कृषी महाराष्ट्र

भरडधान्य लागवड कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर ! वाचा संपूर्ण माहिती

भरडधान्य लागवड कोरडवाहू शेतीसाठी फायदेशीर ! वाचा संपूर्ण माहिती

भरडधान्य लागवड

Millet Crop Cultivation भरडधान्ये ही पोषक आणि आरोग्यासाठी (Millets) उपयुक्त असली, तरी प्रामुख्याने दुर्लक्षित आहेत. काही प्रमाणात त्यांची आदिवासी (Tribal Belt) किंवा दुर्गम पट्ट्यामध्ये लागवड (Millet Cultivation) होते.

त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी असल्यामुळे सध्या भरडधान्याविषयी होत असलेल्या प्रसाराच्या पार्श्‍वभूमीवर वाढत्या मागणीची पूर्तता कशी होणार असा प्रश्‍न आहे.

कारण ही धान्ये आपण शेतकऱ्यांनी पिकवलीच नाही, तर सर्वसामान्यांच्या ताटात येणार कोठून? म्हणजेच या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पिकांच्या लागवडीमध्ये असलेल्या संधी ओळखायला हव्यात. कमी पाण्यावरील ही पिके कोरडवाहू शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला नक्कीच चालना देतील.

राळा (Foxtail Millet)

ओळख : राळ्याचे कणीस झुपकेदार असून, पक्वतेच्या वेळेस कोल्ह्याच्या शेपटीसारखे अर्धगोलाकार होते. म्हणून यास फॉक्सटेल (कोल्ह्याची शेपटी) मिलेट असे म्हणतात. या पिकास जर्मन मिलेट असेही संबोधतात. हिंदीत कागनी, गुजरातमध्ये कांग तर पंजाबमध्ये कंगनी म्हणतात.

राळा हे एकदल प्रकारातील पीक ६० ते १०० सेंमीपर्यंत उंच, तसेच खोड काडीसारखे सरळ वाढते. फुटव्यांची संख्या ४ ते ८ असते. पाने गवताळ असून, लव असते. कणसे १० ते २० सेंमी. लांब, अर्धगोलाकार, केसाळ झुपकेदार असतात. भरडधान्य लागवड

पक्वतेच्या अवस्थेत कणसातील दाणे भरल्यामुळे कणसे खाली झुकतात. ७० ते ९५ दिवसांच्या कालावधीत पीक कापणीस येते. Millet Crop Cultivation

महत्त्व

सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी अनेक भागामध्ये आहारात मुख्य अन्न म्हणून समाविष्ट होते. जगातील एकूण पौष्टिक भरडधान्य उत्पादनात राळा पिकाचा दुसरा क्रमांक असून, अंदाजे सहा दशलक्ष टन उत्पादन होते. पिकाचा वाढीचा वेग जास्त असून, कमी दिवसांत पीक पक्व होते.

दुष्काळी परिस्थितीतही हे पीक तग धरू शकते. मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्यास आकस्मिक पीक नियोजनातही हे पीक महत्त्वाचे ठरू शकते. महाराष्ट्रात राळा पिकाची पेरणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केली जाते. भरडधान्य लागवड

हे धान्य मानवी आहारासोबतच पाळीव पक्ष्यांसाठी उपयोगी आहे. याचा कडबा जनावरांसाठी उपयोगी ठरतो. Millet Crop Cultivation

लागवडीतील ठळक बाबी

बियाणे प्रमाण – हेक्टरी ८ ते १० किलो.

शिफारशीत वाण : पी.एस.-४, एआय.ए.-३२६, ३०८५, ३०८८ आदी.

आंतरपिके – राळा + कापूस (५ : १), तूर (५ : १) ही पद्धती फायदेशीर. ७० ते ९५ दिवसांत काढणीस येते.

उत्पादन- प्रति हेक्टरी धान्य उत्पादन १५ ते १८ क्विंटल, कडबा २० ते ४० क्विंटल.

बाजरी :

-हवामानात तग धरून राहण्याची क्षमता अन्य पिकांच्या तुलनेत चांगली आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी चांगले पीक.

-पाऊस उशिरा, कमी व अनियमित झाला तरी अन्य तृणधान्यांपेक्षा धान्य व चारा यांचे उत्पादन अधिक मिळते.

-सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांत सूत्रकृमी नियंत्रणासाठी फेरपालट म्हणून बाजरी महत्त्वाची आहे.

