कृषी महाराष्ट्र

उन्हाळी भुईमुग लागवड संपूर्ण माहिती

उन्हाळी भुईमुग लागवड संपूर्ण माहिती

उन्हाळी भुईमुग लागवड

उन्हाळी भुईमुग लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी. पेरणीस उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते. लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड करावी.

भुईमूग हे एक प्रमुख तेलबिया पीक (Oilseed crop) म्हणून ओळखले जाते. हे एक शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने जमिनीची सुपीकता वाढते. त्यामुळे पिकाची फेरपालट व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळी भुईमूग (Groundnut) पिकाची सुधारित पद्धतीने लागवड होणे गरजेचे आहे.

खरीप हंगामातील (Rabbi Season) भुईमुगाचे उत्पादन (Groundnut Production) मुख्यत : पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. खरीप हंगामातील पीक कीड व रोगांना जास्त बळी पडते. त्यामुळे खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते. उन्हाळी भुईमुग लागवड

उन्हाळी हंगामातील उष्ण व भरपूर सूर्यप्रकाश भुईमूग पिकास मानवते. ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी तसेच फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग लागवड फायदेशीर ठरते.

उत्पादकता वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी :

१) लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम व कीड, रोगास प्रतिकारक सुधारित वाणांची निवड.

२) प्रमाणित बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर.

३) प्रति हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित राखणे.

४) बीजप्रक्रिया, खते, जिवाणू संवर्धक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर.

५) वेळेवर तण, रोग व कीड नियंत्रण.

६) योग्य सिंचन व्यवस्थापन.

जमीन :

१) समपातळीतील मध्यम ते हलकी, चांगला निचरा होणारी तसेच वाळू, चुना व सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन लागवडीसाठी निवडावी.

२) जमीन भुसभुशीत असल्यास हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. आऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होते आणि शेंगा चांगल्या पोसल्या जातात.

हवामान :

१) हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून, भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते.

२) कायिक वाढीसाठी २७ ते ३० अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.

पूर्वमशागत :

१) भुईमुगाची मुळे, उपमुळे व मुळांवरील गाठींची योग्य वाढ तसेच शेंगा चांगल्या पोसण्यासाठी जमीन मऊ व भुसभुशीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी.

बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची १५ ते २० सेंमी खोल नांगरट करावी. जास्त खोल नांगरणी करणे टाळावे. कारण जास्त खोल नांगरणीमुळे जमिनीच्या खोल थरांमध्ये शेंगा तयार होतात. त्यामुळे शेंगाची काढणी अवघड बनते.

२) नांगरटीनंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी ५ ते ७ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरवून घ्यावे.

पेरणीची वेळ :

१) उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी. पेरणीस उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते. रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावर पेरणीस सुरुवात करावी.

बियाणे प्रमाण :

१) पेरणीसाठी हेक्टरी साधारणपणे १०० ते १२५ किलो बियाणे पुरेसे होते.

२) बियाण्याचे प्रमाण ठरविताना निवडलेला वाण, हेक्टरी रोपांची संख्या, बियाण्याचे १०० दाण्याचे वजन, उगवणक्षमता व पेरणी अंतर इत्यादी बाबींचा विचार करावा.

३) फुले उन्नती, एस.बी.-११ टीएजी-२४ व टीजी-२६ या उपट्या वाणाचे १०० किलो बियाणे वापरावे. टीपीजी-४१, जेएल-७७६, जेएल-५०१ या वाणाचे १२० ते १२५ किलो तर निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी ८० ते ८५ किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे.

उन्हाळी हंगामासाठी सुधारित वाण :

वाण—कालावधी (दिवस)—सरासरी उत्पादन (क्विं/हे.)—शिफारस

१) फुले उन्नती—१२० ते १२५—३० ते ३५—उपटा वाण. लाल रंगाचे दाणे. तेलाचे प्रमाण ५२ टक्के. स्पोडोप्टेरा अळी, तांबेरा, पानांवरील ठिपके, खोडकुज रोगास मध्यम प्रतिकारक. गडद हिरव्या पानामुळे पाण्याच्या ताणास सहनशील.—संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.

२) एस.बी.- ११—११५ ते १२०—१५ ते २०—उपटा वाण. पाण्याच्या ताणास सहनशील. तेलाचे प्रमाण ४८.२२ टक्के. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.

३) जे. एल.- ५०१—११० ते ११५—३० ते ३२—उपटा वाण. तेलाचे प्रमाण ४९ टक्के. अफ्लाटॉक्सिन दूषितीकरणासाठी सहनशील. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी प्रसारित.

४) टी.ए.जी.- २४—११० ते ११५—२५ ते ३०—उपटा वाण. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.

