Black Thrips : ‘ब्लॅक थ्रिप्स’चा महाराष्ट्रात शिरकाव ! वाचा सविस्तर
Black Thrips
Black Thrips Update : सन २०२१ मध्ये दक्षिण भारतातील राज्यांसह देशातील प्रमुख मिरची पट्ट्यांमध्ये ‘ब्लॅक थ्रिप्स’ या नव्या फुलकिडीने प्रचंड उद्रेक माजवीत पिकाचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. देशभरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांसाठी ही केवळ गंभीर घटना नव्हती. तर उभे ठाकलेले नवे आव्हान होते.
बंगळूर येथील भारतीय बागवानी संशोधन संस्था (आयआयएचआर), अन्य संस्था, विद्यापीठांतील तज्ज्ञ सतर्क झाले. त्यांनी संशोधन, जागरूकता आणि उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातही या किडीने शिरकाव केला असल्याने तिला वेळीच रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज होण्याची वेळ आली आहे.
काय आहे ब्लॅक थ्रिप्स ?
-‘आयआयएचआर’मधील प्रमुख कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. श्रीधर यांनी उपलब्ध केलेली माहिती अशी.
-भारतात २०१५ मध्ये पपई पिकात (बंगळूर) ब्लॅक थ्रिप्स या नव्या फुलकिडीचा सर्वप्रथम आढळ.
-त्यानंतर डहलिया रोजिया (Dahlia rosea) या फुलवर्गीय वनस्पतीत नोंद.
-किडीचे मुख्य नाव- साऊथ ईस्ट एशियन थ्रिप्स, अन्य नावे- ब्लॅक थ्रिप्स, तैवानी थ्रिप्स.
-शास्त्रीय नाव- थ्रिप्स पार्वीस्पिनस (थ्रिप्स ओरिएंटॅलिस समूहातील कीड.)
-सन २०२१ मध्ये आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश, हरियाना आदी राज्यांत मिरचीत महाउद्रेक. वेगाने मोठ्या प्रमाणात प्रसार. ८५ टक्क्यांहून अधिक नुकसान.
-केरळ राज्यात आंबा पिकात नोंद. Black Thrips
देशातील थ्रिप्सच्या आधीपासून अस्तित्वात जाती
-सिरटोथ्रिप्स डॉरसॅलिस (पाने व फळांवर प्रादुर्भाव करणारी, अधिक नुकसानकारक)
-फ्रॅंकलिनिएल्ला शुल्झि, थ्रिप्स पाल्मी, थ्रिप्स हवाएन्सीस, हॅप्लोथ्रिप्स, टी. फ्लोरम (फुलांवरील जाती)
-सिरटोथ्रिप्सची जागा नवा ब्लॅक थ्रिप्स घेत असल्याचे निरीक्षण. कोणत्या हवामानाला कोणती जात वरचढ ठरत आहे याचा इकॉलॉजिकल अभ्यास सुरू असल्याचे डॉ. श्रीधर सांगतात.
ब्लॅक थ्रिप्सचे आंतरराष्ट्रीय महत्त्व
-जगभरात आढळणारी बहुभक्षीय कीड. ‘क्वारंटाइन पेस्ट’ म्हणून महत्त्व.
-मुख्य पीक मिरची. अन्य यजमान पिके- पपई, बटाटा, वांगी, बीन्स, स्ट्रॉबेरी, लिंबूवर्गीय पिके.
शोभिवंत वनस्पती- डहलिया, शेवंती, फायकस, डिप्लाडेनिया, गार्डेनिया, ॲथुरियम, होया आदी.
-मलेशिया व हवाई बेटांमध्ये पपई, थायलंड- भाजीपाला पिके, ग्रीसमध्ये गार्डेनिया वनस्पती, जावा बेटांमध्ये ढोबळी मिरची.
-इंडोनेशियात मिरची (फील्ड पेपर)- २३ टक्क्यांपासून ते ६५ टक्क्यांपर्यंत नुकसान.