-निचरा होणारी जमीन. सामू साडेसहा ते साडेसात. पेरणीपूर्वी जमीन भुसभुशीत करून दाबून घट्ट केलेली असावी.

-बियाणे ३ ते ३.५ किलो प्रति हेक्टरी वापरावे.

वाण :

संकरित- फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, बीबीएच- ३, एचबी- १२००

सुधारित- धनशक्ती

उत्पादन- सरासरी २५ ते ३० क्विंटल प्रति हेक्टर

कालावधी ७५ ते ८० दिवसाचे हे पीक आहे.

आरोग्यासाठी महत्त्व

-लोहाचे प्रमाण चांगले, त्यामुळे हिमोग्लोबीन वाढीसाठी महत्त्वाचे.

-ग्लुटेनमुक्त.

-बाजरीपासूनचे पोल्ट्रीखत लेअर पक्ष्यांना दिल्यास अंड्यांमधील अनावश्‍यक कोलेस्टेरॉलचे प्रमाण मका खाद्य वापराच्या तुलनेत कमी असते. भरडधान्य लागवड

नाचणी (Finger Millet)

अन्य नावे : नागली, रागी

आपल्या हाताची बोटे अर्धवट दुमटल्यावर जसा आकार होतो तशाच काहीशा प्रकारच्या आकाराची नागलीची कणसे पक्व झाल्यानंतर दिसतात, म्हणून त्यास इंग्रजीमध्ये फिंगर मिलेट म्हणतात.

भारतासोबत आफ्रिका, मलेशिया, चीन व जपान आदी देशांमध्ये हे पीक घेतले जाते. एकदल वर्गातील मजबूत आणि काटक असे पीक साधारणतः १७० सेंमी. उंच वाढते. फुटव्यांची संख्या ४ ते ८ पर्यंत असते. डोंगर दऱ्यांत आणि उतारावर हलक्या जमिनीत लागवड केली जाते.

अशा दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांचे मुख्य अन्न म्हणून नाचणीचा वापर होतो. महाराष्ट्रात त्याची जवळपास १.१२ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. सरासरी उत्पादकता १०६७ किलो प्रति हेक्टर आहे.

आरोग्यासाठी महत्त्व

-पोषणद्रव्याबाबत नाचणी ही गहू आणि भातापेक्षा सरस आहे.

-यात तंतुमय पदार्थ जास्त आहे.

-रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करत असल्यामुळे मधुमेहीसाठी उपयुक्त.

-नैसर्गिक कॅल्शिअमचा उत्कृष्ट स्रोत. दैनंदिन सेवन केल्यास ‘ओस्टेओपोरोसिस’ या हाडाच्या आजारापासून संरक्षण मिळते.

-नैसर्गिक लोहाचाही उत्तम स्रोत. गर्भाच्या विकासासाठी गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी नाचणीचे सेवन उपयुक्त.

-हृदयरोग, आतड्याचे व्रण यास प्रतिरोध करते.

-गहू व मक्याप्रमाणेच नाचणीमध्येही विघटन न होणारे तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील स्निग्धांचे संतुलित शोषण होते.

-धान्यातील अमिनो आम्ले ‘ॲन्टी ऑक्सिडंट’चे काम करतात.

-आयुर्वेदिकदृष्ट्या नाचणी शीतल, पित्तशामक आहे. रक्तातील उष्ण दोष कमी करते.

-वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित सेवन उपयोगी.

-वाण – फुले नाचणी, दापोली सफेद, फुले कासारी. Millet Crop Cultivation

लागवड तंत्रज्ञान

हवामान – नागली हे पीक उष्ण कटिबंधीय प्रकारातील असून, १२ ते २८ अंश सेल्सिअस तापमान या पिकासाठी योग्य आहे.

तसेच ५० ते १०० से. मी. पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी चांगले पीक येते. भरडधान्य लागवड

जमीन – हे पीक काळ्या, रेताड लाल जमिनीत तसेच हलक्या व डोंगर उताराच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येते.

-या पिकासाठी हलक्या ते मध्यम प्रतीची अधिक सेंद्रिय पदार्थ असणारी, ५.५ ते ८.५ सामू असणारी योग्य निचरायुक्त सुपीक जमीन या पिकास योग्य असते.

-हे पीक सर्व राज्यात विशेषतः खरीप हंगामात घेतले जाते. त्याची खरीप हंगामात जून ते जुलै महिन्यात, रब्बी हंगामामध्ये -सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पेरणी केली जाते.

– सुधारित वाण : व्ही. आर ७०८, व्ही. एल १४९, दापोली १, दापोली सफेद, फुले नाचणी इ.

