कृषी महाराष्ट्र

कापूस बाजारभाव : बघा या आठवड्यात किती व कसा राहणार कापूस बाजारभाव ?

कापूस बाजारभाव : बघा या आठवड्यात किती व कसा राहणार कापूस बाजारभाव ?

कापूस बाजारभाव : बघा

पुणेः या आठवड्याची सुरुवात कापूस उत्पादकांना (Cotton Production) चिंतेत टाकणारी होती. दरात अचानक मोठी घट झाल्यानं शेतकऱ्यांना मोटा धक्का बसला होता. आता दर वाढणार नाहीत, असंही काहीजण सांगत होते. मात्र नंतर दर वाढले आणि शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

चालू आठवड्यात कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच सोमवारी देशातील वायदे मोठ्या प्रमाणात तुटले होते. आता वायदे का तुटले होते? त्याची चर्चा आपण त्याच दिवशी केली. त्यात आता आपण जाणार नाही.

मात्र वायदे तुटल्यानंतर बाजार समित्यांमधील दरही कमी झाले होते. कापूस दरात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची घट झाली. कापसाचे दर ७ हजार २०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान पोचले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून कापूस दरात पुन्हा सुधारणा होत गेली.

मात्र बाजारात दर तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस विक्री रोखली. बाजारात कापूस आवक कमी होत गेली. तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात चढ उतार होत राहीले. त्यामुळं कापूस दर मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे ४०० ते ७०० रुपयाने वाढले. पण ही दरवाढ सरकट झाली नाही. म्हणजेच सर्वच बाजारांमध्ये कापसाचे दर या प्रमाणात वाढले नाहीत. काही ठिकाणी दरातील वाढ कमी तर काही ठिकाणी जास्त होती.

आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळाला. हा दर म्हणजे देशातील कापूस दराची सरासरी आहे, हे लक्षात घ्या. राज्यातील दराचा विचार करता आजची दरपातळी ७ हजार २०० ते ८ हजार ४०० रुपये होती.

राज्यातील अकोट, हिंगणघाट, मानवत आणि इतर काही बाजारांमध्ये ८ हजार ५०० रुपयांपेक्षाही जास्त दर मिळाल्याच्या पावत्या सोशल मिडियावर फिरत होत्या. पण हा दर त्या त्या गाड्यांपुरता होता.

आठवड्यात काय घडलं ?

देशातील कापूस बाजार चालू आठवड्यात म्हणजेच सोमवार ते शनिवार या काळात घटलाही आणि वाढलाही. सोमवारी ७ हजार २०० ते ८ हजार २०० रुपयांपर्यंत दरपातळी तुटली होती. मात्र शनिवारी देशातील दरपातळी ७ हजार ६०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान पोचली. म्हणजेच दरात क्विंटलमागं ४०० ते ७०० रुपयांची सुधारणा झाली होती.

सरासरी दर म्हणजे काय ?

आपण नेहमी सरासरी म्हणजेच सर्वसाधारण दराची चर्चा करत असतो. तसा उल्लेखही नेहमी केला जातो. मात्र तरीही काही शेतकरी त्यांच्याकडील दराचा उल्लेख करत माहिती खोटी असल्याच्या कमेंट करत असतात. पण जास्तीत जास्त कापूस ज्या किमतीला विकला जातो तो सरासरी किंवा सर्वसाधारण दर असतो. त्यामुळं हा दर सर्वात कमीही नसतो आणि सर्वात जास्तही नसतो. कारण हे दोन्ही दर सर्वच शेतकऱ्यांना मिळत नाहीत.

पुढील आठवड्यात काय स्थिती राहील ?

पुढील आठवड्यातही कापूस दरात काहीशी वाढ होऊ शकते. मागील दोन दिवसांपासून दर वाढत आहेत. त्यातच सध्या वायदे नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारही तीन दिवस बंद असेल. त्यामुळं कापूस दरात काहीसे चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top