आता शेतकरी उत्पादक कंपनीच शेतीमालाची थेट निर्यात करणार ! वाचा सविस्तर
शेतकरी उत्पादक कंपनीच
पुणेः शेतीमाल आणि अन्नपदार्थ निर्यात साखळीत (Food export chain) शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmers Producers Company) मोलाची भुमिका पार पाडतात. यापुढे मात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनाच थेट निर्यात करता येणार आहे.
या एफपीओंना शेतीमाल आणि अन्नपदार्थ निर्यातीचे प्रशिक्षण अपेडा देणार आहे, असे अपेडाचे अध्यक्ष एम. अंगामुथू यांनी सांगितले.
केंद्र सकारने शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन दिले आहे. शेतीमालाची मुल्यसाखळी विकसित व्हावी आणि शेतीमालाचा व्यापार सुलभ व्हावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या मध्यस्थ आणि सेवा पुरवठादार ठरल्या आहेत. (farmer producer company)
त्यामुळे कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडाने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या क्षमता विकासावर भर दिला आहे. अपेडा शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट निर्यातीसाठी प्रोत्साहन देणार आहे.
अपेडाचे अध्यक्ष एम. अंगामुथू यांनी सांगितलं की, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी निर्यात साखळीत मोलाची भुमिका निभावली त्यामुळे देशातून शेतीमाल आणि अन्न पदार्थ निर्यात वाढली आहे. या कंपन्या शेतीमाल पुरवठा साखळीत थेट खेरदीची केंद्रे ठरत आहेत.
निर्यातदारांनाही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून निर्यातक्षम माल सहज उपलब्ध होत असतो. आता या शेतकरी उत्पादक कंपन्यांनीच थेट निर्यातदार व्हावं यासाठी अपेडा त्यांच्या हातात हात घालून काम करणार आहे.
तसेच निर्यातदार होण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता विकास करणार आहे, असेही अंगामुथू यांनी सांगितलं. FPO Export
मार्चअखेर १ हजार एफपीओ निर्यादार होणार
शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट निर्यात करता यावी यासाठी आयातदार-निर्यादार कोड आणि नोंदणीसह सदस्यत्व प्रमाणपत्र म्हणजेच आरसीएमसी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच अपेडाही या शेतकरी उत्पादक कंपन्यांना पूर्ण मदत करेल.
३१ मार्चपर्यंत १ हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट निर्यातदार करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे, असेही अंगामुथू यांनी सांगितले.
निर्यातीत मोठी संधी
अपेडाने देशातील ७०१ शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रशिक्षित केले आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि इतर राज्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.
निर्यातीसाठी शेतीमाल आणि अन्न पदार्थांना वाढलेली मागणी पूर्ण करण्यात शेतकरी उत्पादक कंपन्या मोलाची भुमिका पार पाडू शकतात.
अपेडाने प्रशिक्षित केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या भरडधान्ये, फलोत्पादने आणि भौगोलिक मानांकने मिळालेली उत्पादनांसह इतर पदार्थ निर्यात करू शकतात, असेही अंगामुथू यांनी सांगितले.
source : agrowon.com