जैविक बुरशी ट्रायकोडर्मा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण कसं करते ? वाचा संपूर्ण
जैविक बुरशी ट्रायकोडर्मा
कापूस, कडधान्य, तेलबिया (Oilseed), भाजीपाला व ऊस अशा विविध पिकांवर सुरवातीच्या काळात मर, मूळकुज, कॉलररॉट, खोडकुज आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोपवाटिकेतील रोपे अचानक माना टाकतात.
या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पीथियम अशा बुरशी कारणीभूत असतात.
त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकांचा (Biological fungicide) वापर फायदेशीर ठरतो.
यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. ही बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशींची वाढ होऊ देत नाही.
निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून, त्यातील काही पिकांवर रोगकारक असतात, तर काही बुरशी पिकांचे रोगांपासून संरक्षण करणाऱ्या असतात.
ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. ट्रायकोडर्मा ही हिरव्या रंगाची जवळ जवळ सर्व प्रकारच्या जमिनीत अढळणारी बुरशी आहे.
ट्रायकोडर्मा सेंद्रिय पदार्थांच्या सानीध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी मातीमध्ये वाढणारी असून, परोपजीवी तसचं इतर रोगकारक बुरशींवर उपजिवीका करते.
ट्रायकोडर्मा बुरशी विशेषत:मातीतून उद्भवणाऱ्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी एक प्रभावी जैविक पद्धत आहे. (Trichoderma)
ट्रायकोडर्माची कार्यपद्धती
- ट्रायकोडर्मा ही बुरशींच्या धाग्यांना विळखा घालून, त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यांची वाढ खुंटते.
- ही बुरशी ग्लायटॉक्झिन व व्हीरिडीन नावाचे प्रतीजैविक निर्माण करते.ते रोगकारक बुरशीना मारक ठरते.
- ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरते. (Trichoderma)
- ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशींनाशकांसोबत करू नये.
- ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.
- ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशींनाशकांसोबत करू नये.
ट्रायकोडर्मा बुरशीचे फायदे काय आहेत ?
ट्रायकोडर्मा ही विविध पद्धतीद्वारे वापरता येते.उदा. बीजप्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडांच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी तसचं पिकांवर फवारणीद्वारे आणि सेंद्रिय खत निर्मितीकरिता ट्रायकोडर्माचा उपयोग होतो.
बीजप्रक्रिया : ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास वापरावे. बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावे.
बियाणे ओलसर होईल, इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी.
source : agrowon