कृषी महाराष्ट्र

Tomato Market : टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण ! केंद्र सरकार नेपाळमधून टोमॅटो आयात करणार

Tomato Market : टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण ! केंद्र सरकार नेपाळमधून टोमॅटो आयात करणार

 

Tomato Market : पुणे : गेले दोन महिने बाजार गाजवणाऱ्या टोमॅटोनं आता मान टाकली. टोमॅटोचे घाऊक भाव ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवरून ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी झाले. म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा भाव निम्म्याने कमी झाला. त्यातच केंद्र सरकारने नेपाळमधून १० टन टोमॅटो आयातीचे करार केले. आयातही सुरु झाली. पण टोमॅटोच्या भावात पुढील काळात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले.

टोमॅटोच्या भावात मागील आठवडाभरात मोठी नरमाई येत गेली. राज्यातील नाशिक जिल्ह्यासह इतर काही राज्यांमध्ये टोमॅटो आवक सुरु झाली. बाजारात आवक वाढल्याने दरावर दबाव आला. एकट्या नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये जवळपास एक लाख क्रेटची आवक झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशाच्या इतर काही टोमॅटो पट्ट्यातील मालही बाजारात येत आहे. राज्यातही आवक वाढली. परिणामी टोमॅटोच्या भावात घट झाली. टोमॅटोचे भाव आता निम्म्यावर आले.

ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारांमध्ये टोमॅटोचे घाऊक बाजार सरासरी ६० ते ७० रुपये प्रतिकिलो होते. म्हणजेच शेतकऱ्यांना बाजारात हा भाव मिळत होता. पण यात दिवसेंदिवक घट होत गेली. आता भाव निम्म्यावर आले. सध्या शेतकऱ्यांना बाजारात सरासरी ३० ते ४० रुपयांचा भाव मिळत आहे. भावात मोठी घट झाल्याने टोमॅटो उत्पादक पुन्हा चिंतेत आले.

टोमॅटो आयातीची स्थिती

सरकारही टोमॅटोचे भाव कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयातही सुरु केली. नॅशनल कोऑपरेटीव्ह कन्झूमर्स फेडरेशन अर्थात एनसीसीएफने नेपाळमधून १० टन टोमॅटो आयातीचे करार केले आहेत. एनसीसीएफ ही संस्था केंद्र सरकारसाठी टोमॅटो आयात, खरेदी आणि वितरण करणार आहे. त्यापैकी ३ ते ४ टन टोमॅटो मंगळवारी वितरित करण्यात आला. तर आणखी ५ टन टोमॅटो आयात झाला. हा टोमॅटो उत्तर प्रदेशातील बाजारात ५० रुपये प्रतिकिलोने विकला जाणार आहे, असे एनसीसीएफने स्पष्ट केले.

आवक आणखी वाढेल का ?

जाणकारांच्या मते, टोमॅटोचे भाव जास्त कमी होण्याची शक्यता नाही. कारण जुलै महिन्यात झालेला पाऊस आणि ऑगस्टमधील पावसाचा खंड यामुळे आवक वाढीवर मर्यादा आहेत. त्यातच जुलैमध्ये आवक असलेल्या बाजारांमध्ये सध्या आवक कमी झाली. त्यातच एनसीसीएफ आयात केलेला टोमॅटो केवळ उत्तर प्रदेशातच विकणार आहे. देशाच्या इतर भागात हा टोमॅटो विकला जाणार नाही. कारण टोमॅटोची टिकवण क्षमता कमी असते. इतर भागात टोमॅटोची वाहतूक शक्य नाही. म्हणजेच आयात टोमॅटोचा इतर भागात दबाव नसेल.

आयातीचा किती परिणाम

देशातील टोमॅटो उत्पादन आणि वापराचा नेमका आकडा उपलब्ध नाही. पण सरकारी आकड्यानुसार देशात २१० लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होते. तर वापर २०० लाख टनांच्या दरम्यान असतो. म्हणजेच दिवसाला देशाला जवळपास ५५ हजार टन टोमॅटोची गरज असते. सरकार आयात करतंय १० टन. यातून एका शहराचीही गरज पूर्ण होणार नाही. म्हणजेच या आयातीचा बाजारावर परिणाम होणार नाही. पण सरकार सायकाॅलाॅजिकल दबावासाठी आयातीचा प्रचार करतं आहे. Tomato Market

भाव आणखी पडतील का ?

टोमॅटोचे भाव किरकोळ विक्रीचे भाव ३० रुपयांपर्यंत कमी करण्याचे सरकाचे उद्दीष्ट आहे. पण बाजारातील पुरवठा आणि मागणी तसेच पिकाची स्थिती पाहता हे उद्दीष्ट सरकारला साध्य करता येईल, असे वाटत नाही. टोमॅटो भावात पुढील काळात चढ उतार दिसू शकतात. पण दीर्घ काळात टोमॅटोचे भाव सरासरी ३० ते ४० रुपये प्रतिकिलोवर दिसू शकतात, असा अंदाजही टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

राज्यातील नाशिकसह इतर भागात टोमॅटो आवक वाढत आहे. पण याचवेळी काही भागातील टोमॅटो हंगाम संपला. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये वाढत असलेली आवक स्थिरावेल. सध्या बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. या भावात काही दिवस काहीशी नरमाई दिसू शकते. पण दर पुन्हा या पातळीवर येऊ शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारात आवक दाटणार नाही, याचीही काळजी घ्यावी.

– सारंग घोलप, टोमॅटो व्यापारी, नारायणगाव बाजार समिती

Tomato Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top