Monsoon Update : यंदा एल निनो अन् मॉन्सून कसा असणार ? वाचा सविस्तर
Monsoon Update
Weather Update : मागील आठवड्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात त्यात ५ टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते.
तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी- इंडियन ओशन डायपोल) हा मॉन्सून कालावधीत ‘धन’ (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यंदाचा मॉन्सूनच्या (Monsoon) पावसाची स्थिती आणि तत्पूर्वी सध्याचा उन्हाळा या विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यातील स्थिती
– या वर्षी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत कमाल तापमानाचा विचार करता, कोकण, सह्याद्री घाटमाथा व पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के भागांत सरासरी इतकेच तापमान राहण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उन्हाळा आल्हाददायक असण्याची शक्यता जाणवते.
मात्र उर्वरित कोकण (मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत) व सह्याद्रीचा घाटमाथा (पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, मावळ, मुळशी, पोलादपूर, महाबळेश्वर, पाटण, शाहूवाडी, बावडा ते चांदगडपर्यंत) तसेच पूर्व विदर्भातील (भंडारा, गोंदिया, गडचिरोली) जिल्ह्यांत दुपारचे कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता जाणवते. याचा अर्थ महाराष्ट्रातील २० टक्के भागांत कडक उन्हाळा जाणवण्याची शक्यता आहे. Monsoon Update
– संपूर्ण उन्हाळ्यातील किमान तापमान बघता कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ६५ टक्के भागांत पहाटेचे किमान तापमान हे सरासरी इतकेच राहण्याची अधिक आहे. म्हणजेच या भागांत पहाटेच्या वेळी गारवा जाणवेल, असे वाटते.
उर्वरित कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांत पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत पहाटेच्या वेळी तुलनेने कमी गारवा जाणवेल, असे दिसते. Monsoon Agriculture
– एकंदरीत संपूर्ण उन्हाळ्यात मुंबई, ठाणे, रायगड, खानदेश, नाशिक, नगर व विदर्भातील जिल्ह्यांत १ ते २ दिवस उष्णतेची लाट येण्याची तुरळक शक्यता आहे. अन्यथा नाहीच.
एल-निनो आणि पावसाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाचा सर्वसाधारण म्हणजेच ९६ टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजात त्यात ५ टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते. म्हणजेच यंदा सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. देशात ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा सरासरी पाऊस मानला जातो.
– मॉन्सून कालावधीत ‘एल -निनो’ विकसित होण्याच्या शक्यतेसह भारतीय महासागरात ‘धन’ (पॉझिटिव्ह) (आयओडी- इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे. या सर्व शक्यता पाहता, देशात सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता दिसून येते.
कारण एक पावसाला मारक तर दुसरा पावसाला तारक ठरतो. पॉझिटिव्ह आयओडी हा देशाचा ‘ला-निना’ समजला जातो.
– भारतीय हवामान खाते ‘धन’ आयोडी व व रशिया, नॉर्वे स्वीडनच्या उत्तरेकडील युरेशियात कमी टक्केवारीत झालेल्या बर्फबारीच्या आधारे यंदा मॉन्सून पावसाला अनुकूल दोन घटकांच्या आधारे एल-निनो वर्षात देशात सामान्य मोसमी पावसाचे भाकित केले आहे.
यात आगाऊ भाकित करणे शक्य नसलेल्या घटकाचा देखील समावेश होतो. तो म्हणजे पावसाळ्यात पडणाऱ्या क्वान्टम पावसाचे वितरण समप्रमाणात झाल्यास नक्कीच हा तिसरा घटकही सामान्य पावसासाठी मदत करू शकतो.
इंडियन ओशन डायपोल (आयओडी) म्हणजे काय ?
– अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरील (साधारण २०० फूट खोलीपर्यंत) एका ठिकाणचे पाण्याचे तापमान त्याच्या निरीक्षण काळातील सरासरी तापमानापेक्षा (सरासरी व प्रत्यक्ष तापमान या दोघांतील काढलेल्या फरकानंतर आलेला अंक) अधिक किंवा उणे म्हणजे धन किंवा ऋण अंक (उदा. +४ किंवा +३ किंवा इतर अंक).
– अरबी समुद्रातील विविध ठिकाणच्या तापमानाच्या नोंदी घेऊन पुन्हा त्यांची अरबी समुद्रासाठी एक सरासरी आकडा काढला जातो. जो धन किंवा ऋण असू शकतो. अशाच प्रकारे बंगालच्या उपसागरातील पृष्ठभागातील पाण्याच्या तापमानाची वरीलप्रमाणे एक आकडा काढला जातो.
