कृषी महाराष्ट्र

टोमॅटो लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन

टोमॅटो लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन

 

महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे ५० हजार हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापासून जवळजवळ १.०५ लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पीक, हवामान, पाणी, खत व पीक संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज ६० ते ७० टन प्रतिहेक्‍टरपर्यंत वाढू शकते.

माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.

 

टोमॅटो फळाचे महत्त्व :

आहारदृष्ट्या आरोग्यासाठी हितकारक आहे.
भाजी व प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते. केचप, सूप, सॉस, चटणी इ. पदार्थ बनविता येतात.
टोमॅटोमधील लायकोपीन या अल्कलाइड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण कमी होते.

हवामान :

टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते.
साधारणतः १८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते.
तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते.
तसेच तापमान जर १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले तरी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. पिकास इजा होऊन उत्पादनात मोठी घट येते.
जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो फळांची गुणवत्ता ही चांगली असते, तर रंगदेखील आकर्षक येतो.

टोमॅटो पिकावर हवामानाचा परिणाम

तापमानपरिणाम
१० अंश सेल्सिअसपेक्षा कमीवाढ खुंटते.
१६ अंश ते २९ अंश सेल्सिअसबी उगवण चांगली होते.
२१ अंश ते २४ अंश सेल्सिअसपिकांच्या वाढीस अनुकूल.
रात्रीचे १७ अंश ते २१ अंश

दिवसाचे २५ अंश ते ३० अंश

फुले व फळधारणा उत्तम.
 ३२ अंश सेल्सिअसच्यावरफळधारणेत अनिष्ट परिणाम
३८ अंश सेल्सिअसच्यावरफळधारणा होत नाही. पिकाच्या वाढीस प्रतिकूल, लायकोपीनवर परिणाम.
१५ अंश सेल्सिअसच्या खालीपरागीभवन होत नाही. फळांचा आकार लांबट चपटा होतो. फळांचे कप्पे मोकळे राहतात.

जमीन :

चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते.
हलक्‍या जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो; परंतु उत्पादन भरपूर निघते.
पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी काळीभोर जमीन टाळावी, तर उन्हाळी टोमॅटो पीक हलक्‍या व उथळ जमिनीत घेऊ नये.
जमिनीचा सामू हा ६ ते ७.५च्या दरम्यान असावा.
जास्त पावसाच्या भागासाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी व त्यास योग्य उतार द्यावा, म्हणजे पावसाचे पाणी उभ्या पिकात साठून राहणार नाही.
क्षारयुक्त चोपन व पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत हे पीक चांगले येत नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व फुलगळ होते. जमिनीत चर काढले तर अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो व पाणी जर क्षारयुक्त असेल तर क्षारांचाही निचरा होतो.
अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके म्हणजेच वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत. त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच निमॅटोड असणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.

जाती :

भाग्यश्री : या जातीच्या फळांत लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून, बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्‍टर मिळते.
धनश्री : फळे मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्‍टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
राजश्री : फळे नारंगी लाल रंगाची असतात व या संकरीत वाणाचे उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्‍टर मिळते. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.
फुले राजा : फळे नारंगी, लाल रंगाची असतात. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. उत्पादन ५५-६० टन प्रतिहेक्‍टर मिळते.

रोपे तयार करणे :

महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची लागवड शस्वीरीत्या केली जाते.
अपेक्षित उत्पादनासाठी योग्य रोपांची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आवश्‍यक असते.
एक हेक्‍टर क्षेत्रासाठी ३ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी.
टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी १२५ ग्रॅम बियाणे एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पुरेसे असते.
रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी. ३ मी. x १ मी. x १५ सें.मी. आकाराचे गादी वाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९ः१९ः१९ किंवा १०० ग्रॅम १५ः१५ः१५ चांगले एकसारखे मिसळावे.
बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे, त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोगनियंत्रणात राहतात.
त्यानंतर हाताने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत.
साधारणपणे ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे.
जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत, यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी २५ ते ३० ग्रॅम फोरेट १२ दिवसानंतर गादी वाफ्यात टाकावे. तसेच मातीमध्ये कार्बेन्डाझीम २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
रोपे ४ ते ६ पानावर आल्यावर म्हणजेच २५ ते ३० दिवसांनंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.

रोपवाटिकेची ट्रे पद्धत :
राेपवाटिकेचा कालावधी

हंगामबी पेरणीचा कालावधीपुनर्लागवडीचा कालावधी
खरीपमे ते जूनजून ते जुलै
रब्बीसप्टेंबर ते ऑक्‍टोबरऑक्‍टोबर ते नोव्हेंबर
उन्हाळीजानेवारी ते फेब्रुवारीफेब्रुवारी ते मार्च

ट्रे पद्धतीने रोपे तयार करावयाची असल्यास ९८ कप्पे असलेला प्रो-ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमणे बी पेरावे. या पद्धतीत बियाणे वाया जात नाहीत. तसेच प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते. ट्रे पद्धत रोपांच्या वाहतुकीसाठी सोईस्कर आहे.

लागवडीसाठी जमीन तयार करणे :

जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्या वेळी २० टन प्रतिहेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्‍या, लव्हाळागाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात.
उत्तम प्रतीच्या भारी जमिनीत ९० ते १२० सें.मी. अंतरावर, तर हलक्‍या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत.
लागण करते वेळी दोन रोपांतील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवावे. शक्‍यतो लागवड ९० x ३० सें.मी. अंतरावर करावी. ३.६० x ३.०० मी. आकारमानाचे वाफे तयार करावेत.

