Monsoon Update : पुढील २४ तासात मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण !
Monsoon Update
Monsoon Update 2023 : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनच्या हालचालीस अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनची वाटचाल अडखळली होती.
परंतु आता येत्या २४ तासात मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर , अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांचा अधिकचा भाग व्यापणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा मॉन्सूनच्या केरळमधील आगमनाला चार ते पाच दिवस उशीर होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होत असतो. परंतु यंदा ४ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे.
तसेच राज्यातील तुरळक ठिकाणी ३१ मेपर्यंत वादळी पावसाची शक्यता आहे. ३१ मेनंतर मात्र वादळी पावसाचे वातावरण निवळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, हवामानशास्त्र विभागाने २६ मे रोजी मॉन्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशात मॉन्सून कालावधीत म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच जून महिना देशातील काही भागात कमी पावसाचा इशाराही हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
source : agrowon