५) टी. जी.- २६—११० ते ११५—२५ ते ३०—उपटा वाण. १५ दिवसांची सुप्त अवस्था. संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रसारित.

६) जे. एल.- ७७६ (फुले भारती)—११५ ते १२०—३० ते ३५—उपटा वाण. उत्तर महाराष्ट्रासाठी प्रसारित.

७) जे. एल.- २८६ (फुले उनप)—९० ते ९५—२० ते २५—उपटा वाण. मूळकुज रोगास सहनशील. तेलाचे प्रमाण ४९ ते ५० टक्के. पश्‍चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्याकरिता.

८) टी. पी. जी.-४१—१२५ ते १३०—२५ ते ३०—जाड दाण्याचा उपटा वाण. तेलाचे प्रमाण ४८ टक्के. दाण्याचा रंग गुलाबी लाल. अफ्लाटॉक्सिन दूषितीकरणसाठी उच्च सहनशीलता. पश्‍चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे व अकोला जिल्ह्यांकरिता.

९) केडीजी- १६० (फुले चैतन्य)—१०५ ते ११०—२० ते २४—उपटा वाण. खोडकुज, पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकरक. मध्यम टपोरे दाणे. तेलाचे प्रमाण ५१.६ टक्के.—आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू राज्यासाठी सुयोग्य.

१०) टीएलजी-४५—११५ ते १२०—२० ते २५—उपट्या, टपोऱ्या शेंगदाण्याचा निर्यातक्षम वाण, तेलाचे प्रमाण ५१ टक्के.

११) एलजीएन-१—१०५ ते ११०—१८ ते २०–उपट्या, लवकर तयार होणारा, पाण्याचा तान सहन करणारा वाण.

बीजप्रक्रिया :

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास, थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या पैकी एका जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.

त्यानंतर रायझोबिअम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करावी.

पेरणीचे अंतर :

दोन ओळींतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जेणेकरून हेक्टरी रोपांची संख्या ३.३३ लाख राखली जाईल.

टोकण पद्धतीने योग्य अंतरावर पेरणी केल्यास २५ टक्के बियाणे कमी लागते आणि उगवण चांगली होते. बियाण्याची पेरणी २ ते ५ सेंमी खोलीवर करावी. जास्त खोल पेरणी करू नये.

खत व्यवस्थापन :

१) पेरणीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १० टन प्रमाणे कुळवाच्या साहाय्याने जमिनीत चांगले मिसळावे.

२) हेक्टरी नत्र २५ किलो व स्फुरद ५० किलो द्यावे.

३) अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांसोबत जिप्सम ४०० किलो (पेरणीवेळी २०० किलो, तर उर्वरित २०० किलो आऱ्या सुटताना) प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. त्यामुळे आऱ्या जमिनीत सुलभरीत्या जाण्यास तसेच शेंगा पोसण्यास मदत होते.

४) ठिबकद्वारे खते द्यायची असल्यास, शिफारशीत खत मात्रेच्या १०० टक्के खते (२५:५०:०० नत्र, स्फुरद, पालाश किलो प्रति हेक्टर) विद्राव्य स्वरूपात ठिबक सिंचनातून ९ समान हप्त्यांत विभागून द्यावीत.

आंतरमशागत :

१) लागवडीनंतर ४५ दिवसांपर्यंत २ वेळा खुरपण्या करून पीक ताणविरहित ठेवावे. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ कोळपण्या कराव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी. त्यामुळे पिकास मातीची भर मिळते.

२) आऱ्या सुटू लागल्यानंतर (३५ ते ४० दिवस) आंतरमशागतीची कामे करू नयेत. फक्त मोठी तणे उपटून टाकावीत.

३) तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करायचा असल्यास, पेरणीनंतर दोन दिवसांच्या आत योग्य ओलीवर पेंडीमिथॅलिन (उगवणपूर्व) १ किलो ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.

४) पेरणीनंतर २० दिवसांनी तण उगवणीनंतर इमॅझेथॅपीर (१० टक्के एसएल) ७५० मिलि ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन :

१) उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सेंमी पाणी लागते. लागवडीसाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्रामुळे ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.

२) पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी आंबवणीचे पहिले पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या १० ते १२ वेळा पाळ्या द्याव्यात. आऱ्या जमिनीत घुसण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.

३) भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते. तसेच पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन वाढीसाठी उपयुक्त ठरते.

वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन :

पिकाची अवस्था—पेरणीनंतर पाण्याच्या पाळ्या (दिवस)

उगवणीच्या वेळी—पेरणीनंतर लगेच

फुलोरा येणे—३० ते ४० दिवस

आऱ्या सुटण्याची अवस्था—४० ते ४५ दिवस

शेंगा धरणे व दाणे भरणे—६५ ते ७० दिवस

Source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top