SugarCane Trash : उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत निर्मिती कशी करावी ?
उसाच्या पाचटापासून
ऊसतोड झाल्यानंतर उसाचे पाचट (SugarCane Trash ) जाळून टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. त्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया जातात. शिवाय जमीन भाजली गेल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा नाश होतो. पाचट जाळण्याची मानसिकता बदलून पाचटापासून सेंद्रिय खत तयार केल्यास त्यातून खताची उपलब्धता होऊ शकते. ऊस उत्पादन खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रासायनिक खतांचा असंतुलित पद्धतीने वापर केला जातो. त्यातून ऊस पिकाखालील क्षेत्र क्षारपड होण्याचा धोका आहे. उसापासून दर हेक्टरी ७ ते ८ टन पाचट उपलब्ध होते. या पाचटाचे सेंद्रिय खत बनविणे हा चांगला पर्याय आहे.
मराठवाड्यात उसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे. ऊस तोड झाल्यानंतर शेतात भरपूर पाचट उपलब्ध होते. पाचटापासून शेतामध्येच सेंद्रिय खत तयार केले तर जमीन सुपीकतेसाठी फायदेशीर ठरते. शेतकरी हे पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूचा नाश होतो.
तसेच पाचटांमधून अन्नद्रव्यांचा देखील नाश होतो. उसाच्या मुळाला उष्णतेची झळ बसल्यामुळे त्याचा फुटव्यावर विपरीत परिणाम होतो. पाचट कुजवून सेंद्रिय खत कसे तयार करावे याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले तंत्र पाहूया.
या पद्धतीने बनवा सेंद्रिय खत
खोडवा उसामध्ये शेतातील पाचट खोडव्यातील सरीमध्ये समप्रमाणात पसरावे.
त्यानंतर एकरी एक बॅग युरिया व एक बॅग सुपर फॉस्फेट दहा टन उसाची मळी व शेवटी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरावे.
त्यानंतर खोडव्याच्या बगला फोडून माती पाचटावर पसरावी.
काही पाचट उघडे राहिल्यास पाणी देताना उघडे पडलेले पाचट दाबून टाकावे.
त्यानंतर पिकाला नेहमीच्या पद्धतीने पाणी व खते द्यावीत.
तीन-चार महिन्यात संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते.