सांगली जिल्ह्यात काळ्या तांदळाचा पहिलाच प्रयोग यशस्वी !
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचं उत्पादन घेतलं आहे.
Black Rice : राज्याच्या विविध भागातील शेतकरी सातत्यानं नवनवीन प्रयोग करत असतात. असाच एक वेगळा प्रयोग सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचं (Black Rice) उत्पादन घेतलं आहे. या काळ्या तांदळाचा प्रयोग यशस्वी केला असून, यातून फायदा होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक
सांगली जिल्ह्यात महागडा आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या काळ्या तांदळाचे उत्पादन घेण्यात आलं आहे. आसाममधून बियाणे मागवून शिराळा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या काळ्या तांदळाचे उत्पादन घेण्याचा प्रथमच प्रयोग केला आहे. ब्लॅक राईस चे 200 ते 250 रुपये किलो असे महागडे बियाणे आहे. शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत असून यातून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. हा तांदूळ शिजण्यास वेळ लागतो, पण पौष्टिक असतो. या तांदळाची किंमतही जास्त आहे. उत्पादक शेतकऱ्यांना हा तांदूळ चांगला नफा मिळवून देतो.
या पिकासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर
शिराळा तालुक्यात खास करुन भात शेती केली जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने कृषी अधिकाऱ्यांच्या साहाय्याने काही शेतकऱ्यांनी आसाममधून ब्लॅक राईस आणला होता. 200 ते 250 रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागवले होते. पेरणीतून उगवलेल्या रोपातून त्यांनी बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात जुलै महिन्यात रोपांची लागण केली होती. पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. सध्या हे भात परिपक्व होत आलेले आहे. या भाताची लांबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे. या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे.
आरोग्यवर्धक देशी भातांच्या वाणांचे संवर्धन करणे हा उद्देश
काळ्या तांदळाचे पिक घेण्याचा उद्देश हा आहे की आरोग्यवर्धक देशी भातांच्या वाणांचे संवर्धन करणे. तसेच त्याच्या लागवडीखालील क्षेत्र वाढवायचे. त्याचबरोबर या वाणांना बाजारपेठेत असणारी जास्तीची मागणी आणि जास्तीचा दर हे लक्षात घेऊन या तांदळाचे उत्पादन वाढवायचे हा उद्देश असल्याची माहिती कृषी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. या तांदळाचे उत्पन्न हे हेक्टरी 25 ते 30 टन आहे. पण याला मिळणारा बाजारभाव हा 60 रुपये ते 200 रुपयापर्यंत मिळत असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.
श्रोत :- abplive.com