Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा वाढतोय प्रसार !
दौंड : ‘‘गेल्या काही वर्षांपासून ‘लम्पी स्कीन’चा (Lumpy Skin) राज्यासह पुणे जिल्ह्यात प्रसार झाला आहे. लम्पी स्कीन हा त्वचा रोग (एलएसडी) विषाणूजन्य असून, त्याचा प्रसार पशुधनामध्ये (Livestock) अनेक मार्गाने होतो.
गोचिडे, पिसवा, डास तसेच रक्त शोषण करणाऱ्या माश्या यामार्फत त्याचा प्रसार होतो. आपण वेळीच नियंत्रण करून यास प्रतिबंध करू शकतो,’’ असे मत पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. अवधूत जोशी यांनी व्यक्त केले.
आत्मा, दौंड पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत मलठण यांच्या संयुक्त विद्यमाने मलठण येथे जनावरांमधील लम्पी स्कीन आजार, लक्षणे व उपाय या विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
” हे पण वाचा : अचूक कीडनाशके वापराच्या दिशेने एक पाऊल ! वाचा संपूर्ण “
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक पूनम खटावकर व तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी नियोजन केले होते.
या वेळी पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी डॉ. चैत्राली आव्हाड, डॉ. संजय शेलार, कृषी पर्यवेक्षक शिवाजी कदम, कृषी सहायक रवींद्र तापकीर, एबीएस कंपनीचे नीलेश लगड, ज्योती भोसले, तेजश्री ढवळे, कृषिमित्र गणेश देवकाते, बापूराव वाघमोडे, बाळासाहेब भोसले, अमित गिरमकर, भरत थोरात आदी उपस्थित होते.
पशुधन विकास अधिकारी डॉ. चैत्राली आव्हाड म्हणाल्या, की सर्वप्रथम सर्व पशूंचे लसीकरण करणे खूप महत्त्वाचे आहे. यानंतर शेतकऱ्यांनी विविध उपाय करताना त्यांनी गोठा व्यवस्थापन, नाले व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, उकिरडा व्यवस्थापन व पशुधनाच्या शरीरावरील कीटकांचे व्यवस्थापन, रक्त तपासणे, जनावराची प्रतिकार शक्ती टिकवून राहण्यासाठी जनावराला जीवनसत्त्व व खनिजे यांचा योग्य पुरवठा करणे आवश्यक आहे.
हा विषाणू जनावरांमध्ये २ ते ८ आठवड्यांपर्यंत राहू शकतो. तसेच जखमेच्या खपलीमध्ये ३५ दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे. ज्या वेळी लम्पी स्कीन आजाराची लक्षणे दिसताच सर्वप्रथम शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टर यांना बोलावून उपचार सुरू करावेत.प्रशिक्षण कार्यक्रमात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ थोरात यांनी आभार मानले.
स्रोत : agrowon.com