रब्बी हंगामातील भाजीपाला सल्ला : वाचा संपूर्ण माहिती
रब्बी हंगामातील भाजीपाला
साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या मध्यात थंडीत (Cold Weather) वढ होण्यास सुरुवात होते. याचा भाजीपाला पिकांवर (Vegetable Crop) विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. थंडीपासून संरक्षणासाठी भाजीपाला पिकांना रात्रीच्या वेळी सिंचन (Irrigation) करणे फायद्याचे ठरते. भाजीपाला पिकाच्या शेताभोवती शेवरी (जनावरांचा चारा म्हणून उपयोगी) किंवा गिरिपुष्प (हिरवळीची खत पीक म्हणून उपयोगी) अशा वाराप्रतिरोधक वनस्पतींची लागवड करावी.
पालक व मेथी लागवड :-
- पालक आणि मेथीची लागवड जानेवारीअखेरपर्यंत करता येते. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने १० ते १५ दिवसांच्या अंतराने बी पेरावे.
- पालक लागवडीसाठी पुसा ज्योती, ऑलग्रीन तर मेथीच्या पुसा अर्ली बंचिग, कसुरी, फुले कस्तुरी या जातीची निवड करावी.
- लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी, कसदार आणि सुपीक जमीन निवडावी.
- एक हेक्टर क्षेत्रासाठी पालकाचे ८ ते १० किलो आणि मेथीचे २५ ते ३० किलो बियाणे पुरेसे होते.
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- लागवड सपाट वाफ्यांमध्ये करावी. पालकाच्या दोन ओळींतील अंतर १५ सें.मी. आणि मेथीच्या दोन ओळींतील अंतर १० सें.मी. ठेवावे.
- पालकसाठी हेक्टरी ४० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. मेथी पिकास हेक्टरी ५० किलो नत्र द्यावे. नत्र मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून ८ दिवसांचे अंतराने द्यावी.
मुळा :-
मुळा पिकासाठी थंड हवामान चांगले मानवते.
अधिक उत्पादन मिळवण्यासाठी मुळा लागवड ही हलकी ते रेताड मध्यम निचऱ्याची माती असलेल्या जमिनीत करावी.
लागवडीसाठी सुधारित जाती :- पुसा देशी, पुसा चेतकी, अर्का निशांत, पुसा रेशमी, आणि पुसा ग्लेशियर.
लागवडीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे पुरेसे होते.
वेलवर्गीय भाजीपाला :-
केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास,
मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
कांदा :-
रोप लागवडीची पूर्वतयारी.
लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
शेताची उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडावीत. त्यानंतर वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी.
चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १५ ते २० टन प्रमाणे जमिनीत मिसळावे. त्यानंतर पुन्हा वखराची एक पाळी द्यावी.
लागवडीसाठी २ मीटर रुंद व ३ ते ४ मीटर लांब वाफे तयार करावेत.
ठिबक सिंचनाची सोय असल्यास १.२० मीटर रुंदीचे बीबीएफ पद्धतीने वाफे तयार करावेत.
लागवडीसाठी ६ ते ८ आठवडे वयाची कांदा रोपांची निवड करावी.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रोपांची पुनर्लावड करावी.
रोपांच्या पुनर्लागवडीनंतर रोपांवर माना टाकणाऱ्या रोगाचा (डॅंपिंग ऑफ) प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गांडूळ खत किंवा कुजलेल्या शेणखतात मिसळून प्रति गादीवाफा २५ ते ३० ग्रॅम ट्रायकोडर्माचा वापर करावा.
लागवडीपूर्वी सपाट वाफ्यात हलके पाणी देऊन नंतरच लागवड करावी.
सपाट व बीबीएफ वाफ्यावर १५ बाय १० सें.मी. अंतरावर रोपांची लागवड करावी.
कांदा रोपांना जास्त प्रमाणात खतमात्रा लागते. त्यासाठी हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश याप्रमाणे खतमात्रा द्यावी. लागवडीवेळी संपूर्ण स्फुरद आणि पालाश व ५० किलो नत्र द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर ३० व ४५ दिवसांनी द्यावी. खते दिल्यानंतर पिकाला हलके पाणी द्यावे. रब्बी हंगामातील भाजीपाला
टोमॅटो :-
लवकर येणारा करपा नियंत्रणांसाठी,
अझोक्सिस्ट्रॉबीन (२३ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा
किटाझीन (४८ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा
मॅन्डीप्रोपॅमाइड ( २३.४ टक्के एस.सी.) ०.८ मिलि किंवा
पायराक्लॉस्ट्रॉबीन (२५ टक्के डब्ल्यू.जी.) ०.५ ग्रॅम किंवा
थायफ्लूझामाइड (२४ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा
झायनेब (७५ टक्के डब्लू.पी.) १.५ ग्रॅम ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
रसशोषक किडी उदा. फुलकिडे, मावा व तुडतुडे या किडीच्या जैविक व्यवस्थापनासाठी,
सुरुवातीच्या काळात क्रायसोपर्ला कार्निया या परोपजीवी किडीच्या १० ते १५ हजार अळ्या प्रति हेक्टर झाडावर सोडाव्यात अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारिझियम ॲनिसोपली (१.१५ डब्ल्यूपी) ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रणासाठी,
कार्बोसल्फान (३ टक्के सी.जी.) १ ग्रॅम किंवा
सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा
इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवा
प्रॉपरगाइट (५० टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (५ टक्के एस.ई.) (संयुक्त कीटकनाशक) २ मिलि
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणाकरिता,
सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा
डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यू.पी.) १.२ ग्राम किंवा
इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवा
इमिडाक्लोप्रिड (१७.८० टक्के एस.एल.) ०.३ मिलि किंवा
स्पायरोमेसीफेन (२२.९० टक्के एस.सी.) १.२५ मिलि
कीड-रोग नियंत्रण :- (फवारणी :- प्रतिलिटर पाणी)
कोबी, फुलकोबी व ब्रोकोली या पिकांमध्ये मावा किडीच्या नियंत्रणासाठी,
असिटामॅप्रिड (२० टक्के एस.पी.) १ ग्रॅम किंवा
सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि
चौकोनी ठिपक्याच्या पतंगासाठी,
इंडोक्साकार्ब (१४ .५ % एस.सी.) ०.५ मिलि किंवा
स्पिनोसॅड (२.५ टक्के) १.२ मिलि
घाण्या रोग (ब्लॅक रॉट) नियंत्रणासाठी,
स्ट्रेप्टोमायसिन ०.१ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम.
टीप :- दर १० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फवारण्या कराव्यात.
– डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५ / ९८९०१६३०२१ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
स्रोत : agrowon.com