Sowing Update : पेरणी योग्य पावसाची वाट बघाच ! हवामान तज्ञांचा सल्ला
Sowing Update
Rain Update : अति तीव्र बिपॉरजॉय चक्रीवादळाने गुजरात, राजस्थानमध्ये धुमाकूळ घातला आहे. हे चक्रीवादळ अति तीव्र स्वरूपात गुजरात राज्यात प्रवेश करणार होते, त्याप्रमाणे त्याने प्रवेश केला. खबरदारी घेतली म्हणून मनुष्यहानी झाली नसली तरी जनजीवन मात्र विस्कळीत होऊन वित्तहानी ही झालीच.
‘’बिपॉरजॉय’’ चक्रीवादळ सध्या त्याच्या संलग्नित हवेचा दाब तीव्रतेच्या उतरत्या पायरीने म्हणजे ‘डिप्रेशन’ अवस्थेत राजस्थानातील बारमेर, जोधपूर शहरांच्या वायव्येकडे असून पुढील दोन दिवसांत अजमेर, जयपूरच्या वायव्येकडून उत्तर प्रदेशात प्रवेश करण्याची शक्यता जाणवते.
त्याच्या दोन दिवसांच्या अस्तित्व कालावधी व मार्गक्रमण भागात म्हणजे पूर्व राजस्थानच्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे वादळ लँडफॉल होताना प्रशासनाचा फोकस हा जरी गुजरात राज्यावर होता तरी लँडफॉल झाल्यानंतर त्याच्या राजस्थानातील मार्गक्रमणात वादळाने राजस्थानातही तेव्हढेच नुकसान केले.
आता बिपॉरजॉयमुळे राज्याच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन ठेपलेला मॉन्सूनच्या पाऊस प्रवाह काही का होईना कमकुवत झालाच. कारण आजपावेतो तो अजुनही जागेवरच आहे.
या चक्रीवादळाचे होत असलेल्या मार्गक्रमणामुळे १४ जूनपासून त्यापुढील तीन दिवस म्हणजे १६ जूनपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, सटाणा व संपूर्ण खानदेश या भागात ढगाळ वातावरणासहित ताशी ३५ ते ४० किमी पर्यंतच्या वेगवान वाऱ्यासह किरकोळ ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली होती.
अपेक्षित तीव्रतेचा पाऊस झाला नसला तरी तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस वगळता वेगवान वारे मात्र ह्या भागाने अनुभवले आहे. Sowing Update
नैऋत्य मॉन्सूनच्या मार्गक्रमणासाठी वातावरण अनुकूल आहे, असे जरी आपण वारंवार ऐकत असलो तरी नैऋत्य मॉन्सून पुढे मार्गस्थ होण्यासाठी त्याचा कमकुवतपणा झाकून राहिलेला नाही. कारण सध्याही महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरच गेल्या दहा दिवसांपासून त्यात प्रगती नसून सध्या आहे त्याच ठिकाणी तो खिळलेला आहे.
कदाचित बुधवार दिनांक २१ जूननंतर मॉन्सून पुढे सरसावण्याची हालचाल होईल, असे वाटते. बिपॉरजॉय चक्रीवादळाचाही मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी कोणताही सकारात्मक परिणाम मॉन्सून प्रगतीसाठी झालेला नाही. महाराष्ट्रात इकडे मॉन्सून प्रगतीची ही अवस्था असताना तिकडे विदर्भात मात्र आज मंगळवार २० जूनपर्यंतही उष्णतेची लाटसदृश स्थिती अजुनही जाणवतच आहे.
‘’एल-निनो’’च्या पूर्वीच्या सुरुवातीपासूनच्या भाकितानुसार मॉन्सूनच्या जून ते सप्टेंबर ह्या चार महिन्यांच्या काळात, सुरुवातीच्या दीड महिन्यानंतर म्हणजे १५ जुलैनंतर त्याच्या विकसनाची शक्यता होती.
परंतु तो तर सध्या आताच सुरवातीलाच म्हणजे जून महिन्यातच विकसित झाल्याचा खुलासा ‘नोआ’ ह्या परदेशी संस्थेकडून होत आहे. म्हणजेच १५ जुलैपर्यंतच्या २५ ते ३० दिवसांत देशात अपेक्षितपणे कोसळू शकणाऱ्या मॉन्सून पावसाच्या सरींचीही आशा सुद्धा आता मावळते की काय? असे वाटू लागले आहे.
