कृषी महाराष्ट्र

Tur Crop : तूरीमध्ये सिंचन, खत व्यवस्थापन कसे करावे ? वाचा सविस्तर

Tur Crop : तूरीमध्ये सिंचन, खत व्यवस्थापन कसे करावे ? वाचा सविस्तर

 

Tur Crop : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड बुद्रुक येथील राजकुमार नाथाराव भुमरे हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. मागील ८ ते ९ वर्षांपासून ते कोरडवाहू व बागायती अशा दोन्ही प्रकारे तूर पिकाचे उत्पादन घेत आहेत. उत्पादित तुरीच्या विक्रीची घाई न करता मालाची योग्य पद्धतीने साठवण करून बाजारात अपेक्षित दर मिळाल्यानंतर विक्रीचे नियोजन केले जाते. त्यामुळे दर चांगले मिळतात. मागील वर्षी उत्पादित तुरीला साधारण ९००० ते १२ हजार २०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला असल्याचे श्री. भुमरे यांनी सांगितले.

या वर्षी त्यांनी साधारण १५ एकरांत तुरीच्या बीडीएन ७११ तर गोदावरी वाणाची ५ एकरांत लागवड केली आहे. याशिवाय २४ एकरांमध्ये सोयाबीन आणि १३ एकरांत हरभरा लागवड केली आहे. तसेच ८ एकरांत मोसंबी फळबागदेखील आहे. योग्य लागवड नियोजन आणि पीक व्यवस्थापनावर भर देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

लागवड नियोजन

तूर लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत केली जाते. जमिनीची खोल नांगरट करून वखरपाळी दिली जाते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर साधारण जूनच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात पेरणी केली जाते.दरवर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधित बियाणाचा लागवडीसाठी वापर करण्यावर भर दिला जातो. तुरीचे बीडीएन ७११ हे वाण २०१५ तर गोदावरी वाणाचा २०२० पासून लागवडीसाठी वापर करत आहेत. उत्पादन चांगले मिळत असल्याने या दोन्ही वाणांत सातत्य राखले आहे.

या वर्षी साधारण १५ एकरांत तुरीच्या बीडीएन ७११ तर गोदावरी वाणाची ५ एकरांत लागवड केली आहे. त्यासाठी एकरी साधारणतः दीड ते पावणेदोन किलो बियाणे लागले. विद्यापीठातून बियाणे आणल्यामुळे अतिरिक्त बीजप्रक्रिया केला जात नाही. लागवडीसाठी दोन ओळींत ६ फूट तर दोन रोपांत दीड फूट अंतर राखले जाते. पूर्ण लागवड निखळ केली जाते. कोणतेही आंतरपीक घेतले जात नाही. Tur Crop

खत व्यवस्थापन

लागवडीवेळी रासायनिक खतांच्या शिफारशीप्रमाणे मात्रा दिल्या जातात. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. ओल चांगली असल्यास लागवडीवेळीच डीएपी एकरी दीड बॅग दिली जाते. तर ओल कमी असल्यास डीएपी खताची मात्रा दोन वेळा विभागून दिली जाते.

कीड-रोग व्यवस्थापन

तूर पिकामध्ये वाढीच्या अवस्थेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पिकावर दिसून येणारी प्रादुर्भावाची लक्षणे पाहून उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. या वर्षी पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रकर्षाने दिसून आला. त्यासाठी शिफारशीप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव आटोक्यात राखण्यात यश मिळाल्याचे भुमरे सांगतात. Tur Crop

सिंचन व्यवस्थापन

सिंचनासाठी श्री. भुमरे यांच्याकडे ५ विहिरी आहेत. त्यातील उपलब्ध पाण्याचा आवश्यकतेनुसार सिंचनासाठी वापर केला जातो.बागायती गोदावरी वाणास एकआड एक ओळ पद्धतीने सिंचन केले जाते. पहिले पाणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दिले जाते.बीडीएन ७११ या वाणाची लागवड भारी जमिनीत केली आहे. पाऊस आणि जमिनीतील ओल यांचा अंदाज घेऊन या लागवडीत सिंचनाचे नियोजन केले जाते.

आगामी नियोजन

सध्या पीक पोटरी अवस्थेत आहे. पिकामध्ये येत्या काळात पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करून कीटकनाशकांची फवारणी केली जाईल.मागील वर्षी बीडीएन ७११ या तुरीच्या कोरडवाहू वाणापासून ६ ते ७ क्विंटल, तर गोदावरी या बागायती वाणाचे साधारणतः ८ ते ९ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. या वर्षीदेखील अपेक्षित उत्पादन मिळेल, असा आत्मविश्‍वास राजकुमार भुमरे यांना आहे.

Tur Crop

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top