Weather Forecast : तापमानात पुन्हा वाढ ! हवामान खात्याचा अंदाज
Weather Forecast
पुणे : किमान तापमानात वाढ (Minimum Temperature) झाल्याने राज्यातील थंडी (Cold) गायब झाली आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर सरकला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होणार असून, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. आज (ता. ६) राज्यात कोरड्या हवामान (Dry Weather) राहून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असल्याने राजस्थानातील चुरू येथे सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र थंडी कमी झाली असून, दिवसा ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.
सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ९.९ तापमान नोंदविले गेले. तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४.८ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १६ ते २४ अंशांच्या दरम्यान होता. तर कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
उपसागरात चक्रीवादळाचे संकेत
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून, पूर्व किनाऱ्यालगतच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.१ (१८.५), जळगाव ३१.५ (१९.८), धुळे ३२ (१०.४), कोल्हापूर ३१.६ (२१.२), महाबळेश्वर २५.५(१६.७), नाशिक ३०.४ (१७.८), निफाड ३०.२ (९.९), सांगली ३२.५(२०.५), सातारा ३०.२(२१.४), सोलापूर ३४.२ (२१.४), सांताक्रूझ ३३.६(२३), डहाणू २८.५ (२२.६), रत्नागिरी ३४.८ (२३.५), औरंगाबाद ३० (१७.५), नांदेड – (१८.८), उस्मानाबाद – (१९), परभणी ३१.२ (२०.५), अकोला ३२ (१८.५), अमरावती ३२.४ (१६.७), बुलडाणा ३१ (१८.८), ब्रह्मपुरी ३२ (१५.५), चंद्रपूर २९.८ (१६.६), गडचिरोली ३१.६(१४), गोंदिया २९ (१४.५), नागपूर ३०.६ (१५.४), वर्धा ३०.९(१६), यवतमाळ ३१.५ (१६).
श्रोत :- agrowon.com