Market Update : बाजारात कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्त ! शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या
१. कापूस दरावरील दबाव कायम
देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे. यंदा देशात कापूस उत्पादन वाढल्याचे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. अजून २५ लाख गाठी कापूस बाजारात येणे बाकी असल्याचा असोसिएशनचा अंदाज आहे. दुसरीकडे देशातील बाजारात आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये भाव मिळाला. बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. कापसाचे भाव पुढील काही काळ टिकून राहतील, असे अभ्यासकांनी सांगितले.
२. सोयाबीनचे भाव दबावातच
देशातील बाजारात मागील तीन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये भाव मिळाला. सोयाबीन दरातील नरमाई कायम असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १३.७३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४०१ डाॅलरवर बंद झाले. देशात सध्या सोयाबीनचा स्टाॅक पुरेसा आहे. पण सोयाबीन १५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. पण आणखी काही दिवस सोयाबीनचे भाव कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३. मेथीचे भाव तेजीत
बाजारात सध्या मेथीचे भाव तेजीत आहेत. जून महिन्यातील पावसाचा खंड आणि जुलै महिन्यात अनेक भागात झालेल्या पावसाने मेथी पिकाला फटका बसला. परिणामी मेथीचे भाव वाढले आहेत. सध्या मेथीला सरासरी प्रति क्विंटल ६ हजार ते ७ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर प्रतिजुडी २० ते २५ रुपयांचा भाव आहे. मेथीचे भाव पुढील काळातही तेजीत राहू शकतात, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
४. मक्याच्या भावाला काही दिवसांपासून आधार
मक्याच्या भावाला मागील काही दिवसांपासून आधार मिळाला आहे. बहुतांशी बाजारात भावात सुधारणा दिसली. त्यातच बाजारातील मका आवक कमी झाल्याने मागणीही काहीशी वाढलेली दिसते. यामुळे दरात बहुतांशी भागात वाढ झाली. सध्या मक्याला देशातील बाजारात १ हजार ९०० ते २ हजार १०० रुपये भाव मिळत आहे. मक्याच्या बाजारात पुढील काळात १०० ते २०० रुपयांचे चढ-उतार दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. Market Bulletin
५ . यंदा हळद लागवड कमी राहण्याचा अंदाज
प्रमुख हळद उत्पादक राज्ये असलेल्या महाराष्ट्र आणि तेलंगणात अनेक भागात चांगला पाऊस नव्हता. चालू हंगामात महाराष्ट्रात १० ते २० टक्क्यांनी हळद लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तामिळनाडूतील लागवड १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लागवडही १८ ते २२ टक्क्यानी घटण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक मोठ्या प्रमाणात घटलीय. सध्या हळदीची आवक सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी आहे. त्यातच आंध्र प्रदेश आणि काही हळद उत्पादक भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हळदीची बाजारातील आवक कमी झाली. यामुळे दरवाढीला आधार मिळाला. मसाला बोर्डाच्या अंदाजानुसार, देशात १३ लाख ३० हजार टन हळद उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.
हळद निर्यतीचा विचार करता देशातील हळद निर्यात मागील तीन महिन्यांमध्ये जवळपास ४० टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारातच हळदीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारातच जास्त मागणी आहे. परिणामी भारतातून निर्यात वाढत आहे. याचा देशांतर्गत बाजारात हळदीला आधार मिळत आहे. त्यामुळे हळद बाजारातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
source : agrowon