-उत्पादन : १५ ते २० क्विंटल/हेक्टर

बर्टी (Barnyard Millet)

अन्य नावे : सावा, शमुल, सावऱ्या. हिंदीत झंगोरा नावाने परिचित.

ओळख : हे एकदल वर्गातील पीक असून, ५० ते १०० सेंमी. सरळ उंच वाढते. फुटव्यांची ४ ते ७ पर्यंत संख्या असते. पाने गवताच्या पात्याप्रमाणे सपाट व मऊ, बारीक लव असते. दुष्काळी किंवा अतिपर्जन्यमान असलेल्या भागातही तग धरून राहण्याची क्षमता.

धान्य आणि चारा अशा दुहेरी हेतूने लागवड केली जाते. भारतातील उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, ओडिशा, तमिळनाडू, गुजरात व महाराष्ट्रात लागवड होते. भारतात ०.९३ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून, ०.७३ लाख टन एकूण उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ७५८ किलो प्रति हेक्टरी आहे.

आरोग्यासाठी महत्त्व

-पचनासाठी हलके अन्न म्हणून उपवासात बर्टी भाताप्रमाणे शिजवून खाल्ली जाते. विशेषतः नवरात्रीच्या उपवासासाठी मागणी असते.

-धान्य प्रथिनांचा चांगला स्रोत असून, यातील प्रथिने सहज पचण्याजोगी.

-पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असून शरीरात त्यांचे सावकाश पचन होते. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीतील कमी कष्टाची व बैठे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे.

– यातील नियासिन जीवनसत्त्वामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

– लिनोलिक, पाल्मेटिक आणि ओलिक ही असंपृक्त मेदाम्ले हृदयरोगी व मधुमेहींसाठी उपयुक्त.

– रक्तातील साखरेची आणि लिपीडची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी.

– ग्लुटेनमुक्त असून, ग्लुटेनची ॲलर्जी असणाऱ्यांसाठी उपयुक्त.

लागवड तंत्रज्ञान

– हलकी ते मध्यम जमीन उपयुक्त. पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम.

– उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे पीक. समुद्रसपाटीपासून २७०० मी. उंचीपर्यंतच्या भागात पीक

– वार्षिक पर्जन्यमान २०० ते ४०० मिमी. आवश्यक.

– खरीप हंगाम. लागवड पेरणी पद्धतीने. जास्त पावसाच्या प्रदेशात रोप लागवड.

– बियाणे- ३ ते ४ किलो हेक्टरी.

-आंतरपीक पद्धती – बर्टी अधिक राजमा (४ : १) प्रमाणात फायदेशीर.

-वाण- फुले बर्टी, व्हीएल २०३

-उत्पादन- हेक्टरी धान्य १८ ते २० क्विंटल, कडबा- २० ते २५ क्विंटल.

कोडो (Kodo Millet)

अन्य नावे – कोद्रा, पायगवत, भातगवत, खडक बाजरी.

संस्कृत – कादेरा, कन्नड – हर्का

सुमारे तीन हजार वर्षांपासून भारतात या पिकाची लागवड केली जाते. गुच्छेदार गवताप्रमाणे ९० सेंमी.पर्यंत उंच वाढते. लघू पौष्टिक तृणधान्यापैकी याचे धान्य सर्वांत जाडे भरडे असून, तंतुमय पदार्थाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे.

१०० ते ११० दिवसांत ते परिपक्व होते. भारतात जवळपास १.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आहे. त्यातून ०.८४ लाख टन उत्पादन मिळते. सरासरी उत्पादकता ४२९ किलो प्रति हेक्टर आहे.

आरोग्यासाठी महत्त्व :

-भरपूर तंतुमय पदार्थांमुळे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चांगले.

-ॲन्टी ऑक्सिडेंटचे प्रमाण चांगले असल्याने मधुमेही लोकांच्या आहारात भाताला पर्याय म्हणून कोडोची शिफारस वैद्यकीय तज्ज्ञ करतात.

-यात लेसिथिनची मात्रा अधिक असून, ते मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

-महिलांमधील रजोनिवृत्तीनंतर होणारा हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टोरॉल यापासून मुक्ततेसाठी या धान्याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते.

-ग्लुटेन मुक्त.

लागवड तंत्रज्ञान-

-हलक्या, खडकाळ मुरमाड जमिनीपासून ते पोयट्याच्या जमिनीत येते. खोल पोयट्याच्या आणि कसदार जमिनीत अधिक उत्पादन मिळते. चांगल्या निचऱ्याची जमीन उत्तम ठरते.

