Animal Care : जनावरांतील संसर्गजन्य आजार पावसाळ्यात कसे रोखावे ? वाचा सविस्तर
Animal Care
Animal Infectious Diseases : पावसाळ्यात जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार (Animal Infectious Diseases ) होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. कारण पावसाळ्यात सतत साचणाऱ्या पाण्यामुळे वातावरण दमट बनत. हवेतील ओलसरपणा वाढतो. यामुळे जिवाणू व विषाणूच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत.
त्यामुळे या काळातच जनावरांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची व पसरण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, लाळ्या खुरकूत, फऱ्या हे आजार होतात.
संसर्ग झालेल्या जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असत. हे टाळण्यासाठी जनावरांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी गोठ्यात नेमक्या काय उपाययोजना करायच्या याविषयीची माहिती पाहुया.
पावसाळ्यात गोठा स्वच्छ असावा. खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्यामध्ये उतार काढलेला असावा, जेणेकरून गोमूत्र, पाण्याचा निचरा होईल. गोठ्यातील खाच-खळगे बुजवून घ्यावेत. गोठा जास्तीत जास्त कोरडा ठेवावा.
गोठ्यात सतत ओलसरपणा राहिल्यामुळे जनावरांना खुराचे आजार होतात. गोठ्यामध्ये जमिनीपासून चार ते पाच फुटांपर्यंत चुना लावावा. त्यामुळे गोठा जंतूविरहित राहण्यास मदत होते.
गोठ्यामध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करावी. लहान वासरे, करडे यांना कोरड्या आणि उबदार जागेवर बांधावे. बसण्यासाठी वाळलेले गवत, पाचट किंवा पोत्यांचा वापर करावा.
एखादे जनावर आजारी असल्यावर ते निरोगी जनावरे, लहान वासरांपासून लांब आणि वेगळे बांधावे. अशा जनावरांवर वेळेत उपचार करून घ्यावेत. गाभण जनावर असल्यास गोठ्यामध्ये बसण्यासाठी गवताचा गादी प्रमाणे वापर करावा. Cows
दूध काढण्याची जागा स्वच्छ असावी. दूध काढताना जमिनीवर कुठलाही कचरा अगर शेण असू नये. गोठ्यात ओलसरपणा जास्त प्रमाणात राहिल्यास यामध्ये जंतूची वाढ झपाट्याने होते.
त्यामुळे जनावरांच्या कासेला जंतूसंसर्ग होऊन कासदाह होतो. म्हणून गोठा कोरडा राहील याची काळजी घ्यावी. दूध काढून झाल्यानंतर सड जंतुनाशक द्रावणात बुडवावेत. त्यामुळे सडात होणारा जंतूसंसर्ग टाळता येईल. पावसाळ्यामध्ये जनावरांना नुसता हिरवा चारा न देता आहारात कोरड्या चाऱ्यासह खनिजमिश्रणाचा समावेश करावा.
फक्त कोवळा हिरवा चारा खाल्यामुळे जनावरांमध्ये पोटफुगी सारख्या समस्या उद्भवतात. लसीकरणापूर्वी एक आठवडा आधी जंतनिर्मुलन करावे. त्यानंतर लसीकरण करावे. पशुखाद्य कोरड्या जागी ठेवावे. पशुखाद्याची वारंवार तपासणी करावी जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही. Cows
पावसाळ्यात जनावरांना फऱ्या, घटसर्प, लाळ्या खुरकूत यांसारखे आजार होऊ शकतात. नवीन हिरव्या चाऱ्यामुळे पोटफुगी, जंतांचा प्रादुर्भाव होतो. गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. गोचीड, माश्यांचे प्रमाण वाढते.
त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता वाढते. त्यासाठी त प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरुवातीच्या काळातच आजारांवर प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. अशा प्रकारे गोठा स्वच्छ ठेवून आणि वेळोवेळी पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन जनावरांतील संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवता येतं.
माहिती आणि संशोधन – डॉ. प्रफुल्लकुमार पाटील,पशुवैद्यक व पशुविज्ञान महविद्यालय, उदगीर, जि. लातूर