कांदा लागवड यंत्र विकसित : वाचा सविस्तर शेतातील 5 उपयुक्त यंत्रांबद्दल माहिती
कांदा लागवड यंत्र
१) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३ कृषी अवजारांना मान्यता (Mahatma Phule Agricultural University)
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ५ वाण, ३ कृषी अवजारे आणि ६९ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता मिळाली आहे. ट्रॅक्टर चलित फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र, विद्युत मोटार चलित फुले भुईमूग शेंगा फोडणी, वर्गवारी यंत्र आणि फुले रस काढणी यंत्र प्रसारित करण्यात आलं आहे.
देशात ऊस लागवडीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. तसेच शेतकरी उन्हाळी भुईमुगाला पसंती देत असतात. त्यामुळे या पिकांशी संबंधित कृषी यंत्र, अवजारांची निर्मिती करण्यात आली आहे.
२) बियाणे टोकण यंत्राला शेतकऱ्यांची पसंती (Soybean Seed)
सोयाबीन हे खरीप हंगामातलं महत्त्वाचं पीक. सोयाबीनची पेरणी ट्रॅक्टरच्या मदतीने केली जाते. परंतु ट्रॅक्टर पेरणी खर्चिक ठरत आहे. डिझेलचे दर वाढल्याने पेरणीच्या दरातही वाढ झालीय. त्यामुळे राज्यातील काही भागांत शेतकरी टोकण यंत्राने पेरणी करायला पसंती देतायत.
बियाणे टोकण यंत्र मानवचलित आहे. तसंच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतं. टोकण पेरणी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.
३) बीबीएफ पेरणी यंत्रामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ (BBF Sowing)
अलीकडच्या काळात सोयाबीनची पेरणी बीबीएफ पेरणी यंत्राने करण्याचं प्रमाण वाढलंय. हे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र आहे. या यंत्राने रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते.
सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. वरंब्यावर सोयाबीनच्या ३ ते ४ ओळी ३० सेंमी किंवा ४५ सेंमी अंतरावर ३ ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सेमी गरजेनुसार ठेवता येते. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे सोयाबीन उत्पादनात २५ टक्के वाढ दिसून आलीय, अशी माहिती कृषी यांत्रिकीकरणातील जाणकारांनी दिली.
४) मिनी ट्रॅक्टर स्वराज कोड बाजारात दाखल (Mini Tractor)
स्वराज या अग्रगण्य ट्रॅक्टर कंपनीचा नवीन मिनी ट्रॅक्टर बाजारात दाखल झालाय. फळबाग मशागतीसाठी उपयुक्त असलेल्या या मिनी ट्रॅक्टरचं नाव स्वराज कोड असं आहे. हा ट्रॅक्टर ११ एचपीचा आहे.
२२० किलो वजन उचलण्याची क्षमता, ६ फोरवर्ड आणि ३ रिव्हर्स गियरबॉक्स, एक सिलिंडर अशी या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आहेत. त्याची किंमत २ लाख ४५ हजार ते २ लाख ५० हजाराच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे. हाय टेक वैशिष्ट्ये असलेला हा मिनी ट्रॅक्टर उत्तम मायलेज देत असल्याचा दावा स्वराज कंपनीने केला आहे.
५) यंत्रामुळे कांदा लागवड सोपी होणार का? (Onion Cultivation)
देशात महाराष्ट्र कांदा उत्पादनात आघाडीवर आहे. परंतु ऐन लागवडीच्या हंगामात शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागतो. मजूर टंचाईमुळे कांदा उत्पादक त्रस्त असतात. ही समस्या लक्षात घेऊन राहुरी येथील दोन संशोधकांनी कांदा लागवड यंत्र विकसित केलंय.
शेतकरी कुटुंबातील सौरभ कदम आणि प्रशांत देशमुख यांनी हे यंत्र विकसित केलंय. अलीकडेच या यंत्राला थेट आफ्रिकेतून मागणी आलीय. यंत्राच्या मदतीने अवघ्या पाच तासात एक एकर कांदा लागवड करता येते. तसेच दोन रोपांतील आणि दोन ओळींतील अंतर योग्य राहतं. त्यामुळे कांद्याचं वजन, आकार आणि रंग एकसारखा राहतो, असा दावा या संशोधकांनी केला आहे.
source : agrowon