– थायलंड, मलायापासून न्यू गिनीया, उत्तर ऑस्ट्रेलिया, हवाई व मायक्रोनेसिया बेटे आदी ठिकाणी
प्रादुर्भाव आढळ
-प्रादुर्भावग्रस्त पपईत क्लॅडोस्पोरियम ऑक्सीस्पोरम बुरशीचा संसर्ग. (मृत वा कुजलेल्या अवशेषांवर उपजीविका करणारी बुरशी.)
-संसर्गित टोमॅटो पिकाद्वारे टोबॅको स्ट्रीक इलाव्हायरस रोगाचा वाहक म्हणून नोंद.
‘आयआयएचआर’ने हाती घेतलेले उपाय
-२०२१ ते २०२३ या काळात विविध भागांत किडीचे सर्वेक्षण. बौद्धिक परिसंवाद.
-केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून सर्वेक्षण, निदान व नियंत्रण व्यवस्थापन अनुषंगाने माहितीपुस्तिका (मिरची पिकासाठी) प्रकाशित. त्या अनुषंगाने कृती आराखडा गट सदस्य म्हणून कीडनाशकांच्या ‘ॲड हॉक’ शिफारशी देण्यात योगदान.
-एकात्मिक कीड व्यवस्थापनाची (आयपीएम) साधने विकसित.
-माहिती प्रसारासाठी स्वयंसेवक गटाची स्थापना. शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
डॉ. श्रीधर यांचे विश्लेषण, मांडलेली आव्हाने
१) जागतिक स्तरावर किडीची, तिच्या नियंत्रणाबाबतची तसेच वेगाने प्रसार होण्याची क्षमता, भारतातील जैव परिस्थितीकी वातावरणात ती कशा प्रकारे राहू शकते आदींविषयी फार माहिती उपलब्ध नाही. दोन महिन्यांच्या कालावधीत पाच- सहा राज्यांत उद्रेकाची देशातील ही पहिलीच घटना मानली जाते.
२) अजैविक ताणांचा किडीच्या संख्येवर होणाऱ्या प्रभावाविषयी अधिक अभ्यासाची गरज. Black Thrips
मिरचीत वापरली जाणारी कीटकनाशके व अजैविक ताण या अनुषंगाने ब्लॅक थ्रिप्स वेगवेगळे प्रतिसाद देत आहे.
३) बहुभक्षीय कीड असल्याने बिगर हंगामातील आढळ व सर्व यजमान पिकांची श्रेणी अभ्यासली पाहिजे. त्यानुसार ‘आयपीएम’चे नियोजन हवे.
४) मिरची पिकात कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे जैविक किंवा पर्यावरणीय अनुकूल कीडनाशकांचा शोध व तशा नियंत्रण पद्धती विकसित कराव्या लागतील.
‘एसएबीसी’चा पुढाकार
‘साउथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर’ (एसएबीसी- जोधपूर) या संस्थेनेही ब्लॅक थ्रिप्सला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संस्थेच्या माहितीनुसार सन २०२१- २२ मध्ये देशात मिरचीचे ६ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्र असून, उत्पादन १८ लाख ६६ हजार १०८ टन आहे.
सर्व मसालावर्गीय पदार्थांच्या निर्यातीत सर्वाधिक वाटा (३८ टक्के) मिरचीची असून, ३१ टक्के परकीय चलन त्यातून भारताला मिळते. यावरून किडीला रोखणे किती महत्त्वाचे आहे हे समजते. सन २०२१ मध्ये डॉ. वाय. एस. आर. हॉर्टिकल्चरल विद्यापीठाच्या सर्वेक्षणात देशातील मिरचीचे सर्वांत मोठे हब असलेल्या गुंटूरच्या ९० टक्के क्षेत्रात प्रादुर्भाव आढळला.
