कृषी महाराष्ट्र

Market Update : सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Market Update : सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

कापूस भाव निचांकी पातळीवरच

देशातील कापूस लागवड आतापर्यंत गेल्यावर्षीच्या पातळीवर पोचली. तर दुसरीकडे कापूस दरावरील दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे कायम आहेत. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंजवर कापसाचे वायदे ८४.२१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारात आजही कापसाला ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाचे भाव पुढील काळातही याच पातळीच्या दरम्यान कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांदा भावपातळी कायम

कांदा बाजारात सध्या आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. राज्यातील बहुतांशी भागात जोरादर पावसाची हजेरी सुरु आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा कांदा भीजत आहे. हा कांदा बाजारात येत असून काही मालात ओल अधिक दिसते. त्यामुळे कांद्याचे भाव १ हजार रुपये प्रतिक्विंटलपासून सुरु होतात. तर सरासरी भाव १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळात बाजारातील कांदा आवक कमी होत जाण्याची शक्यता आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गवारचे भाव तेजीत

राज्यातील बाजारात सध्या गवारची आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे गवारला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत. सध्या गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. गवारचे भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतात. कारण बाजारातील आवक लगेच वाढण्याची शक्यता कमीच आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गव्हाच्या दरातील वाढ टिकून

सरकार गव्हाची विक्री करत असले तरी बाजारातील गव्हाचे भाव वाढलेल्या पातळीवरच आहेत. सध्या बाजारातील गव्हाची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे गव्हाच्या भावाला आधार मिळाला. सध्या गव्हाचे भाव सरासरी २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही गव्हाची बाजारातील आवक मर्यादीत राहून दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे कसे आहेत ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा टिकून होती. रशिया आणि युक्रेनमध्ये निर्यातीच्या मुद्द्यावरून पुन्हा मतभेद झाल्याने सूर्यफुल तेलाचे भाव वाढले आहेत. पामतेलाने पुन्हा ४ हजार रिंगीटचा टप्पा पार केला. कच्च्या पामतेलाचे भाव ४ हजार ५५ रिंगीट प्रतिटनांवर आहेत. त्यामुळे सोयातेलाला आधार मिळाला. सोयातेलाच्या वायद्यांमध्ये मागील चार दिवसांमध्ये ३ सेंटची वाढ झाली. सोयातेलाच्या वाद्यांनी आता ६३.०८ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा पार केला. सोयाबीनचे वायदे १४.१५ डाॅलरवर पोचले होते. विशेष म्हणजेच शुक्रवारनंतर बाजारा आज उघडल्यानंतरही वायदे १४ डाॅलरपेक्षा जास्त राहीले.

सोयापेंडे वायदेही ४०० डाॅलरपेक्षा वरच्या पातळीवर टिकून आहेत. सोयापेंडच्या वायद्यांनी आज दुपारपर्यंत ४१२ डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळाला. सध्या जागतिक बाजारात ब्राझीलचे सोयाबीन येत आहे. पण अमेरिकेतील सोयाबीन पुरवठ्याबाबत सध्या सकारात्मक चित्र नाही. पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे यंदाही अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे सोयाबीन सप्टेंबरपासून बाजारात येते. अमेरिकेच्या सोयाबीनला चांगला दर मिळत असल्यास भारतीय सोयाबीनलाही फायदा होऊ शकतो, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

source : agrowon

Market Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top