थोडक्यात, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमानाचा फरकाचे दोन वेगळे आकडे आणि त्यांच्या सरासरी तापमानापासून सरकलेले विसंगत तापमान व त्यांच्यातील फरकावरून कोणता महासागर सापेक्षतेने थंड किंवा गरम आहे ते कळते. त्यावरून ‘आयओडी’ च्या धन, ऋण व तटस्थ अवस्था ठरतात.
– जेव्हा अरबी समुद्राचे पाण्याचे तापमान हे बंगालच्या उपसागरातील पाण्यापेक्षा अधिक जास्त असते, त्या वेळी ‘इंडियन ओशन डायपोल (आयओडी) देशात पाऊस पडण्यास अनुकूल म्हणजेच ‘धन आयओडी’ समजला जातो. आणि याउलट स्थिती असेल, तर देशात पाऊस पडण्यास प्रतिकूल म्हणजेच ‘ऋण आयओडी’ समजले जाते.
आणि दोन्ही महासागरांचे तापमान एकसमानच राहिल्यास, ते देखील देशात पाऊस पडण्यास अनुकूल काल असलेला ‘तटस्थ आयओडी’ समजला जातो.
– विदेशांतील काही खासगी संस्थांद्वारे पावसाळ्यात एल-निनोची शक्यता ही ८० टक्के इतकी वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच एल-निनोच्या शक्यतेमुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते ६० टक्के एल-निनो वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. २००१ ते २०२० या २० वर्षांच्या कालावधीत २००३, २००५, २००९, २०१०, २०१५, २०१६, २०१७ या ७ वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
परिणामी, दुष्काळ स्थितीला सामोरे जावे लागले. साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यांत पावसाचे दिवस अधिक असतात. जून व सप्टेंबर महिन्यांत मोसमी पावसाचे आगमन व निर्गमन स्थिती असल्यामुळे या काळात पावसाचे दिवस कमी असतात. त्यातही अलीकडील काही वर्षांत मॉन्सूनच्या उशिरा आगमनामुळे पावसाचे दिवस आणखी कमी होतात. त्यामुळे चिंतेची स्थिती आहे. Monsoon Update
महाराष्ट्रातील स्थिती
– राज्याचा विचार करता, यंदा मॉन्सून काळात ‘टरसाइल’ प्रकारनुसार सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता दर्शविली जात असली, तरी तो सरासरी इतकाच होण्याची शक्यता आहे.
याशिवाय गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यात यंदा मॉन्सून काळात ‘टरसाइल’ प्रकारानुसार सरासरी इतका तर केरळ, तमिळनाडू, सीमांध्र जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणीपूर, मिझोरम राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची सर्वाधिक शक्यता आहे.
– महाराष्ट्रात पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीतील क्षेत्रफळभारित सरासरी पाऊस हा अंदाजे १०० सेंमी च्या आसपास समजावा. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
सरासरीच्या ९० ते ९५ टक्के या दरम्यानचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी मानला जातो. म्हणजेच यंदा राज्यात ९० ते ९५ सेंमी इतका क्षेत्रफळभारित सररासरी पाऊस अपेक्षित आहे.
– मात्र या सर्व शक्यतांमध्ये देखील मॉन्सूनचे उशीरा आगमन व आगमनानंतर कमकुवत मॉन्सूनचा रेटाप्रवाह आणि पावसाचे असमान वितरण या तीन गोष्टींवरून क्षेत्रफळभारित सरासरी पाऊस हा ९० सेंमीपेक्षा कमी पावसाची शक्यता दर्शवते. Monsoon Update Monsoon Update Monsoon Update Monsoon Update Monsoon Update Monsoon Update
सरासरी ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस हा ‘टंचाई’ प्रकारात मोडला जातो. शेतीसाठी ही दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यताही नाकारता येत नाही.
वरील तीन घडामोडी या जर-तरच्या शक्यतेवर आधारित आहेत. तीन नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेत जरी बदलल्या तरी विशेष फरक पडणार नाही.
तरी देखील पाऊस हा फार तर देशात पडणार तसा महाराष्ट्रतही सरासरीइतका पाऊस पडू शकतो म्हणजे फार सुकाळ स्थिती समजू नये. एकंदरीत एल-निनोचा धसका न घेता, मॉन्सून वेळेवर आला तरी खरिपात कमी कालावधीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे नियोजन करावे.
संपर्क – माणिकराव खुळे, ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५, (ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे)
How will El Nino and Monsoon be this year