उत्पादनात एकरी ८५ ते १०० टक्के घट तर एकरी एक लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले. मुळापासून पीक उपटून काढण्याची वेळ आली. दक्षिणेकडील राज्यांसह आसाम, गुजरात, ओडिशा येथेही कीड आढळली. हे थ्रिप्स उडण्याच्या बाबतीत फार सक्रिय नाहीत. मात्र वाऱ्याची दिशा, वेग, पर्यायी यजमान पिके व त्यांची सातत्यपूर्ण उपलब्धता या बाबी किडींच्या स्थलांतर क्षमता वाढवितात असे निरीक्षण ‘एसएबीसीने’ने नोंदवले आहे.
अवशेषांचाही विचार व्हावा
‘एसएबीसीचे’चे संस्थापक- संचालक डॉ. भगीरथ चौधरी म्हणाले, की ही फूलकीड अत्यंत आक्रमक (ॲग्रेसिव्ह) आहे. पुनरुत्पादनही जलद होते. फुलाच्या ‘ओव्हरी’च्या खालील बाजूस लपून राहते. कीटकनाशक तिथपर्यंत न पोहोचल्याने योग्य नियंत्रण मिळत नाही. इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आदी देशांतील या मूळ किडीविषयी पुरेशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही.
मिरचीत फुलकिडीच्या जुन्या जातींची जागा ती घेत आहे का याचा अभ्यास व्हायला हवा. नियंत्रणासाठी ‘ॲड हॉक’ शिफारशी आहेत. मात्र लेबल क्लेमसहित त्या येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांकडून फवारण्या वाढल्या आहेत. अशावेळी मिरचीचे निर्यातीतील महत्त्व पाहता त्यात रासायनिक अवशेष राहणार नाहीत याचीही दक्षता घेतली पाहिजे.
त्यादृष्टीने ‘आयसीएआर’च्या शिफारशीनुसार पीक संरक्षण शेड्यूल तयार होण्याची गरज आहे. मसाला महामंडळाचा पुढाकार हवा. रायचूर येथील विद्यापीठाने दोन सूक्ष्मजीवांचे एकत्रित जैविक कीटकनाशक तयार केले असून, त्याचे परिणाम चांगले मिळाले आहेत. आम्ही ड्रोनद्नारे फवारणीचे प्रयोग केले आहेत. आपली क्वारंटाइन प्रक्रिया अजून भक्कम व्हायला हवी असे डॉ. चौधरी म्हणाले.
ऑपरेशन नल्ला तमारा पुरूगू
आंध्र, तेलंगणात तेलुगू भाषेत शेतकरी ब्लॅक थ्रिप्सला ज्या नावाने संबोधतात त्याच नावाने ‘एसएबीसी’ने ऑपरेशन नल्ला तमारा पुरूगू (मिरचीवरील ब्लॅक थ्रिप्स) हा महाप्रकल्प सुरू केला आहे.
देशभरातील शास्त्रज्ञ, शेतकरी, विस्तार अधिकाऱ्यांनाही त्यात सहभागी केले आहे. यात शेतकऱ्यांकडे ‘आयपीएम’ तसेच निळे, पिवळे, पांढरे सापळे मोठ्या प्रमाणात लावण्याची प्रात्यक्षिके, गुणवत्तापूर्ण उत्पादन व मूल्यसाखळीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. मशागतीय, सूक्ष्मजीवांवर आधारित व नव्या रसायनांच्या वापरावर भर आहे.
शास्त्रज्ञांच्या शिफारशी
‘एसएबीसी’ आणि प्लॅंट प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या जानेवारीत हैदराबाद येथील कृषी महाविद्यालयात बौद्धिक परिसंवाद झाला. यात राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांनी मांडलेल्या शिफारशी.
-फुलिकडीचे जीवशास्त्र, जीवनचक्र, पुनरुत्पादन, आढळ, स्थलांतर वृत्ती या अनुषंगाने सखोल संशोधनाची गरज. किडीची आर्थिक नुकसान पातळी (ईटीएल) निश्चित व्हावी.
-नव्या जातीने (ब्लॅक थ्रिप्स) पूर्वीच्या जातीची (सिरटोथ्रिप्स) जागा घेण्याच्या अनुषंगाने अभ्यासाची गरज.
