कापूस वायद्यांमध्ये पुन्हा सुधारणा ! शेतकऱ्यांना किती भाव मिळाला ? वाचा सविस्तर
कापूस वायद्यांमध्ये
Cotton Bajarbhav : कापूस वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. देशातील कापूस वायदे आज ७०० रुपयांनी सुधारले होते. पण वायद्यांमधील या सुधारणेचा बाजार समित्यांमधील दराला काहीच आधार मिळाला नाही. कापूस दर आजही स्थिर होते.
कापूस बाजारात सध्या कोंडीची स्थिती तयार झाली आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी जास्त असल्याने मोठा फटका बसत आहे. तसा सध्या काळ हा कापूस आवकेचा नसतो.
जुलैच्या सुरुवातीला बाजारातील कापूस आवक अगदी निचांकी पातळीवर आलेली असते. पण यंदा चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला. नंतर मात्र कापसाचे पॅनिक सेलिंग सुरु झाले. आवकेचा दबाव आल्याने बाजार दबावात येत गेला.
तसेच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस आणि सुताला मागणी कमी झाली. कापड निर्यातही घटली. याचा थेट परिणाम कापूस बाजारावर होत असल्याचे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले. (Cotton Market)
सध्या सुताला उठाव नसल्याने सुतगिरण्यांकडून कापूस गाठींची उचल कमी झाली. त्यामुळे जिनिंगकडे स्टाॅक पडून राहत आहे, असे जिनिंग चालकांनी सांगितले. तर दुसरीकडे कापूस आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. पण पुढे अपेक्षेप्रमाणे मागणी नाही.
यामुळे कापसाचे भाव कमी झाले, असे उद्योगांकडून सांगण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून कापूस केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दबावात आहे.
कापूस वायद्यांमध्ये मागील दोन आठवड्यांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. चालू आठवड्यात देशातील कापूस वायद्यांनी हंगामातील निचांकी टप्पा गाठला होता. आज दुपारी ३ वाजेपर्यंत एमसीएक्सवर कापूस वायदे ६८० रुपयांनी वाढून ५६ हजार ७०० रुपयांवर पोचले होते. तर एनसीडीईएक्सवरील स्पाॅटचे रेट २६ हजार ६०० रुपये प्रतिगाठींवर होते.
एका गाठीमध्ये १७० किलो रुई असते. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज कापूस वायदे सुधारले होते. आज कापूस वायद्यांनी ८० सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता.
वायद्यांमध्ये चढ उतार सुरु असले तरी बाजार समित्यांमध्ये मात्र कापूस भाव स्थिर दिसले. आज कापसाला सरासरी ६ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपये भाव मिळाला. काही बाजारांमध्ये सरासरी दरात वाढ झाली होती. पण सरसकट विचार करता बाजार स्थिर दिसला. पुढे सूत आणि कापडाला उठाव कमी असल्याने सध्या बाजारावर दबाव आहे.
पण आता शेतकऱ्यांकडील कापूस कमी झाला. पुढील काळात आवक कमी होईल. तर खरिपातील लागवडींनी अद्यापही वेग घेतला नाही. त्यामुळे कापूस बाजारावर लागवडीची गती आणि पाऊसमान याचाही परिणाम होऊ शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
source : agrowon