पीक कर्जावर शेतकऱ्यांकडून अर्धा टक्का व्याजाची वसुली ! वाचा सविस्तर
पीक कर्जावर
Risod News : शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज (Crop Loan) दिले जाते. परंतु या वर्षी शेतकऱ्यांकडून अर्धा टक्का व्याज वसूल केले जात असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केंद्र शासनाने (Central Government) कपात केलेल्या अर्धा टक्का व्याजाचा भरणा करावा, अशी मागणी होत आहे.
नवीन पीककर्ज त्वरित मिळावे व थकीत यादीमध्ये नाव येऊ नये म्हणून शेतकरी पीककर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करीत असतात. पीककर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये सध्या गर्दी होत आहे.
पीककर्जावर अर्धा टक्का व्याज आकारल्या जात असल्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्याची अडचण होत आहे. यापूर्वी राज्य शासन तीन टक्के व केंद्र शासन तीन टक्के व्याजाचा भरणा करीत होते.
मात्र या वर्षी केंद्र शासनाने अडीच टक्के व्याजाचा निर्णय घेतल्यामुळे अर्धा टक्का शेतकऱ्यांकडून वसूल केला जात आहे. याबाबतची कल्पना शेतकऱ्यांना नसल्यामुळे ऐनवेळी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
वाशीम जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून शेतकरी मोठ्या प्रमाणात पीककर्ज घेतात. अर्धा टक्का व्याज व पीककर्ज घेतेवेळी शेअर्सच्या नावाखाली मिळालेल्या पीककर्जामधून कपात केली जाते.
तीन टक्के व्याजाचा भरणा केंद्र शासनाने पूर्वीप्रमाणेच करावा तसेच शेअर्स कपात करू नये अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सर्वाधिक पीककर्ज घेतात. दरवर्षी शेअर्सच्या नावाखाली पीककर्जामधून विशिष्ट रक्कम कपात केली जाते. वीस हजार शेअर्स जमा झाल्यानंतर कपात बंद केली जाते. परंतु त्या रकमेवर शेतकऱ्यांना लाभांश मिळत नाही. Crop Loan
- पूर्वी केंद्र सरकारकडून तीन टक्के व्याज शेतकऱ्यांच्या नावे सेवा सहकारी संस्थेकडे जमा केले जात होते. परंतु केंद्र शासनाने या वर्षीपासून अडीच टक्केच देण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे अर्धा टक्का शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांना भुर्दंड पडू नये म्हणून राज्य सरकारकडे अर्धा टक्क्याची मागणी केली आहे
भारत धनगोल, वरिष्ठ निरीक्षक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा रिसोड, जि. वाशीम - शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु शेतकऱ्याकडून अर्धा टक्के व्याजाची वसुली केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड झेलावा लागतो आहे.
विष्णू जाधव, शेतकरी, गणेशपूर, ता. रिसोड, जि. वाशीम