Kharif Crop Fertilizers : खरीप पिकांना पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावी ? वाचा संपूर्ण
Kharif Season : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पिकाला शिफारशीत प्रमाणात खते दिली जातात. मातीपरिक्षणानूसार पिकाला खते दिल्यामुळे पिकाची अन्नद्रव्याची नेमकी गरज भागवली जाते. कोरडवाहूमध्ये पिकांना रासायनिक खते दिल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
पीक १० ते १५ दिवस अगोदर तयार होते. रासायनिक खताच्या (Chemical Fertilizer) वापरामुळे सुरुवातीपासून पीक जोमदार वाढते. फुलोरा ८ ते १० दिवस अगोदर येतो.
रासाय़निक खताची मात्रा पेरणीच्या वेळी दिल्यास अधिक फायदेशिर ठरते. खते पिकाला लागू होण्यासाठी ती बियापासून फार लांब पडू देऊ नये. त्यासाठी दुचाडी पाभरीचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरते. खरीप हंगामातील कापूस, तूर, मूग -उडीद, भुईमूग आणि मका पिकाला पेरणीच्या वेळी कोणती खते द्यावीत याविषयीची माहिती पाहुया.
कापूस
कोरडवाहू बिटी कापूस पिकास १२०:६०:६० किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी ४८ किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. बागायती बिटी कापूस पिकास १५०:७५:७५ किलो ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टरी शिफारशीत रासायनिक खतमात्रापैकी ३० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. कापूस पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते.
तूर
२५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. तुर पिकाची लागवड १५ जूलै पर्यंत करता येते. Kharif Sowing
मूग/उडीद
पेरणीच्यावेळी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद हेक्टरी मात्रा द्यावी. मूग/उडीद पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते.
भुईमूग
२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी खतमात्रा पेरणीच्यावेळी जमिनीत पेरून द्यावी. भुईमूग पिकाची पेरणी ७ जूलै पर्यंत करता येते.
मका
१५०:७५:७५ किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतमात्रापैकी अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व ७५ किलो नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते.
माहिती आणि संशोधन – वसंतरान नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी