कृषी महाराष्ट्र

कापूस दरात एप्रिलमध्ये किती वाढ होईल ? वाचा सविस्तर

कापूस दरात एप्रिलमध्ये किती वाढ होईल ? वाचा सविस्तर

कापूस दरात एप्रिलमध्ये

Cotton Rate Update : मागील काही दिवसांपासून बाजारात कापूस दरवाढीची (Cotton Rate) चर्चा आहे. पण अनेक बाजारांमद्ये दर नरमलेल्या पातळीवरच दिसले. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात होते. तुम्ही सांगता त्याप्रमाणं दरवाढ झाली नाही, असं अनेक शेतकरी सांगत होते.

पण शेवटी काल सर्वच बाजारांमध्ये कापूस दर १०० रुपयाने वाढले. ही वाढ तुटपुंजी असली तरी तब्बल दोन महिने आवकेच्या (Cotton Arrival) दबावामुळं घसरलेल्या दरात ही वाढही आशादायक आहे. पुढील काळात दरात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस मागं ठेवल्यामुळं चित्र काहीसं बदललं. एरवी डिसेंबर आणि जानेवारीत कापसाची आवक जास्त असते. त्यामुळं दरही (Cotton Market) हंगामातील निचांकी पातळीवर असतात. तर फेब्रुवारीपासून आवक कमी होऊन दर वाढतात.

पण यंदा शेतकऱ्यांनी फेब्रुवारीपर्यंत कापूस रोखला. त्यामुळं जानेवारीपर्यंत कापसाला सरासरी ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. पण फेब्रुवारीपासून कापसाची विक्री शेतकऱ्यांनी वाढवली.

एरव्ही डिसेंबरमध्ये असते अशी आवक मार्च महिन्यात झाली. त्यामुळं दर हंगामातील निचांकी पातळीवर पोचले. मार्च महिन्यात कापसाला सरासरी ७ हजार ८०० रुपये दर मिळाला.

सध्या उद्योगांना कापूस चांगला मिळत असल्याचं काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतूल गणात्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं. उद्योगांनी कापसाची खरेदी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

मे महिन्यात कापसाची आवक कमी होऊन दरवाढ होईल, असा अंदाजही त्यांनी दिला. पुढील हंगामात देशातील कापूस लागवड कमी होऊ शकते, असा अंदाजही गणात्रा यांनी व्यक्त केला.

याविषयी ते म्हणतात की, कापसाचे भाव १५ हजार रुपयांवरून ७ हजार ५०० रुपयांवर आले आहेत. यामुळे शेतकरी येत्या हंगामात कापसाची लागवड १० ते १५ टक्क्यांनी कमी करतील. अमेरिकेतही कापसाची लागवड १५ ते २० टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज आहे, असंही गणात्रा यांनी सांगितलं.

तसचं सरकार पुढील हंगामासाठी हमीभाव वाढवेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे मोठे शेतकरी जास्त काळ कापूस ठेवतील. यंदा देशात पहिल्यांदा १० टक्के कापूस पुढील हंगामासाठी शिल्लक राहील, असा अंदाजही गणात्रा यांनी व्यक्त केला.

यंदा कापसाचं उत्पादन घटलं हे शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्येच माहित होतं. त्यामुळं चांगल्या दराची अपेक्षाही रास्त होती. यंदा चांगला भाव घ्यायचाचं हे शेतकऱ्यांनीही ठरवलं. सुरुवातीचे चार महिने अगदी मर्यादीत विक्री केली. तोपर्यंत कापसाचे भावही टिकून होते. पण फेब्रुवारीत शेतकऱ्यांचा संयम सुटला. पॅनिक सेलिंग सुरु झालं. याचा दरावर दबाव आला. ते कसं ते पाहू…

देशातील बाजारात ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांच्या काळात ११५ लाख गाठी कापूस आला. म्हणजेच महिन्याला सरासरी २८ लाख गाठी. दिवसाला सरासरी ९० हजार. पण फेब्रुवारीत ४० लाख गाठी आणि मार्च महिन्यात ४५ लाख गाठी कापूस बाजारात आल्याचा अंदाज आहे. म्हणजेच दिवसाला १.२५ ते १.५० लाख गाठी कापूस बाजारात आला.

मागील हंगामातील शिल्लक साठा नगण्य असल्यानं नोव्हेंबरपर्यंत कापसाचे भाव चांगले होते. पण गरजेपुरता कापूस मिळत गेल्यानं बाजार स्थिर राहीला. पण आवक वाढल्यानं दरावर फेब्रुवारीच्या मध्यापासून दबाव आला.

आत्तापर्यंत बाजारात २०० लाख गाठी कापूस आल्याची शक्यता आहे. तर ११३ लाख गाठी शिल्क आहेत. पुढील काळात उत्पादनाचा अंदाज कमी झाल्यास, शिल्लक कापूसही कमी असल्याचं पुढं येईल. Cotton Market

एकूणच काय तर यापुढे कापूस दर सुधारतील. सध्या कापासाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये भाव मिळतोय. पण यंदा घटलेलं उत्पादन, उद्योगांचा वाढलेला वापर, शेतकऱ्यांकडील घटलेला साठा यामुळं दराला आधार मिळेल.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजार पूर्वपातळीवर आला. यामुळेही दरवाढीला मदत होईल. कापसाची आवक पुढील दोन ते तीन आठवड्यात कमी होऊ शकते. त्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते. दर ४०० ते ५०० रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज सध्याच्या फंडामेंटल्सवरून जाणकार व्यक्त करत आहेत.

फंडामेटल्स बदलले की काही काळ चढ उतार दिसतील. पण सध्याच्या दरात नरमाई येण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळं शक्य असल्यास चांगल्या दरासाठी काही काळ थांबावं. पण कापूस बाजारावर लक्ष ठेऊन असावं. केवळ ऐकीव माहितीवर विक्रीचा निर्णय न घेता प्रत्यक्ष बाजारातील दराची शहानिशा करावी, असं आवाहनही जाणकारांनी केलंय.

  • कापसाचे दर गेल्यावर्षीपेक्षा ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. बाजारात सध्या पुरेसा कापूसही येत आहे. सध्याच्या दरात सुतगिरण्यांनाही फायदा होत आहे. त्यामुळे उद्योगांनी कापूस खरेदी करून ठेवावा. १५ मेनंतर कापसाची आवक कमी होऊन दर वाढतील. निसरकार कापसाच्या हमिभावात २५ ते ३० टक्के वाढ करण्याची चर्चाही बाजारात आहे. त्यामुळे मोठे शेतकरी दरवाढीपर्यंत कापूस विकणार नाहीत.
    अतुल गणात्रा, अध्यक्ष, काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया

How much will the price of cotton increase in April

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top