध्या मालाची उपलब्धता कमी आहे.

त्यामुळे बाजारातील आवक जवळपास ५० टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल महिन्यात देशातून जवळपास २० हजार टनांची निर्यात झाली. मार्च महिन्याच्या तुलनेत ही निर्यात ४ टक्क्क्यांनी अधिक होती. तर एप्रिल २०२२ च्या तुलनेत ४२ टक्क्यांनी जास्त होती.

का वाढले भाव ?

चालू हंगामातील देशातील महत्वाच्या हळद उत्पादक भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही. म्हणजेच हळदीची लागवड १५ दिवस उशीरा होण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील दोन वर्षे हळद उत्पादकांना कमी भाव मिळाला. त्यातच यंदा पाऊस उशीरा सुरु होत असल्याने हळद लागवड कमी होण्याची शक्यता आहे.

यंदा महाराष्ट्रातील हळद लागवड १० ते २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूत १० ते १५ टक्के आणि आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील हळद लागवड क्षेत्र १८ ते २२ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे हळदीच्या भावात सुधारणा झाली. तसेच हळदीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

जागतिक पातळीवर हळदीला मागणी चांगली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या तुटवडा दिसतो. त्यातच देशातील हळद लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या दरात वाढ झाली. बाजारातील घटक पाहता हळदीच्या दरातील तेजी कायम राहू शकते. Turmeric Market

अजय केडिया, संचालक, केडिया कॅपिटल्स

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top