-वनस्पतिजन्य अर्क, सूक्ष्मजीवांवर आधारित व रासायनिक कीटकनाशके यांच्या परिणामकारकतेचा सखोल अभ्यास, फवारणी मिश्रण, सुसंगतता यांच्या चाचण्या गरजेच्या.
-ॲड हॉक पद्धतीने कीडनाशकांना संमती. त्यांचे पीएचआय, एमआरएल व अवशेषांचा विषारीपणा, विषारीपणाच्या तीव्रता (एलसी फिफ्टी’ व ‘एलडी फिफ्टी) तपासणे गरजेचे.
– रंग, आकार, संख्या, भूमिती, पॅटर्न, उभारणी आदींच्या अनुषंगाने रंगीत सापळ्यांचे प्रमाणीकरण हवे.
-लागवड पद्धत, लागवड अंतर, तारीख, आंतरपिके, सापळा पिके, सिंचनाच्या वेळा आदींचे मूल्यमापन.
-वनस्पती वाढ नियंत्रके व वाढ उत्तेजके (बायो स्टिम्युलंटस) यांच्या वापराच्या अनुषंगाने फुलकिडीच्या जीवनचक्रावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन.
-फुलकिडी प्रतिकारक जर्मप्लास्म रोपांचा शोध. हवामान बदलाच्या अंगाने अभ्यास.
-‘आयपीएम’ पद्धतींचे प्रमाणीकरण. संशोधनात शेतकऱ्यांचा सहभाग असावा.
-दक्षिण पूर्व आशियायी देश व जागतिक भाजीपाला केंद्र यांच्या समवेत ‘नेटवर्क’ व संयुक्त प्रकल्प.
-ड्रोनद्वारे फवारणीसाठी फॉर्म्यूलेशन, मात्रा, द्रावण व उंची आदींच्या अनुषंगाने कार्यपद्धतींचे प्रमाणीकरण.
-ग्रीनहाउस, शेडनेट शेतीसाठी प्रमाणित ‘आयपीएम पॅकेज’. Black Thrips
-शास्त्रज्ञ, विस्तार अधिकारी, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आदी सर्वांचा नियंत्रण मोहिमेत सहभाग. पीक प्रात्यक्षिके. गुणवत्तापूर्ण मिरची उत्पादन व मूल्यसाखळी विकास कार्यक्रम प्रशिक्षण.
८) किडीच्या नियमित सर्वेक्षणासाठी ‘जीआयएस’ व जीपीएस तंत्रासह ऑनलाइन सर्वेक्षण (इ पेस्ट सर्व्हेलन्स). क्षेत्रनिहाय कीड नियंत्रण सल्ला.
महाराष्ट्रातील स्थिती
मिरचीचा प्रसिद्ध पट्टा असलेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ब्लॅक थ्रिप्सने त्रस्त केले आहे. डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्रातील (केव्हीके) पीक संरक्षण विभाग तज्ज्ञ उत्तम सहाणे म्हणाले, की जिल्ह्यात मिरचीचे सुमारे २५०० ते तीन हजार हेक्टर, पैकी डहाणू तालुक्यातील क्षेत्र १३५० हेक्टरपर्यंत असावे.
तीन- चार वर्षांपासून मिरची व शेडनेटमधील ढोबळी मिरचीत ही फुलकीड आढळत आहे. केव्हीकेतर्फे १० ते १५ प्रादुर्भावग्रस्त गावांना दिलेल्या भेटीत ७० ते ८० टक्के शेतांमध्ये किमान ५० टक्के प्रादुर्भाव आढळला आहे. आमच्याकडे नोव्हेंबरमध्ये लागवड होते. फेब्रुवारी ते मार्चमध्ये प्रादुर्भाव सुरू होतो. मुख्यत्वे फुलांचे नुकसान होते.
फळात रूपांतर होत नाही. पाच प्रत्यक्ष तर दोन ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम व प्रात्यक्षिके घेऊन जागृती केली आहे. निळ्या व पिवळ्या चिकट सापळ्यांचे व व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक कीटकनाशकाचे २०० लिटरपर्यंत वितरण केले. कृषी विभागाचेही सहकार्य लाभले.
