कृषी महाराष्ट्र

फुले ११०८२ कोएम ११०८२ उसाचा लवकर पक्व होणारा वाण : वाचा संपूर्ण

फुले ११०८२ कोएम ११०८२ उसाचा लवकर पक्व होणारा वाण : वाचा संपूर्ण

 

फुले ११०८२ (कोएम ११०८२) ) (Sugarcane Phule 11082) हा उसाचा लवकर पक्व होणारा नवीन वाण आहे. महाराष्ट्रात सुरू आणि पूर्वहंगामातील लागवडीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे. या वाणाची जाडी, उंची, कांडीची लांबी जास्त असल्याने, सरासरी वजन जास्त मिळते. वाणाचा जेठा कोंब काढल्यास फुटव्यांची संख्या भरपूर मिळते.

फुले ११०८२ (कोएम ११०८२) हा वाण महाराष्ट्रात लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आला आहे. याचे कोसी ६७१ पेक्षा ऊस आणि साखर उत्पादन अधिक मिळते. उसातील व्यापारी शर्करा प्रमाण हे कोसी ६७१ पेक्षा किंबहुना बरोबरीत असल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये साखर कारखान्याचा साखर उतारा वाढविण्यासाठी हा वाण फायदेशीर ठरणार आहे.

बहुस्थानी चाचणी :

पाडेगाव, कोल्हापूर, पुणे आणि प्रवरानगर येथे २०१२-१३ मधील बहुस्थानी चाचणीमध्ये फुले ११०८२ या वाणाचे अनुक्रमे पूर्व हंगामी आणि सुरू लागवडीमध्ये हेक्टरी ११८.३४ टन आणि १०३.३३ टन ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन १७.१९ टन आणि १५.७८ टन मिळाले आहे. कोसी ६७१ या लवकर पक्व होणाऱ्या वाणापेक्षा अनुक्रमे १४.२१ टक्के आणि ८.२६ टक्के अधिक ऊस उत्पादन आणि १५.७९ आणि ४.६४ टक्के साखर उत्पादन मिळाले. पूर्व आणि सुरू हंगामातील फुले ११०८२ या वाणामध्ये व्यापारी शर्करा १४.१२ आणि १३.९४ टक्के मिळाली असून को.सी. ६७१ मध्ये १३.९४ आणि १४.४९ टक्के मिळाली.

महाराष्ट्रातील बहुस्थानी प्रयोग :

१) बहुस्थानी १२ चाचणीमध्ये २०१६ ते २०१८ मध्ये नवीन सुरू हंगामात फुले ११०८२ वाणाचे हेक्टरी ११३.०८ टन उत्पादन आणि १५.७७ टन साखर उत्पादन मिळाले. कोसी ६७१ या लवकर पक्व होणाऱ्या वाणापेक्षा अनुक्रमे १८.११ टक्के आणि २०.७५ टक्के अधिक ऊस आणि साखर उत्पादन मिळाले. सुरू हंगामात फुले ११०८२ या वाणामध्ये व्यापारी शर्करा १३.७५ टक्के मिळाली को.सी. ६७१ मध्ये १३.४९ टक्के मिळाली.

२) तोडणीनंतर खोडव्याचे २०१७-१८ मध्ये फुले ११०८२ वाणाचे उत्पादन हेक्टरी १०१.६३टन आणि साखर उत्पादन १४.६४ टन मिळाले. कोसी ६७१ या लवकर पक्व होणाऱ्या वाणापेक्षा अनुक्रमे १७.६६ टक्के आणि २०.६९ टक्के अधिक ऊस आणि साखर उत्पादन मिळाले.
३) सुरू पिकाच्या खोडव्यामध्ये फुले ११०८२ या वाणाची व्यापारी शर्करा १४.२६ टक्के मिळाली. को.सी. ६७१ मध्ये १३.८४ टक्के मिळाली.

४) लागण आणि खोडवा उसाच्या सरासरी मध्ये फुले ११०८२ वाणाची व्यापारी शर्करा १३.७५ टक्के मिळाली असून को.सी. ६७१ मध्ये १३.४९ टक्के मिळाली. एकूण व्यापारी शर्करा नवीन वाणामध्ये को.सी. ६७१ या प्रचलीत वाणापेक्षा अधिक दिसून येत आहे.

द्विपकल्पी विभाग चाचणी :

या वाणाच्या अखिल भारती पातळीवरील द्विपकल्पी विभाग चाचणीत दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील १४ वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर फुले ११०८२ या वाणाच्या २०१६-१८ या दोन वर्षात एकूण ३९ चाचण्या घेण्यात आल्या.

या चाचण्यांमध्ये (२ लागण पिके आणि १ खोडवा ) फुले ११०८२ या वाणाने कोसी ६७१ पेक्षा ऊस उत्पादनात १५.३२ टक्के, साखर उत्पादनात १३.५२ टक्के वाढ दिसून आली. व्यापारी शर्करा टक्केवारीत फुले ११०८२ आणि को.सी. ६७१ मध्ये एक सारखी दिसून आली.

शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिके :

शेतकऱ्यांच्या शेतावर २० प्रात्यक्षिके कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांमध्ये फुले ११०८२ या वाणाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. सुरू हंगामातील सरासरी ऊस उत्पादन हेक्टरी १३१ टन मिळाले. सर्वाधिक उत्पादन कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला हेक्टरी १४५ टन मिळाले.

फुले ११०८२ वाणाची वैशिष्टे :

१) वाणाचा वाढीचा वेग जास्त असून फुटव्यांची संख्या मर्यादित आहे. पाने मध्यम रुंद, गर्द हिरवी, शेंड्याकडून जमिनीकडे वाकलेली असतात.
२) लवकर पक्व होणारा वाण असल्याने तुरा येतो. ऊस मध्यम जाडीचा, कांड्या एकमेकास तिरकस जोडलेल्या असून ऊस लोळण्याचे प्रमाण कमी आहे.
३) डोळा गोल, लहान आकाराचा, डोळ्याच्या पुढे खाच नाही. पाचटाचे बाहेरील कांड्यांचा रंग हिरवट जांभळा, पाचटाचे आतील कांड्याचा रंग पिवळसर हिरवा असतो.
४) या वाणाची जाडी, उंची, कांडीची लांबी जास्त असल्याने, सरासरी वजन जास्त मिळते. वाणाचा जेठा कोंब काढल्यास फुटव्यांची संख्या भरपूर मिळते.
५) या वाणाची मुळे खोलवर जातात, मुळांचा पसारा अधिक असल्याने पाण्याचा ताण सहन करणारा हा वाण आहे. ऊस लोळण्याचे प्रमाण नगण्य आहे.
६) वाणाच्या वाढ्यावर कूस नसल्याने वाढ्याचा उपयोग जनावरांना चाऱ्यासाठी होतो.
७) फुले ११०८२ हा वाण चाबूक काणी व पाने पिवळी पडणाऱ्या रोगास प्रतिकारक आहे. मर आणि लालकूज रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. खोड कीड, कांडी कीड आणि शेंडे किडीस कमी प्रमाणात बळी पडते.
८) कारखान्याच्या गळिताच्या सुरूवातीस ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये हा वाण गाळपास घेतल्यास साखरेचा उतारा वाढण्यास होते.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top