बटाटा लागवड संपूर्ण माहिती
बटाटा लागवडीच्या सुरवातीच्या काळातील व्यवस्थापनाविषयी माहिती द्यावी
आपण कोणत्याही पिकाची लागवड करताना स्थानिक भौगोलिक हवामान, जमिनीची प्रत, पिकाचे वाण, पाण्याचे नियोजन आदी गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यानुसार निविष्ठांचा वापर बदलतो. आपण ज्या भागात राहात आहात, त्या कक्षेतील कृषी विद्यापीठातील संबंधित शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे लागवडीचे नियोजन करावे. या पिकातील येथे दिलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्या उपयोगी येतील.
बटाटे चांगले पोसण्यासाठी थंड म्हणजे 18 ते 21 अंश तापमान अनुकूल असते. कमी पावसाच्या भागात बटाट्याची शेती चांगली करता येते. कुफ्री चंद्रमुखी, कुफ्री जवाहर, कुफ्री अशोका, कुफ्री ज्योती, कुफ्री लवकर, कुफ्री सिंधुरी या बटाट्याच्या सुधारित जाती आहेत. बियाणे 2.5 ते चार सें.मी. आकाराचे व 25 ते 40 ग्रॅम वजनाचे व प्रति हेक्टरी 25 ते 30 क्विंटल वापरावे.
बियाणे (बटाट्याच्या फोडी) प्रक्रियेसाठी दीड ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून बियाणे बुडवून लागवड करावी.
खते
पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. पिकाला 100-120 किलो नत्र, 80 किलो स्फुरद व 80-100 किलो पालाश प्रति हेक्टरी देणे आवश्यक आहे. त्यापैकी अर्धे नत्र, स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी सरीत टाकून नंतर मातीचा भर द्यावा.
पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर पिकाला लगेच हलके पाणी द्यावे. त्यानंतर चार ते सात दिवसांनी पाणी द्यावे. पाणी देताना वरंबे दोनतृतीयांश पाण्यात बुडतील आणि जमीन ओलसर राहील अशा प्रकारे द्यावे.
आंतरमशागत व मातीची भर देणे- लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे व राहिलेली खताची मात्रा देऊन मातीची भर द्यावी. दुसऱ्यांदा मातीची भर 55- 60 दिवसांत द्यावी.
पाणी व्यवस्थापन
बटाट्यास थोडे- थोडे आणि कमी अंतराने पाणी देणे फायद्याचे ठरते. लागवडीनंतर साधारणतः 25 ते 30 दिवसांनी जमीन वाफशावर असताना बटाटा पिकाच्या वरंब्यास भर द्यावी. कारण, या वेळी जमिनीखाली लहान आकाराचे बटाटे लागलेले असतात, ते मातीने चांगले झाकल्यास व जमिनीत खेळती हवा राहिल्यास झाडांची वाढ जलद आणि चांगली होते, बटाटे उघडे राहत नाहीत. वरंबा भरभक्कम होण्यासाठी व भरपूर माती लागण्यासाठी बटाट्याच्या दोन ओळींतून रिजर चालवावा.
पाणी व्यवस्थापन
या पिकास एकूण 500 ते 700 मि.मी. पाण्याची आवश्यकता असते. कमी कालावधीच्या (80 दिवस) जातींना कमी, तर जास्त कालावधीच्या (120 दिवस) जातींना जास्त पाणी लागते. या पिकाला उपलब्धतेच्या 60 टक्के ओलावा जमिनीत असेल त्या वेळी पाणी द्यावे.
बटाटा पिकाच्या संवेदनक्षम अवस्था
1) रोपावस्था : ही अवस्था लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी येते. या वेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही. तसेच, बटाट्याच्या मुळांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
2) स्टेलोनायझेशन : या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरवात होते. ही अवस्था लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी येते. या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादन खूपच कमी येते.
3) बटाटे मोठे होण्याची अवस्था : ही अवस्था लागवडीनंतर 70 ते 75 दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेत पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात, परिणामी उत्पादन घटते.
तुषार सिंचन फायदेशीर
अवर्षणप्रवण क्षेत्रातील मध्यम खोल जमिनीत बटाट्याच्या अधिक उत्पादनाकरिता व अधिक नफा मिळविण्याकरिता रब्बी बटाट्याची लागवड तुषार सिंचनाखाली करावी. याकरिता तुषार सिंचनाद्वारे 25 मि.मी. बाष्पीभवन झाल्यावर (पाच ते आठ दिवसांनी) 35 मि.मी. पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. या पद्धतीमुळे आपण पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतो आणि त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते, बटाटे चांगले पोसतात, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात व उत्पादनात वाढ होते.
मध्यम प्रतीची, मिश्रित पोयट्याची व उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकासाठी जास्त चांगली असते. भारी, चिकण वा पाणथळ जमिनीची निवड करू नये, कारण या जमिनी पाणी धरून ठेवतात. परिणामी, लागवड केलेला बटाटा किंवा बटाट्याच्या फोडी (बियाणे) लागवडीनंतर ताबडतोब कुजण्याची किंवा सडण्याची शक्यता असते. रब्बी हंगामात 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी, त्यामुळे डिसेंबर व जानेवारीच्या थंडीचा बटाटे पोसण्यास चांगला उपयोग होतो व अधिक उत्पादन मिळते. पिकास माती परीक्षणानुसार खतांची मात्रा द्यावी.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन