खोडवा उसासाठी शिफारस खत मात्रा किती द्यावी ? व व्यवस्थापन विषयी संपूर्ण माहिती
खोडवा उसासाठी शिफारस
जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी पाचट उपयुक्त आहे. सलग ४-५ वर्षे पाचट जमिनीमध्ये कुजविल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यास मदत होते. ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सरी आड सरी दाबून बसवून घ्यावे. ऊस लागण जोडओळ पद्धतीने केली असल्यास रिकाम्या पट्टयात पाचट चांगले दाबून बसवावे, सरीत पाचट दाबल्यानंतर जमिनीच्या वर दिसणाऱ्या खोडक्या धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्याव्यात.
पाचटाचे आच्छादन न केलेल्या रिकाम्या सरीच्या बगला नांगराच्या साह्याने १५ दिवसांच्या आत फोडाव्यात. पाचट दाबून घेतल्यानंतर एकरी एक लिटर या प्रमाणात पाचट कुजविणारे जिवाणू द्रावणाची आळवणी त्याचबरोबर ५० किलो युरिया, ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे.
रासायनिक खत व्यवस्थापन :
१) खोडवा उसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खताचा पहिला हप्ता आणि हलके पाणी महत्त्वाचे असते. ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत रिकाम्या सरीच्या बगला फोडल्यानंतर खोडवा पिकाच्या एकूण शिफारशीत खतमात्रेपैकी एकरी १.५ गोणी युरिया, ३ गोणी सिंगल सुपर फॉस्फेट, १ गोणी म्युरेट ऑफ पोटॅश, २४ किलो मूलद्रवी गंधक, ५ किलो व्हीएसआय मायकोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत सरीच्या बग6लेत द्यावे. खोडव्यास पहिले पाणी दिल्यानंतर पाचट तुडवून घ्यावे.
२) साधारण ६-८ आठवड्यांनी खोडव्यास नत्र खताचा दुसरा ३० % हप्ता म्हणजेच एकरी १.५ गोणी युरिया सेंद्रिय खतासोबत मिसळून द्यावा. अवजाराच्या साह्याने हलकी भरणी करावी. त्यामुळे खते माती आड होतात, जमीन मोकळी होऊन मुळांची कार्यक्षमता वाढते.
३) खोडवा पीक ३.५ ते ४ महिन्यांचे झाल्यानंतर फुटव्याची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि पिकाच्या योग्य वाढीसाठी मोठी भरणी करावी. भरणी अगोदर रासायनिक खताचा तिसरा आणि शेवटचा हप्ता म्हणजे शिफारशीत खतमात्रेपैकी एकरी २ गोणी युरिया, ३ गोणी सिंगल सुपर फॉस्फेट, १ गोणी म्युरेट ऑफ पोटॅश,५ किलो व्हीएसआय मायक्रोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत उसाच्या बुडात द्यावे रीजरच्या साह्याने भरणी करावी.
४) चुनखडीची जमीन असेल तर रासायनिक खताचा पहिला हप्ता युरिया १ गोणी, डीएपी १ गोणी, म्युरेट ऑफ पोटॅशची पाऊण गोणी या स्वरूपात द्यावा. साधारण ६-८ आठवड्यांनी खोडव्यास नत्र खताचा दुसरा ३० % हप्ता म्हणजेच एकरी १.५ गोणी युरिया सेंद्रिय खतासोबत मिसळून द्यावा, तिसरा हप्ता देताना युरिया १.५ गोणी, डीएपी १ गोणी, म्युरेट ऑफ पोटॅशची पाऊण गोणी या स्वरूपात द्यावा.
५) खोडवा पिकास पहारीच्या अवजाराने खते दिल्यास ते मुळांच्या सान्निध्यात दिले जाते. मात्र दिलेली खते पिकास उपलब्ध होण्यासाठी पाणी देण्याची गरज आहे. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. उसाची जोमदार वाढ होते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते १५ % वाढ होते.
(६) ठिबक सिंचनाद्वारे युरिया, फॉस्फोरिक ॲसिड, म्युरेट ऑफ पोटॅश या विद्राव्य खतांचा वापर ३६ आठवड्यांपर्यंत केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. शिफारशीत खत मात्रेची ४० % बचत होऊ शकते.
लोह, जस्ताची कमतरता
१) महाराष्ट्रात खोडवा पिकामध्ये मुख्यतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिवळेपणा दिसतो कारण अशा जमिनीमध्ये लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते. त्यामुळे पानांमध्ये हरितद्रव्याची निर्मिती कमी होऊन पाने पिवळसर हिरवी किंवा पिवळी दिसू लागतात, लोह, जस्ताच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या उसावरील लक्षणास केवडा रोग म्हणतात.
२) उसावरील पिवळेपणा कमी करण्यासाठी जमिनीत एकरी १० किलो फेरस सल्फेट (हिराकस), ८ किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून महिनाभर मुरवावे. नंतर चळी घेऊन माती आड करावे.
३) केवडा ग्रस्त भागात लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबर जस्त अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे ८-१० दिवसांच्या अंतराने फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट या रसायनांची ०.५ टक्का प्रमाणात एकत्रित ३ ते ४ फवारण्या फायदेशीर ठरतात.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर
(अ) पहिली फवारणी :
खोडवा पीक साधारण ६० दिवसांचे झाल्यानंतर मल्टिमॅक्रोन्यूट्रियंट (नत्र: स्फुरद: पालाश ८:८:८) द्रवरूप खताची मात्रा २ लिटर अधिक मल्टिमायक्रोन्यूट्रियंट २ लिटर आणि वसंत ऊर्जा एकरी १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून एक एकरासाठी पहिली फवारणी करावी.
(ब) दुसरी फवारणी
१) खोडवा पीक साधारण ९० दिवसांचे झाल्यानंतर मल्टिमॅक्रोन्यूट्रियंट (नत्र: स्फुरद: पालाश ८:८:८) द्रवरूप खताची मात्रा ३ लिटर + मल्टिमायक्रोन्यूट्रियंट ३ लिटर आणि वसंत ऊर्जा एकरी १ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून एक एकरासाठी फवारणी करावी.
२) मल्टिन्यूट्रियंट या द्रवरूप खताच्या फवारणीमुळे पानांद्वारे हरित द्रव्याची निर्मिती होऊन पिकांची वाढ चांगली होते.
३) उसाच्या दोन पेरांमधील अंतर, कांड्याची जाडी, लांबी, उसाची उंची वाढते. उत्पादनामध्ये एकरी ६ ते ८ टनांनी वाढ होते वसंत ऊर्जा या
जैवचेतकाच्या फवारणीमुळे पर्णरंध्राद्वारे होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग रोखला जातो. पिकांवर फवारणीमुळे पिकाची उंची, कांड्याची जाडी, पानाची लांबी, रुंदी व त्यातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते.
Source : krishijagran.com