कृषी महाराष्ट्र

‘एसआरटी’ तंत्र : भाताशिवाय अन्य पिकांतही वापरले ! वाचा संपूर्ण

‘एसआरटी’ तंत्र : भाताशिवाय अन्य पिकांतही वापरले ! वाचा संपूर्ण

‘एसआरटी’ तंत्र : भाताशिवाय

केवळ भात पिकामध्ये सगुणा राइस तंत्र (Saguna Rice Technology), अर्थात एसआरटी तंत्राचा (SRT Technology) वापर शेतकरी करत होते. मात्र कापूस (Cotton), सोयाबीन (Soybean), मका, तूर अशा अन्य पिकांमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर असून, त्याच्या प्रसारासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत, अर्थात पोकराने विशेष पुढाकार घेतला. आता राज्यातील केवळ कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील ५ हजारांहून अधिक शेतकरी भात पिकात, तर १ हजारांवर शेतकरी कापूस, सोयाबीन, मका, तूर इत्यादी पिकांमध्ये हे तंत्र शेतकरी अवलंबत आहेत.

नांगरणी आणि इतर मशागत न करताही चांगले पीक उत्पादन घेता येत असल्याचे चंद्रशेखर भडसावळे यांच्या एसआरटी तंत्राने भातशेतीत दाखवून दिले. मशागतीचा खर्च वाचतो. सोबतच सेंद्रिय कर्ब वाढून, गांडुळे आणि अन्य सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी या शून्य मशागत पद्धतीस पोकरा प्रकल्पांतर्गत प्रोत्साहन देण्यात आले. राज्यात सर्व विभागांत सर्व पिकांचे मिळून जवळपास ७५०० एकर क्षेत्र एसआरटी तंत्राखाली आले असल्याची नोंद सगुणा रूरल फाउंडेशन (चंद्रशेखर भडसावळे) आणि पोकराकडे आहे.

विभागनिहाय एसआरटी तंत्रावरील शेती (हेक्‍टरमध्ये)

विदर्भ ४०० हे.
मराठवाडा- ८०० हे.
कोकण- ६०० हे.
पश्‍चिम महाराष्ट्र-११०० हे.
खानदेश- १०० हे.

इतर पिकांत तंत्र स्वीकारात औरंगाबाद आघाडीवर

कन्नड तालुक्‍यातील डोंगर माथ्यावरील माळेगाव ठोकळ गावातील शेतकऱ्यांनी हनुमानाच्या मंदिरात शेत न नांगरण्याची शपथ घेतली. यातूनच औरंगाबाद जिल्ह्यात एसआरटी तंत्राचा स्वीकार वाढत गेला. भात वगळता कापूस, सोयाबीन, तूर, सूर्यफूल, हरभरा, मका, गहू, भाजीपाला, वाल, भुईमूग इ. पिकांमध्ये एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. भातामध्ये २०११ पासून, इतर पिकांमध्ये या तंत्राची उपयुक्तता तपासण्यासाठी पोकरा प्रकल्पाने शेतीशाळा घेतल्या.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर २०१९ मध्ये काम सुरू केले. कापूस पिकामध्ये हे तंत्र फायदेशीर दिसून आले. सोबत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागांतील जिल्ह्यांमध्ये या तंत्राचा प्रसार पोकरा प्रकल्पांतर्गतच सुरू झाला. सर्वांत प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्‍यातील टापरगाव येथे कपाशी पिकात हे तंत्र वापरले गेले. त्यानंतर सिल्लोड, फुलंब्री आदी जिल्ह्यांत कपाशी, मका, सोयाबीन, हरभरा, उन्हाळी बाजरी, सूर्यफूल, कांदा, रब्बी ज्वारी आदी पिकातही शेतकरी हे तंत्र वापरू लागले आहेत.

२००० शेतकऱ्यांच्या भेटी

एसआरटी तंत्रज्ञानाचे फायदे अन्य शेतकऱ्यांना समजावेत, यासाठी राज्यातील १७ जिल्ह्यांतून औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, फुलंब्री, सिल्लोड येथे खास अभ्यास दौरे आयोजित केले गेले. त्याचा लाभ दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला.

‘एसआरटी’ तंत्र वापराचे परिणाम

– मोठे पाऊस झाले किंवा पावसात खंड पडला, तरी पिकाला फारसा फटका बसला नाही
– जमिनीचा पोत सुधारण्यास मदत.
– उत्पादनामध्ये २० – २५ टक्के वाढ
– जमिनीची जलधारण क्षमता वाढली.
– एकरी उत्पादन खर्चामध्ये ४५ ते ५० टक्‍क्‍यांची बचत.

पोकराने तंत्रज्ञान रुजविण्यासाठी असे केले प्रयत्न
– त्रिसूत्री कार्यक्रम आखला.
– सगुणा बाग, नेरळ येथे कृषी विभागातील ५०० अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले
-जे शेतकरी सलग दोन हंगाम मशागत न करता पिके घेतील त्यांना प्रोत्साहनपर ८०० रुपये प्रति एकर अनुदान जाहीर केले आहे.

‘‘माती हे महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन असून, सेंद्रिय कर्ब त्याचा आत्मा आहे. माती सशक्त असली तरच पिकांची उत्तम वाढ होते. सातत्याने केलेल्या मशागतीमुळे सेंद्रिय कर्ब कमी होत आहे. तो वाढवण्याचा शाश्‍वत उपाय म्हणजे नांगरणीसह मशागत थांबवणे होय.
-विजय कोळेकर, कृषी विद्यावेत्ता पोकरा

जमीन चोपण आणि मध्यम खोलीची, फार उत्पादन न देणारी. पण २०१९ पासून मशागत थांबवली, नांगर, वखर सगळ बंद. बेडवर कापूस, झेंडू, मका घेत आहे. आता जमिनीची प्रत सुधारत आहे, कारण या सगळ्या पिकांची आणि तणांची मूळ जमिनीतच कुजत आहेत. मी पिकांची कापणी करतो, मुळासकट काढत नाही. आणि तणांसाठी तणनाशके फवारतो. या सर्वांचा परिणाम आमच्या जमिनी अधिक सुपीक बनत आहेत.
अतुल रावसाहेब माहिते,टापरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद

दोन वर्षांपासून फळ पिकात तसेच खरीप पिकात एसआरटी तंत्राचा वापर सुरू आहे. चांगले परिणाम दिसून आल्याने या तंत्राचा वापर पुढेही अविरत करण्याचा निर्णय घेतला आहे.
-अनंतराव चनखोरे, बोरी, ता. मेहकर, जी. बुलडाणा

औरंगाबाद : जिल्ह्यातील माळेगाव ठोकळ येथील भीमसेन ठोकळ यांच्या शेतातील एसआरटी तंत्रावर आधारित मका पीक.
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील बोरी येथील अनंतराव चव्हाण खोरे यांच्या शेतातील एसआरटी तंत्रावरील भाजीपाला वर्गीय पिके.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top