रोपांची लागवड :

टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी.
लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी.
मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत.
लागवडीपूर्वी रोपे कार्बोसल्फान १० मि.ली. व कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत.
रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात.
लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे.
लागवडीनंतर १० दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील त्याठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून घ्यावेत.

खत व्यवस्थापन :

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.

अ) सेंद्रिय खते : प्रतिहेक्‍टर २० टन शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड.

ब) रासायनिक खते :

मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी हेक्‍टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद व १५० किलो पालाश.
तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश घ्यावे.
याशिवाय संकरीत व सुधारीत आणि सरळ वाणासाठी हेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २५ किलो मॅगनीज सल्फेट, ५ किलो बोरॅक्‍स आणि २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.

क) जैविक खते :

एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जीवाणू हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावेत.

पाणी व्यवस्थापन :

पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.
हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.
लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.
पिकांच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.
ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.
फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात.
पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

टोमॅटो झाडांना आधार देणे :

लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात, त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा.
सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबावर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा.
झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.

मातीची भर देणे :

लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडणार नाही, याची काळजी घ्यावी.

फुलगळ :

टोमॅटो पिकाची फुलगळ प्रामुख्याने जास्त तापमान, जास्त आर्द्रता, मंद प्रकाश, वेगवान व कोरडे वारे, पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांमधील वाढसंप्रेरकांत होणारे बदल या कारणांमुळे होते. टोमॅटोची फुलगळ टाळण्यासाठी वरील सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन व नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ४ सीपीए या वाढ संप्रेरकाची ५० ते १०० मिली ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फक्त फुलोऱ्यावर फवारणी करावी.

तणांचे नियंत्रण :

टोमॅटोच्या लागवडीनंतर आवश्‍यकतेनुसार खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवावे.
टोमॅटोच्या पिकात तणनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास लागवडीपूर्वी ८ ते १० दिवस आधी पेंडिमिथॅलिन २ लिटर प्रतिहेक्‍टर प्रमाणात फवारावे.
लागवडीनंतर १६ ते २० दिवसांनी मेट्रीब्युझीन हे तणनाशक शिफारसीनुसार फवारावे.

फळाची तोडणी :

प्रक्रियेसाठी पूर्ण पिकलेली व लाल रंगाची फळे तोडावीत. परंतु, बाजारासाठी फळे निम्मी लाल व निम्मी हिरवी असताना तोडावीत.
जातिपरत्वे एकरी ३५ ते ५० टन लाल टोमॅटोचे उत्पादन मिळते.
फळांची काढणी शक्‍यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी.
रोप लावल्यापासून जातीनुसार साधारणतः ६५ ते ७० दिवसांनी फळांची तोडणी सुरू होते. त्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तोडणी करावी लागते.

फळे जर लांबच्या बाजारपेठेसाठी पाठवायची असतील तर पिवळा ठिपका पडलेली फळे तोडावीत. अशी फळे वाहतुकीत चांगली पिकतात. गुलाबी लालसर झालेली फळे मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी तर पूर्ण लाल झालेली फळे स्थानिक बाजारपेठेसाठी किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पाठवावीत.
तोडणी अगोदर ३ ते ४ दिवस कीडनाशकांची फवारणी करू नये; अन्यथा फळांवर कीडनाशकांचे डाग व फळांमध्ये विषारीपणा राहतो.
फळांची काढणी झाल्यावर फळे सावलीत आणावीत व त्यांची आकारानुसार वर्गवारी करावी. नासकी, तडा गेलेली, रोगट फळे बाजूला काढावीत.
चांगली फळे लाकडी खोक्‍यांत किंवा प्लॅस्टिक क्रेटमध्ये व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावीत.

पीक संरक्षण :

रोग

टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच फळे पोखरणारी अळी, नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.

मर :

हा बुरशीजन्य रोग असून, झाडे अचानक वाळू लागतात. उपटलेल्यानंतर मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरगळलेली, माना पडलेली दिसतात. टोमॅटो लागवड टोमॅटो लागवड टोमॅटो लागवड टोमॅटो लागवड

नियंत्रण : रोपांच्या मुळांजवळ खुरप्याने रेघा ओढून कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची जिरवण करावी. लागवडीनंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची प्रतिझाड ५० ते १०० मि.लि. प्रमाणे जिरवण करावी.

करपा :

यात लवकर येणारा व उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.

नियंत्रण : मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटरप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. टोमॅटो लागवड टोमॅटो लागवड टोमॅटो लागवड टोमॅटो लागवड

विषाणूजन्य रोग :

टोमॅटोमध्ये प्रामुख्याने ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस व पर्णगुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे विषाणूजन्य रोग आढळतात. त्यांचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी यामुळे होतो. या किडींचे नियंत्रण केल्यास रोगांचे प्रमाण कमी ठेवता येते. किडीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. रोग शेतामध्ये आढळल्यास झाडे उपटून नष्ट करावीत.

फळे पोखरणारी अळी :

ही अळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते.

नियंत्रण : क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. हेलीओथिस न्युक्‍लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एचएनपीव्ही) विषाणूजन्य कीटकनाशक २०० मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.

नागअळी :

या अळ्या पानांच्या पापुद्र्यामध्ये शिरून हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. पापुद्र्

नियंत्रण : रोपांची लागवड करतेवेळी अशी पाने काढून टाकावीत. ४ टक्के निंबोळी अर्काच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्‍टीन ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.

संपर्क : डॉ. डी. बी. क्षीरसागर, ९४०३१८९३६४. (लेखक टोमॅटो सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रभारी अधिकारी आहेत.)

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top