प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या २५ हजार १०२ शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर
सांगली : ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election) आचारसंहिता संपताच महात्मा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत (Farmer Loan waive) प्रोत्साहन अनुदानासाठी (Farmer Incentive Scheme) पात्र ठरलेल्या २५ हजार १०२ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील २३ हजार ६३ व अन्य बँकांकडील २ हजार ३९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दुसऱ्या यादीत समाविष्ट नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणानंतर सुमारे ७५ कोटी रुपयांचे अनुदान बँक खात्यावर जमा होईल. निवडणुकीमुळे दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर प्रोत्साहन अनुदानाची यादी जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, जिल्ह्यातील अद्यापही नियमित कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ७९५ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांची माहिती शासनाने पोर्टलवर ‘अपलोड’ केली आहे. त्यातील ६२ हजार ६४२ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करत या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आला..
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारी (ता. २२) शिथिल होताच राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील नियमित कर्जदारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील २५ हजार १०२ शेतकऱ्यांची दुसरी यादी आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील २३ हजार ६३ व अन्य बँकांकडील दोन हजार ३९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आधार प्रमाणिकरणानंतर सुमारे ७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. दरम्यान, दिवाळीपूर्वी ६१ हजार ८५६ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. त्यापैकी ५६ हजार १२७ शेतकऱ्यांना अनुदानाचे २०५ कोटी रुपये त्यांच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात आले.पहिल्या यादीतील आधार प्रमाणिकरण न झालेल्या एक हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील काही शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध न केल्याने या तक्रारी प्रलंबित आहे.
दुसऱ्या यादीतील प्रोत्साहन अनुदान शेतकरी
बँक शेतकरी संख्या
जिल्हा मध्यवर्ती बँक २३,०६३
बँक ऑफ इंडिया ५४४
बँक ऑफ बडोदा २६४
बँक ऑफ महाराष्ट्र ३३९
स्टेट बँक ऑफ इंडिया ३२५
युनियन बँक २२९
स्रोत : agrowon.com