रब्बी पीकपेरा नोंदणी ई-पीक पाहणी अंतर्गत सुरू
नांदेड : ई-पीक पाहणी (EPeek Pahani) अंतर्गत रब्बी हंगाम (Rabi Season) २०२२-२०२३ साठी पीकपेरा नोंदणीची (Crop Sowing Registration) सुरुवात झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून पेरा नोंदणीसाठी सुधारित वर्जनचे ॲप तयार केले आहे. शेतकऱ्यांनी पीकपेरा नोंदणी करण्याचे आवाहन महसूलसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्र शासनाचा ई-पीकपाहणी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी अंतर्गत खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करून या प्रकल्पास प्रतिसाद दिला होता. याप्रमाणेच रब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये ई-पीकपाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
यात गहू, हरभरा, करडई, राजमा, रब्बी ज्वारी, मका, तीळ, सूर्यफूल आदी पिकांचा पेरा नोंदता येणार आहे. या सुधारित ॲपमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे अक्षांश व रेखांश समाविष्ट करण्यात आले आहे.
पेरा नोंदणीसाठी पिकाचा फोटो घेताना ते फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. शेतकरी पेरा नोंदणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्याबाबतचा संदेश मोबाईल ॲपमध्ये दर्शविण्यात येणार आहे.
या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किंवा नाही हे लक्षात येईल. यामुळे पेरा नोंदविण्यासाठी आता त्या क्षेत्रातच जाऊन पेरा नोंदवावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदलेला पेरा स्वयंप्रमाणित मानण्यात येऊन, त्याची गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंद होणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बीतील सर्वच पिकांचा पेरा ई-पीकपाहणी अंतर्गत नोंद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरभरा विक्रीसाठी पेरा नोंदणी गरजेची.
शेतकऱ्यांना किमान हमी दरानुसार हरभरा शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी विक्रीपूर्व नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर पीकपेऱ्याची नोंद आवश्यक आहे. अन्यथा, नोंदणी करता येणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात जाऊन पीकपेरा नोंदणी करणे गरजेचे आहे.
स्रोत : agrowon.com