-उष्ण व समशीतोष्ण प्रदेशात येणारे हे पीक आहे. दुष्काळात तग धरून राहण्याची क्षमता आहे. त्यामुळे कमी आणि अनिश्‍चित पाऊस पडणाऱ्या ठिकाणी लागवडीस उपयुक्त.

-वार्षिक पर्जन्यमान ४०० ते ५०० मिमी असणाऱ्या प्रदेशात लागवड करतात.

– खरीप हंगामात पेरणी पद्धतीने लागवड करतात.

– बियाणे प्रमाण १० ते १२ किलो प्रति हेक्टरी.

-सुधारित जाती : जीपीके-३, जेके-१३, जेके-६५

-आंतरपिके- कोडो अधिक मूग, कोडो अधिक तूर, कोडो अधिक सोयाबीन ही २ : १ या प्रमाणात फायद्याचे.

-उत्पादन – हेक्टरी धान्य १५ ते २० क्विंटल, तर कडबा ३० ते ४० क्विंटल. Millet Crop Cultivation

वरई (Little Millet)

अन्य नावे : वरी, कुटकी

ओळख :

धान्याचा आकार सर्वांत लहान असल्यामुळे इंग्रजीमध्ये ‘लिटल मिलेट’ या नावाने ओळखतात. भारतातील पारंपरिक पिकांपैकी एक असलेल्या या पिकाची महाराष्ट्रात अमरावती (चिखलदरा, धारणी), नगर (अकोले), नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इ. भागांत लागवड केली जाते.

दुर्गम प्रदेशातील लोकांचे प्रमुख अन्न असलेल्या या धान्याची अन्यत्र ओळख ही उपवासासाठीचे अन्न म्हणून अधिक आहे.

एकदल प्रकारातील या पिकाची उंची ३० ते १५० सेंमीपर्यंत असते. पाने गवताच्या पात्यांप्रमाणे असून, मऊ किंवा त्यावर लव असते. खोड काडीसारखे बारीक व सरळ वाढणारे आहे.

भातासारखी यास फुले येत असून, चार ते पाच सेंमी लांबीच्या लोंब्या येतात. दुष्काळजन्य परिस्थितीत तग धरणारे हे पीक अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशातही चांगले उत्पादन देते.

आरोग्यासाठी महत्त्व :

भगरीमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण भरपूर आहे. सर्वसामान्य लोक केवळ उपवासादिवशी खातात. गहू, भाताला पर्याय म्हणून दैनंदिन आहारात समावेश करायला हवा.

-बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारावर उपयुक्त.

-अधिक तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक.

-शरीरात साठलेल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावते.

लागवड तंत्रज्ञान :

अनुकूल हवामान – वार्षिक पर्जन्यमान- २५०० मिमी.

समुद्रसपाटीपासून २१०० मी. उंचीपर्यंत प्रदेशात होते.

वाढीसाठी पोषक तापमान- २३ ते २७ अंश सेल्सिअस.

जमीन- हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन असावी. अतिशय हलक्या जमिनीत चांगले उत्पादन मिळत नाही. उताराच्या जमिनीमध्ये लागवड करताना मशागत आणि लागवड उताराच्या आडव्या दिशेने करावी. रोप लागवड पारंपरिक आणि प्रचलित पद्धत आहे.

रोपवाटिका- एक एकर क्षेत्र लागवडीसाठी २ ते ३ गुंठे क्षेत्र, ८ ते १० सेंमी. उंच व उतारानुसार लांबी ठेवावी.

बीजप्रक्रिया आवश्‍यक आहे.

लागवडीनंतर पावसाचा खंड पडल्यास २० ते २५ दिवसांनी पहिले आणि ४० ते ४५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

लागवडीनंतर एक महिन्याच्या आत गरजेनुसार खुरपणी आणि कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. आवश्यकतेनुसार तणनाशक वापरावे.

आंतरपीक म्हणून उडीद, तीळ, सोयाबीन, तूर, कारळा ही पिके २ ते १ या प्रमाणात घेता येतात.

सुधारित वाण : फुले एकादशी

उत्पादन : सरासरी धान्य उत्पादन हेक्टरी १२ ते १४ क्विंटल, कडबा उत्पादन २० ते २५ क्विंटल.

कालावधी- १२० ते १३० दिवस.

प्रा. मयूरी अनूप देशमुख, ९२८४५२२२८४ (मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top