कांदा, हरभरा आणि कापसाची आवक स्थिरावली ! वाचा सविस्तर
हरभरा आणि कापसाची
मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती. तुरीची आवक आता वाढू लागली आहे. या महिन्यात ती वाढती असेल. हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक स्थिर राहिली.
फ्यूचर्स किमती : सप्ताह ७ ते १३ जानेवारी २०२३
डिसेंबर महिन्यात अंडी (Egg Demand) व इतर प्राणिजन्य पदार्थांची स्थानिक मागणी व निर्यात वाढत होती. याही महिन्यात हा वाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना, या वस्तूंच्या मागणीचा दीर्घकालीन कल वाढता आहे.
त्यामुळे पशुखाद्यासाठी (Animal Feed) लागणाऱ्या सर्व शेतीमालाच्या मागणीचा कल वाढत आहे. याचा परिणाम त्यांच्या किमती वाढण्यावर झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या महिन्यात, मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सोयाबीनमध्ये (Soybean Rate) वाढता तर कापसामध्ये (Cotton Rate) उतरता कल राहिला.
डिसेंबर महिन्यात कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर राहिली. मक्याची आवक मोठ्या प्रमाणात घसरली. मूग व सोयाबीन यांचीही आवक घसरत होती. तुरीची आवक आता वाढू लागली आहे. या महिन्यात ती वाढती असेल. हरभरा, कांदा व टोमॅटो यांची आवक स्थिर राहिली.
या सप्ताहामधील किमतीतील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे व कपाशीचे राजकोटमधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) डिसेंबर महिन्यात घसरत होते. गेल्या सप्ताहात कापसाचे स्पॉट भाव ४.९ टक्क्यांनी वाढून रु. ३०,४६० वर आले होते;
या सप्ताहात मात्र ते २.६ टक्क्यांनी घसरून रु. २९,६८० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) ३.३ टक्क्यांनी घसरून रु १,६१७ वर आले आहेत.
कापसाचे हमीभाव लांब धाग्यासाठी (प्रति क्विंटल) रु. ६,३८० व मध्यम धाग्यासाठी रु. ६,०८० आहेत.
मका
मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात स्पॉट किमती रु. २,२०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या याच पातळीवर आहेत.
फ्यूचर्स (फेब्रुवारी डिलिव्हरी) किमती रु. २,२१६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती रु. २,२४० वर आहेत. मक्याचा हमीभाव रु. १,९६२ आहे. सध्याच्या किमती हमीभावापेक्षा अधिक आहेत.
हळद
हळदीच्या स्पॉट (निजामाबाद) किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात मात्र त्या ०.९ टक्क्याने घसरून रु. ७,३३५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.३ टक्क्याने वाढून रु. ७,३५७ वर आल्या आहेत.
एप्रिल फ्यूचर्स किमती रु. ७,७३८ वर आल्या आहेत. मे फ्यूचर्स किमती रु. ७,९१६ वर आल्या आहेत. हळदीमध्ये वाढीचा कल आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर) किमती गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी वाढून रु. ५,०४८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.३ टक्क्याने घसरून रु. ४,९८४ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे.
मूग
मुगाच्या किमती डिसेंबर महिन्यात वाढत होत्या. या महिन्यातसुद्धा हा कल कायम आहे. मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) या सप्ताहात ४ टक्क्यांनी वाढून रु. ७,८०० वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ७,७५५ आहे. आवक कमी होत आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (इंदूर) रु. ५,७८१ वर आली होती; या सप्ताहात ती ०.४ टक्क्याने घसरून रु. ५,७५६ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,३०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.१ टक्क्याने घसरून रु. ७,०३३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा १.९ टक्क्याने घसरून ६,९०० वर आली आहे. तुरीची आवक वाढू लागली आहे. तुरीचा हमीभाव रु. ६,६०० आहे.
कांदा
कांद्याच्या किमती १६ डिसेंबरपासून स्थिर आहेत. गेल्या सप्ताहात किंमत (पिंपळगाव) रु. १,३०० होती; या सप्ताहात ती रु. १,३६७ वर आली आहे.
टोमॅटो
गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ५७५ वर आली होती. या सप्ताहात ती रु. ८०० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो)
Source: agrowon.com