Cotton Market : कापसाचे भाव खरंच पडले ? पुन्हा वाढतील का ? हंगामाच्या सुरुवातीलाच कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराज
Cotton Market : बाजारात नव्या कापसाची आवक हळूहळू वाढत आहे. पण कापसाला मिळणारा भाव शेतकऱ्यांना नाराज करतोय. एकिकडे उत्पादनात घट येणार आहे. पण दुसरीकडे भाव खूपच कमी आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कापसामध्ये ओलावा अधिक असल्याने भावपातळी कमी दिसते. पण चांगल्या प्रतिच्या कापसाला आजही ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. पुढील काळात कापसाचे भाव सुधारण्यास परिस्थिती अनुकूल आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. Cotton Market
देशातील बाजारात सध्या नव्या कापसाला अगदी ५ हजारांपासून भाव मिळत आहे. तर यंदाचा हमीभाव ७ हजार २० रुपये आहे. म्हणजेच कापसाला मिळणारा भाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. पण बाजारात ५ हजारांचा भाव मिळालेल्या कापसाची गुणवत्ता कमी होती. ओलावा आणि काडी कचरा जास्त असलेल्या भावाची बोली कमी लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर चांगल्या प्रतिच्या नव्या कापसाला मिळणारा सरासरी भाव ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे, जुन्या कापसाचे भावही याच पातळी दरम्यान दिसतात.
आता नव्या कापसाला कमी भाव मिळत आहे. मग हाच भाव टिकून राहील का? तर काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी सांगितले की, शेतकरी आता चांगल्या भावाच्या अपेक्षेने कापूस ठेवतात. मागील हंगामातही शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवल्याने हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला होता. Cotton Market
गणात्रा पुढे म्हणाले, की देशात यंदा कापूस लागवडी उशीरा झाल्या. पावसात मोठे खंडही पडले. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जवळपास ४५ दिवस पिकाला पोषक असा पाऊस पडला नाही. देशभरातील कापूस उत्पादक सर्वच भागात कमी पावसाचा कापूस पिकाला फटका बसला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्येही कापूस पिकाचे पुरेशा पावसाअभावी नुकसान झाले.
यामुळे कापसाची उत्पादकता आणि गुणवत्ताही कमी झाली. त्यामुळे यंदाही शेतकरी हमीभावापेक्षा किमान २० जास्त दराची अपेक्षा ठेऊन आहेत. यामुळे दरात सुधारणा होऊ शकते, असेही संकेत उद्योगांनी दिले. कापसाचा भाव सध्याच्या पातळीवरून वाढेल, असे काही अभ्यासकांनीही सांगितले.
मग हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे भाव का कमी झाले? तर उद्योगांच्या मते, सध्या कापसाला उठाव नाही. सुतगिरण्यांकडून कापूस गाठींचा उठाव कमी होत आहे. तसेच सरकीचेही भाव कमी झाले. सरकीवर खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याचा दबाव आहे, असेही उद्योगांनी सांगितले. पण ही कारणे असली तरी सध्या बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता कमी आहे. सर्वच कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत नाही. नवा कापूस काही भागांमध्ये ७ हजार ५०० रुपयांपर्यंतही विकला जात आहे. कापसातील ओलावा कमी झाल्यानंतर किमान भावातही सुधारणा झालेली दिसेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
देशातील कापूस उत्पादनात यंदा घट येण्याची शक्यता आहे. केवळ भारतातच नाही तर जागितक उत्पादनही कमी राहील, असा अंदाज युएसडीए अर्थात अमेरिकेच्या कृषी विभागाने दिला. कापसाची वापरही यंदा कमीच राहणार आहे. पण वापरापेक्षा उत्पादनातील घट अधिक राहील, असेही युएसडीएने म्हटले आहे.
देशातील तसेच जागतिक उत्पादन, वापर आणि व्यापाराचा अंदाज ऑक्टोबरच्या शेवटी येईल. पण सध्यातही कापसाचा पुरवठा कमी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे कापूस बाजाराला आधार मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी भावात कापूस विकण्याऐजी आणखी काही दिवस बाजारातील चित्र स्पष्ट होईपर्यंत वाट पाहणे फायदेशीर ठरेल, असेही अभ्यासकांनी सांगितले.