Tomato Market Price : टोमॅटोला किरकोळ बाजारात किलोमाघे १०० रुपये दर ! भावात अचानक वाढ का ?
Tomato Market Price
Tomato Bajarbhav : मे महिन्यात शेतकऱ्यांना अवघ्या ३ ते ५ रुपये किलोने विकाव्या लागलेल्या टोमॅटोच्या भावात मोठी तेजी आली. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत सध्या टोमॅटोचं भाव खात आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत ग्राहकांना १० ते २० रुपये किलोपर्यंत मिळणारा टोमॅटो सध्या किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपयांवर पोचला. सध्या शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळत आहे. पण उत्पादन घटल्याने वाटतो तेवढा फायदा झाला नाही, असे शेतकरी सांगतात.
मे महिन्यात टोमॅटो मातीमोल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. टोमॅटोला अगदी ३ ते ५ रुपयांपर्यंत दर मिळाला होता. टोमॅटो तोडणीलाही परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लाॅट सोडून दिले होते. शेतातच टोमॅटोचा चिखल पाहायला मिळाला होता.
भाव मिळणारच नाही, असं मानून अनेक भागातील शेतकऱ्यांनी पिकाला खत द्यायचं बंद केलं. कीड रोगासाठी कीडनाशक फवारणीही थांबली होती. यामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी होत गेला. टोमॅटोचे भाव ३ ते ५ रुपयांवरून १० ते १५ रुपयांपर्यंत वाढले. Tomato Market
बाजारातील टोमॅटो आवक का वाढली
टोमॅटोच्या भावात वाढ झाली ती मागील आठवडाभरापासून. मे आणि जून महिन्याच्या तीन आठवड्यांमध्ये महत्वाच्या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये उष्णता जास्त होती. अनेक भागात उष्णतेची लाट होती त्यामुळे भीजापाला पिकांसह टोमॅटो पिकालाही फटका बसला.
पावसाने पाठ फिरवली होती. त्यातच गेल्या काही हंगामांमध्ये टोमॅटोला चांगला भाव मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड कमी केली. हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोऐवजी बिन्सला पसंती दिली होती.
बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात, राजस्थान आणि वादळाचा फटका सहन करणाऱ्या इतर राज्यांमध्ये टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. या सर्व घटकांमुळे बाजारतील आवक मागील आठवडाभरापासून कमी झाली. यामुळे टोमॅटो दरात मोठी तेजी आली.
दरात अशी झाली वाढ
मागील आठवड्यात घाऊक बाजारात टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी २० ते ३० रुपये भाव मिळत होता. तर किरकोळ विक्री ४० रुपयाने सुरु होती. पण मागील चार दिवसांमध्ये दरात मोठी वाढ झाली. देशभरातील बाजारात टोमॅटोचे घाऊस विक्रीचे दर आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवर पोचले.
राज्यातील बाजारात सध्या शेतकऱ्यांना सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर किरकोळ विक्रीचे भाव ८० ते १०० रुपयांवर पोचले. दिल्ली आणि बंगळूरु बाजारात टोमॅटो १०० ते १२० रुपयांवर पोचला.
भाव टिकतील का ?
टोमॅटो भावात झालेली वाढ पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे. कारण एप्रिल आणि मे महिन्यात टोमॅटो लागवडी कमी झाल्या आहेत. तसेच गुजरात, हरियाना, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात पिकाचे पावसामुळे नुकसान झाले.
नव्या लागवडी बाजारात यायला उशीर लागेल. त्यामुळे पुढील महिना दोन महिने तरी बाजारात तेजी राहील, असे व्यापारी सांगत आहेत. (Tomato Market)
टोमॅटो दराचा भडका का उडाला ?
- वाढलेल्या उष्णतेचा पिकाला फटका
- मे आणि जून महिन्यात पाऊस नसल्याने पिकाचे नुकसान
- गेल्या हंगामात कमी भाव मिळाल्याने हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार लागवडी घटल्या
- शेतकऱ्यांनी टोमॅटोऐवजी बिन्सला दिली पसंती
- बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात, राजस्थानसह काही राज्यांमध्ये टोमॅटो पिकाचे नुकसान
- मे महिन्यातील मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी प्लाॅट सोडले.
source:agrowon