मराठवाडा, विदर्भातील स्थिती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बसवराज भेदे म्हणाले, की मागील वर्षी खरीपापासून जालना, नांदेड येथे शेतकऱ्यांच्या शेतात मिरचीत प्रति फूल तीन ते चार या संख्येने तसेच विद्यापीठ प्रक्षेत्रातही ही कीड आढळली. सध्या ‘ॲड हॉक’ शिफारशी शेतकऱ्यांना सुचवीत आहोत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (अकोला) कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे म्हणाले, की विदर्भातील मौदा, उंबरखेड, भिवापूर या मिरचीच्या प्रसिद्ध पट्ट्यांत मागील वर्षी प्रति फूल ५० ते ६० एवढ्या संख्येने उद्रेक होता.
मेटॅरायझियम व बिव्हेरिया बॅसियाना आदी जैविक कीटकनाशकांचे प्रयोग घेतले. कृषी विभागाच्या साह्याने जागृती कार्यक्रम केले. पुढे सततचा पाऊस व गारपीट यामुळे तसा सर्वच किडींचा प्रादुर्भाव कमी राहिला.
नाशिकमधील समस्या
नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्रज्ञ तुषार उगले म्हणाले, की आमच्या भागात चार वर्षांपासून शेडनेटमधील ढोबळी मिरचीत या थ्रिप्सची समस्या आहे. एकेका फुलात शंभर ते दीडशे एवढी प्रचंड त्यांची संख्या होती.
जास्त ‘शेडिंग’च्या, कमी उंचीच्या किंवा टेनपेट असलेल्या ठिकाणी ही समस्या जास्त आहे. आदर्श ‘स्ट्रक्चर’चे शेडनेट किंवा मोनो फिलामेंट’ प्रकारात जिथे सूर्यप्रकाश आत जास्त येतो अशा ठिकाणी या किडीला लपणे कठीण होते असे निरीक्षण आहे.
माझ्या स्वतःच्या शेतात कॅनॉपीतील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. काकडीचे फूल मोठे असल्याने त्यातही समस्या आहे. परागीभवनानंतर पाकळी फुलापासून वेगळी व्हायला पाहिजे.
मात्र दव, ओलावा असल्यास ‘ओव्हरलॅप’ करून पाकळी चिकटून बसते. त्यामुळे थ्रिप्सला आत लपायला जागा मिळते. कीडनाशक तिथपर्यंत पोहोचत नाही. पाऊस पडल्यानंतर फुलांच्या पाकळ्यांना थ्रिप्स लटकतात. आतील भाग खातात.
त्यानंतर अन्य फुलांवर स्थलांतरित होतात. स्पर्शजन्य कीटकनाशके चार दिवसच प्रभावी राहतात. आम्ही रासायनिक, जैविक, करंज, नीम तेल, रासायनिक अधिक जैविक असे विविध प्रयोग केले. युकॅलिप्ट्स ऑइलचे परिणाम सकारात्मक आढळले. पाकळी सकाळी उमलते. दुपारपर्यंत खुली असते. त्यामुळे सकाळीच फवारणीचा सल्ला देत आहोत.
फवारणी यंत्राच्या नोझलमधून मिळणाऱ्या द्रावण थेंबाचा आकार हा आतील भागात द्रावण पोहोचेल एवढा सूक्ष्म हवा. तो गरजेपेक्षा मोठा असल्यास थेंब ओघळून वाया जातात. ल्यूर तसेच निळ्या, पांढऱ्या चिकट सापळ्यांचाही प्रयोग केला. पांढऱ्या सापळ्यांची परिणामकारकता अधिक आढळली.
संपर्क-
१) डॉ. व्ही. श्रीधर- (आयआयएचआर), ०८०- २८४६६४७१, २८४६६३५३
ई- मेल- vaddi_sridhar@rediffmail.com
२) तुषार उगले (नाशिक)- ८२७५२७३६६८
३) उत्तम सहाणे- (डहाणू) ७०२८९००२८९