कृषी महाराष्ट्र

मोल नांगराचा वापर कमी निचऱ्याच्या जमिनीसाठी कसा करावा ? वाचा संपूर्ण माहिती

मोल नांगराचा वापर कमी निचऱ्याच्या जमिनीसाठी कसा करावा ? वाचा संपूर्ण माहिती

 

कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी तसेच पिकांचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी मोल नांगराचा (Mol Plough) वापर केला जातो.

साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्‍टरला (Tractor) जोडून वापरले जाते. प्रत्येकी ४ मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो.

त्यामुळे क्षारपड – पाणथळ जमिनीमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही, त्यांना ही पद्धत उपयुक्त ठरते.

पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. तसेच जमिनीमध्ये मुरलेले अतिरिक्त पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होते.असे साठलेले अतिरिक्त पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर वाहून जाते. मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जातात, याला मोल निचरा पद्धत असे म्हणतात.

हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात. मोल पाडत असताना जमिनी

पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो. त्यामुळे जमिनीखालून एक पोकळ फट तयार होते, त्याला मोल म्हणतात.

मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी. त्यामुळे मोल वाळण्यास वेळ मिळून ते टणक बनतात. Mol Nangar

मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास ३ ते ५ वर्षे टिकू शकते. कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी.

मोल निचरा पद्धत वापरण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ?

  1. जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावे.
  2. जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी ०.२ टक्के असावा. साधारणतः १ ते १.५ टक्के उतार असलेली जमीन मोल निचरापद्धतीसाठी उत्कृष्ट असते.
  3. मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असायला हवे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवरून चालवला जातो.
  4. त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. तसेच ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्‍टर जमिनीमध्ये रूतू शकतो.
  5. यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे, त्या खोलीवरील मातीतील ओलावा साधारणतः २० ते २५ टक्के असावा. Mol Nangar
  6. मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी.
  7. दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे ४ मीटर अंतर ठेवावे. मोलची खोली ४० ते ७५ सें.मी. ठेवावी.
  8. मोलची लांबी सामान्यतः २० ते १०० मीटर ठेवावी.
  9. साधारणतः ७५ किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपावरचा ट्रॅक्‍टर वापरावा. मोल करत असताना ट्रॅक्‍टरचा वेग सामान्यतः १ कि.मी. प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top