कृषी महाराष्ट्र

Cotton Market : ऑगस्टच्या शेवटी कापूस दरात सुधारणा दिसू शकते ! कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज

Cotton Market : ऑगस्टच्या शेवटी कापूस दरात सुधारणा दिसू शकते ! कापूस बाजारातील अभ्यासकांचा अंदाज

 

Cotton Market : ऑगस्ट महिना उजाडला तरी देशातील बाजारांमध्ये कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच दिसते. ऑगस्ट महिना हा कापूस आयातीसाठी ऑफ सिझन असतो. या महिन्यातील आवक खूपच कमी असते.

पण यंदा आवक जास्त आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने बाजारावर दबाव असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात येत होते. पण ऑगस्टच्या शेवटी कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गेल्यावर्षीपर्यंत देशातील बाजारातील स्थिती पाहता सध्याची आवक खूपच जास्त दिसते. २०२२ पर्यंत ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात बाजारातील आवक ४ हजार गाठींच्या दरम्यान राहत होती. पण चालू हंगामात शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेने कापूस मागे ठेवला होता.

फेब्रुवारीपर्यंत बाजारातील आवक खूपच कमी होती. पण मार्चपासून बाजारातील आवक वाढत गेल्याने दर कमी होत गेले. बाजारातील आवक वाढल्याचा दबाव दरावर येत असल्याचे व्यापारी आणि उद्योगांनी त्यावेळी सांगितले. तसेच कापूस आणि सुताला मागणी नसल्याचाही दबाव कापूस बाजारावर येत असल्याचे सांगितले जात होते. Cotton Market

कापसाचा हंगाम सुरु झाल्यापासून ऑक्टोबर ते फेब्रुवारी आवक सरासरीपेक्षा कमी होती. तर मार्चपासून आतापर्यंत आवक सरासरीपेक्षा पाच ते सहा पटींनी जास्त दिसते. आजही बाजारात २५ हजार गाठींच्या दरम्यान कापूस आवक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

तर मागील हंगामात याच दिवशीची आवक ४ हजार गाठींच्या दरम्यान होती. जुलै महिन्यात कापूस उत्पादक पट्ट्यात दोन ते तीन आठवडे पाऊस होता. परिणामी बाजारातील आवक कमी होती. पण पाऊस उघडल्याने शेतकरी कापूस विकत आहेत. यामुळे आवक जास्त दिसते. पण पुढील एक दोन आठवड्यांमध्ये आवक पुन्हा कमी दिसू शकते, असेही व्यापाऱ्यांनी सांगितले. Cotton Market

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार दिसत असले तरी सरासरी दरपातळी वाढलेली आहे. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८५ सेंटपर्यंत पोचले होते. तर देशातील वायदे ५८० रुपयांनी वाढले होते.

एमसीएक्सवर कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ५९ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. वायद्यांमध्ये कापूस दरात चांगली वाढ मागील दोन आठवड्यांमध्ये पाहायला मिळाली. पण बाजार समित्यांमधील भाव कायम आहेत. कापसाला बाजार समित्यांमध्ये आजही सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.

आतापर्यंत देशातील कापूस लागवड गेल्यावर्षीच्या पातळीवर पोचली. पण पावसाने चिंता वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात देशातील कापूस उत्पादक पट्ट्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. तर सप्टेंबर महिन्यातही अनेक भागात पाऊस कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

पुढील काळात पाऊस कमी राहिल्यास कापूस उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यामुळे कापूस बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे. चालू महिन्याच्या शेवटपर्यंत कापूस दरात वाढ दिसू शकते, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

source : agrowon

cotton market price, Cotton Market Update, cotton price, Cotton Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top