कृषी महाराष्ट्र

Cotton Diseases : कपाशी मधील मूळकुज रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे ? संपूर्ण माहिती

Cotton Diseases : कपाशी मधील मूळकुज रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे ? संपूर्ण माहिती

 

Cotton Diseases : कपाशी हे महत्त्वाचे नगदी पीक असून, ते शेतात सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी उभे असते. या काळात विविध बुरशी, जिवाणू, सूत्रकृमी व विषाणूंद्वारे होणारे रोग पिकाचे कमी अधिक प्रमाणात आर्थिक नुकसान करतात. बहुतांश रोगकारक घटकांचा प्रसार हा संक्रमित बियाणे, पाणी व मातीद्वारे होतो. रोगांमुळे कापूस पिकात विशेषतः झाडाची वाढ खुंटणे, पाने व फुले गळणे, पाने पिवळे पडणे, बोंडे सडणे, झाड कमजोर होणे, रोपे व झाडे सुकून जाणे अशी लक्षणे आढळून येतात.
बदलते हवामान, एक पीक लागवड पद्धती, रोगास संवेदनशील संकरित कापूस वाणांची मोठ्या प्रमाणावर लागवड आणि बदललेली पीक पद्धती इ. अशा कारणामुळे मागील ३ ते ४ वर्षांपासून नवीन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकाच्या रोप अवस्था, पाते तसेच बोंडे धरण्याच्या अवस्थेत आढळत आहे.

सध्या बहुतांश कापूस उत्पादक जिल्ह्यात कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे. बीटी कपाशी पिकाच्या रोपावस्थेत मातीद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांमुळे मूळकुज, रोपाचे देठ लाल पडून झाडाची वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसत आहेत. या रोग व विकृतीची कारणे, लक्षणे जाणून, योग्य ते व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.

रोगकारक बुरशी – रायझोक्टोनिया सोलॅनी, मॅक्रोफोमिना फॅसिओलिना (रायझोक्टोनिया बटाटीकोला), क्लेरोशिअम रॉल्फसाई इ. बुरशींमुळे कपाशीमध्ये मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होतो.

मूळकुज रोगाची लक्षणे :

-प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेत रोपे शेंड्यापासून कोमेजून खाली झुकतात.
– मुळे आणि जमिनीलगतचे खोड व बुंधा सडून रोगग्रस्त झाड सहजपणे जमिनीतून उपटले जाते.
-रायझोक्टोनिया या रोगकारक बुरशीमुळे झाडाची मुळे तांबडी किंवा काळी पडून कोरडी दिसतात आणि कुजतात.
– उष्ण व दमट हवामानात क्लेरोशिअम रॉल्फसाईच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या बुंध्यावर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येते. झाडाच्या जमिनीलगतच्या भागात वर्तुळाकार तांबड्या रंगाच्या मोहरीच्या आकाराच्या क्लेरोशिअल बॉडीज तयार झालेल्या दिसतात.
-रोगाच्या नंतरच्या अवस्थेत खोडे आणि मुळे कुजून झाडे सुकतात.
-अलीकडील काळात काही भागांत बीटी कपाशीवर मॅक्रोफोमिना फॅसिओलिना या बुरशीचा अधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाची वाढ खुंटली जाऊन झाड लालसर पडून मुळे व खोडे सडतात व सुकतात.
पेरणीपासून ४५-६० दिवसांपर्यंत पावसाच्या थेंबाद्वारे मातीचे कण पानांवर उडून मॅक्रोफोमिना बुरशीच्या संसर्गामुळे करपासदृश लक्षणेसुद्धा दिसून येतात.

या वर्षी जास्त अनुकूल परिस्थिती – या वर्षी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पीक हंगामाच्या सुरुवातीच्या काळात कमी ते मध्यम पाऊस आणि त्यानंतर अधूनमधून कोरडा दुष्काळसदृश (तात्पुरती उष्ण आणि कोरडी) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अशी परिस्थिती रोपावस्थेत मूळकुज या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाकरिता पोषक असते. Cotton Diseases

एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धती :

– जमिनीची खोल नांगरणी करून रोगग्रस्त पिकांचा काडीकचरा काढून नष्ट करावा. – नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा. त्यामुळे केवळ शाकीय वाढ जास्त होते. जमिनीतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये कमी होऊन पाण्याचा व पोषणद्रव्यांचा ताण वाढतो. परिणामी मूळकुजसारख्या रोगांची शक्यता वाढते. – मागील हंगामात मूळकुजचा प्रादुर्भाव आढळलेल्या शेतात कपाशी लावणे टाळावे. दरवर्षी पिकांची फेरपालट करावी. – पीक काढून झाल्यानंतर कपाशींची झाडे व अवशेष ट्रॅक्टरचलित मोबाईल श्रेडरद्वारे अत्यंत बारीक करून त्यावर ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी भुकटी फॉर्म्यूलेशन ५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात फवारणी करावी. हे कुट्टी केलेले वखराने मातीत मिसळून घेतल्यास त्याचे लवकर विघटन होते. – मशागतीवेळी ट्रायकोडर्मा (ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी) (१ टक्का डब्ल्यू. पी. भुकटी) १० किलो प्रति २०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून शेतात पसरवावे.

– पेरणीपूर्व रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक व जिवाणूनाशक किंवा जैविक खते या क्रमाने बीजप्रक्रिया केल्यास मूळकुज रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
-बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी थायरम (७५ टक्के डब्ल्यू.एस.) ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे व जिवाणूजन्य रोगासाठी कार्बोक्सिन (७५ टक्के डब्ल्यू. पी.) १.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बोक्सिन (३७.५ टक्के) अधिक थायरम (३७.५ टक्के डी.एस.) (संयुक्त बुरशीनाशक) ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे, तसेच ट्रायकोडर्मा भुकटी (परजीवी जैवनियंत्रक बुरशी) ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
– शेतामध्ये वाफसा स्थिती राहील, असे सिंचन करावे. ओलाव्याचा ताण पडला तरी मूळकुज रोगाचे प्रमाण वाढते. -रोगग्रस्त रोपे उपटून नष्ट करावी.
– शेतात प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त रोपांसोबतच आसपासच्या रोपांना ट्रायकोडर्मा (ट्रायकोडर्मा हार्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी) (१ टक्का डब्ल्यू.पी.) ५० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यू. पी.) १२ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. किंवा ड्रीपद्वारे मुळाभोवती प्रसारित करावे.

डॉ. शैलेश पी. गावंडे, ९४०१९९३६८५
(वरिष्ठ शास्त्रज्ञ -वनस्पती रोगशास्त्र, पीक संरक्षण विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर)

Cotton Diseases

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top