कृषी महाराष्ट्र

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्क्यापर्यंत मोठी वाढ : वाचा सविस्तर

अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्क्यापर्यंत मोठी वाढ : वाचा सविस्तर

 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) रेपो रेटमध्ये (Repo Rate) सातत्याने झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२३) काही प्रमुख अल्पबचत (Small Savings Scheme) योजनांच्या व्याजदरात ०.२० ते १.१० टक्क्यापर्यंत मोठी वाढ जाहीर केली आहे.

विविध मुदत ठेवी (टीडी), मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात भरीव वाढ केली गेली आहे,

तर सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय) आणि आवर्ती ठेव (आरडी) या अन्य योजनांचे व्याजदर कायम ठेवले गेले आहेत. नव्या व्याजदरांचा लाभ एक जानेवारी २०२३ पासून मिळणार असल्याने सर्वसामान्यांना नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आनंदाची बातमी मिळाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ केल्यानंतर, विविध बँका आणि वित्तीय संस्थांनी आपल्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ करायला सुरवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर अल्पबचत योजनांच्या व्याजदरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यानुसार अर्थ मंत्रालयाने आज विविध योजनांच्या व्याजदरात वाढ जाहीर केली.

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर ७.६० टक्क्यांवरून ८.०० टक्के केल्याने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एक, दोन व तीन वर्षीय मुदत ठेवींचा व्याजदर १.१० टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे ६.६० टक्के, ६.८० टक्के व ६.९० टक्के करण्यात आला आहे.

मासिक उत्पन्न योजनेवर ६.७० टक्क्यांऐवजी ७.१० टक्के व्याज मिळेल. करबचतीसाठी लोकप्रिय असलेल्या राष्ट्रीय बचत प्रमाणापत्रावर आता ६.८० ऐवजी ७.०० टक्क्यांनी व्याजाची गणना होईल. किसान विकास पत्रावर ७ टक्क्यांऐवजी ७.२० व्याज मिळणार असून, यातील गुंतवणूक आता १२० महिन्यांत दामदुप्पट होईल. याशिवाय पोस्टात बचत खात्याची (एसबी) सोय असते व त्यावर वार्षिक ४ टक्के दराने व्याज दिले जाते.

योजनांचे व्याजदर (टक्क्यांत)

(जानेवारी ते मार्च २०२३ साठी)
पाच वर्षीय टीडी ७.००
तीन वर्षीय टीडी ६.९०
दोन वर्षीय टीडी ६.८०
एक वर्षीय टीडी ६.६०
एनएससी ७.००
केव्हीपी ७.२० (१२० महिन्यांत दुप्पट)
एमआयएस ७.१०
एससीएसएस ८.००
पीपीएफ ७.१०
एसएसवाय ७.६०
आरडी ५.८०

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top