जून महिन्यातील पाऊस व तापमानासंबंधी सरासरीपेक्षा कमी पावसाचे व उष्णतेचे एक जूनला केलेले भाकीत खरे ठरले आहे. कारण आज जवळपास जूनचे तीन आठवडे संपत येत आहेत आणि महाराष्ट्रातील पावसाची जून महिन्याची तूट ही सध्या ६० टक्केपेक्षा अधिक आहे.
दुसरे असे की, सध्या नुकतीच ‘धन’ अवस्थेकडे झुकू लागलेली ‘’हिंद महासागरीय द्विध्रुवीता’’ (इंडियन ओशन डायपोल म्हणजे आयओडी) ही एक वातावरणीय अवस्था सध्याच्या एल -निनो वर्षात दिर्घपल्ल्याच्या भाकितानुसार पावसासाठी अनुकूल व पूरक ठरणार आहे. खरं तर त्यानेच देशातील मॉन्सूनच्या आशा पल्लवीत ठेवल्या आहेत.
तरी देखील हिंद महासागरीय द्विध्रुवीता धन अवस्थेकडे झुकण्याचे अपेक्षित असताना सध्या तो ही फारच बळकट स्थितीत आहे, असे समजू नये, असे वाटते. हेच मॉन्सूनसंबंधी सध्याचे खरे वास्तव आहे. बघू या काय घडते ते! भारतीय हवामान खात्याकडून काळजीपूर्वक निरीक्षणे चालू आहेत.
धोक्याची सूचना देऊन गेल्या फेब्रुवारीपासून आज पाच महिने झालेत, शेतकऱ्यांना वारंवार आव्हान करून सावधही केले जात आहे, की ह्यावर्षी एल -निनोचे वर्ष आहे, सावध रहा! परंतु ‘ला-निना’मुळे गत तीन वर्षांत झालेल्या भरपूर पावसामुळे सध्या जमिनीत पाणीसाठा आहे. त्या भरवशामुळे शेतकरी ऐकायला तयारच नाहीत.
कितीही फोडून सांगा, तरी विचारत आहेत, की पेरणीयोग्य पाऊस कधी होईल? मराठवाड्यातील नांदेड व आसपासच्या जिल्ह्यातील तसेच विदर्भातील यवतमाळ व आसपास जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची ६० टक्के धुळपेरणी केल्याचे ऐकिवात देखील आहे. आणि आता पाऊस कधी येणार ह्याची विचारणा ते करीत आहेत.
शुक्रवार २३ जून च्या आसपास सुरू होणाऱ्या मोसमी पावसातून, जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यात (२३ ते ३० जून) सर्व चित्र स्पष्ट करणाऱ्या पेरणीयोग्य अशा पावसाची अपेक्षा करू या! तरीदेखील आठ इंच साधलेल्या पूर्ण ओलीवरची पेरणीच कदाचित ह्यावर्षी हंगाम जिंकून देईल, असे वाटते. तेव्हा ‘वाट बघा, लक्ष ठेवा’ पण ह्यावर्षी धूळ पेरणी मात्र टाळाच !
जून २३ ला सुरू होणाऱ्या व जुलै ६ ला संपणाऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पेरणीयोग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण अशा मोसमी पावसाची शक्यता जाणवते. म्हणजेच सात जुलैनंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण सात जुलैनंतरच्या आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते, असे एकंदरीत वाटते.
आसामकडील पुर्वोत्तर सात राज्यांत मात्र १४ जूनपासून त्या पुढील संपूर्ण आठवड्यात पावसाच्या अतिवृष्टीची वर्तवलेल्या शक्यतेप्रमाणे तेथे पावसाचा धुमाकूळ चालू आहे. बद्री-केदारनाथच्या हिमालयीन पर्यटकांस २१ जूनपर्यंत दुपारनंतरच्या गडगडाटी वातावरणासहित मध्यम पावसाच्या वर्तवलेल्या भाकितानुसार पर्यटक अडचणीला सामोरे जात आहेत. त्यांना ह्या अडचणींना अजूनही तोंड द्यावे लागेल, असे वाटते. इतकेच!
(लेखक भारतीय हवामानशास्त्र विभागातील निवृत्त हवामान तज्ज्ञ आहेत.)