DGCA ची मारुत ड्रोनला कृषी ड्रोन म्हणून मंजुरी ! वाचा सविस्तर
DGCA ची मारुत
शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढत आहे. केंद्रीय यंत्रणेने नुकतीच आणखी एका ड्रोनला मान्यता दिली आहे.
सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रगती साधली जातेय. कृषी क्षेत्रही यात मागे नाही. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर (Drone Technology) वाढत आहे. केंद्रीय यंत्रणेने नुकतीच आणखी एका ड्रोनला मान्यता दिली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालायने AG 365 या बहु-उपयोगी मारुत ड्रोनला कृषी वापरासाठी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात मारुत ड्रोनचे संस्थापक प्रेम कुमार विस्लावथ म्हणाले की, “AG 365 या ड्रोनची दीड लाख एकर जमिनीवर चाचणी घेण्यात आली आहे. तसेच विशिष्ट पिकांवर ड्रोनच्या साहाय्याने फवारणीसाठी अग्रगण्य कृषी संस्था आणि संशोधन गट यांच्या सहकार्याने व्यापक स्तरावर चाचण्या घेण्यात आल्या.
“केंद्रीय यंत्रणेने मंजुरी दिल्यामुळे आता या ड्रोनसाठी अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंडातून पाच ते सहा टक्के व्याजदराने १० लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तसेच “संभाव्य खरेदीदारांना केंद्र सरकारकडून ५०-१०० टक्के अनुदान देखील मिळू शकते,” असे कंपनीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ड्रोन नियम २०२१ च्या नियम ३४ अंतर्गत रिमोट पायलट प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या लोकांना अधिकृतपणे नेमलेली रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था (RPTO) प्रशिक्षण देऊ शकते.
‘ड्रोन’ मध्ये नेमक्या अडचणी काय ?
गेल्या काही दिवसांपासून कृषी संस्थाच्या माध्यमातून ड्रोनच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. ड्रोन शेती हा उत्तम पर्याय असला तरी यामध्ये काही त्रूटीही असल्याचे कृषी संस्थेचे कमल सिंह यांनी सांगितले आहे. कीटकनाशक नष्ट करण्यासाठी सर्व मोठ्या जाती 200 लिटरचा उपाय करतात. जेव्हा कीटकनाशक चांगले विरघळते आणि जेव्हा ते यंत्रांद्वारे विभागले जाते तेव्हा योग्य दाबाने ते वनस्पतींमध्ये तसेच मातीच्या आत सहज जाते.चाचणीदरम्यान ड्रोनच्या 10 लीटरच्या टाकीवर हे सोल्यूशन टाकण्यात आलं होतं, मात्र ड्रोनने उडताना योग्य दाब नसल्यामुळे बरीच कीटकनाशकं हवेत उडून गेली. त्यावरचा उपायही शेतकऱ्यांकडे नव्हता.त्यामुळे ड्रोनचा प्रत्यक्षात वापर होण्यापूर्वी या सर्व समस्या सोडवाव्या लागणार आहेत.
मोठ्या पिकांवर परिणाम शून्य
सर्वा्त महत्वाचे म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून मोठ्या वनस्पतींवर कीटकनाशकांची फवारणी ही निष्प्रभ ठरत आहे.ड्रोनद्वारे फार कमी प्रमाणात किटकनाशकांची फवारणी होत असल्याने मोठ्या वनस्पती त्याचा फारसा परिणाम होत नाही.वनस्पतीच्या मुळापर्यंत या माध्यमातून केलेल्या फवारणीचा परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत पानांच्या मागील बाजूस व खोडात जर एक प्रकारचा किडा असेल तर ड्रोनमधून किटकनाशकाच्या फवारणीमुळे त्याचा नायनाट होईल असे नाही.त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करुनही शेतकऱ्यांना पुन्हा हाताने फवारणी करावी लागत आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन महत्वाचे
ड्रोनचा शेती व्यवसयात वापर वाढल्याने शेतकऱ्यांच्या परीश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे. मात्र, ड्रोनचा वापर करताना काय काळजी घ्यावी लागणार आहे याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तसा प्रयोग स्थानिक पातळीवर सुरु झाला आहे. पण शेतकरी अशा तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ड्रोन वापराबाबत शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिल्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच शिल्लक नाही.
स्रोत : agrowon.com