नेपियर घास का ठरतोय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ? वाचा सविस्तर
Dairy Farming: नेपियर घास (Napier Grass) सध्या देशभरात लोकप्रिय होताना दिसत आहे. दुधाळ जनावरांसाठी (Milch Animals) अतिशय पौष्टिक चारा म्हणून नेपियर घास ओळखला जातो.
इतर चाऱ्यांच्या तुलनेत नेपियर घासमुळे जनावरांचे दूध उत्पादन (Milk Production) जास्त वाढते. तसेच जनावरांच्या पोषणासाठी (Animal Nutrition) हे गवत जास्त उपयुक्त ठरते.
जनावरांच्या समतोल आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, आंबवण, खनिज पदार्थ, जीवनसत्त्वे, पाणी यांचा समावेश होतो.
त्यात सुमारे ७० टक्के भाग हा हिरवा चारा असतो. त्यामुळे लुसलुशीत व पौष्टिक चाऱ्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी संकरित नेपिअर हे बहुवार्षिक गवत महत्त्वाचे ठरते.
सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या दुभत्या जनावराला दिवसाला २४ ते २५ किलो हिरवा चारा आणि ५ ते ६ किलो कोरडा चारा लागतो. समतोल आहाराच्या दृष्टीने एकदल व द्विदल चाऱ्याचे प्रमाण निम्मेनिम्मे असावे.
एकदल वर्गीय हिरवा चारा म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, ओट, संकरित नेपिअर इ. १२ ते १३ किलो द्यावा.
तर द्विदल वर्गीय हिरवा चारा म्हणजे लसूण घास, बरसीम, चवळी इ. १२ ते १३ किलो द्यावा.
एकदल चाऱ्यामध्ये शर्करेचे प्रमाण जास्त असते, तर द्विदल चाऱ्यामध्ये प्रथिने, कॅल्शिअम यांचे प्रमाण जास्त असते.
संकरित नेपियर हे बहुवार्षिक गवत बाजरी आणि नेपियर यांच्या संकरातून निर्माण केलेले भरपूर उत्पादनक्षम चारा पीक आहे.
यात बाजरीतील अधिक प्रथिने आणि नेपियरमधील अधिक उत्पादन क्षमतेचा गुणधर्म आणण्यात आले आहेत.
संकरित नेपियर हे जलद गतीने २ ते ३ मीटर उंच वाढणारे व कमीत कमी २० ते २५ फुटवे देणारे चारा पीक आहे.
या पिकात प्रथिनांचे प्रमाण सरासरी १० ते ११ % आहे. या उत्तम प्रतीच्या चारा पिकाची एकदा लागवड केल्यानंतर ३ ते ४ वर्षे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध होतो. तसेच त्यापासून मुरघासही बनविता येतो.
महाराष्ट्रासाठी लागवडयोग्य जाती
१) यशवंत :
* महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जायंट बाजरा व नेपियर यांच्या संकरातून.
* ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण २.४६ % आणि प्रथिने १०.१५ % असते.
* उत्पादन – हेक्टरी १४० मे. टन
२) फुले जयवंत :
* महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या या जातीचे उत्पादन यशवंत गवतापेक्षा १० ते १५ % जास्त.
* ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण कमी. Hybrid Napier Fodder
३) फुले गुणवंत :
* महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित या चारा जातीमध्ये ऑक्झिलिक आम्ल अल्प प्रमाणात २.०५ % व लिग्निन ६.६३ % प्रथिने अधिक प्रमाणात ९.१० %
* कापणीनंतर जोमाने वाढणारी जात, भरपूर फुटवे, मऊ लांब व रुंद पाते.
* चारा पालेदार, हिरवागार, रसदार, रुचकर.
* वाळलेल्या चाऱ्याची पचन शक्ती जास्त ५६.०८ %.
४) संपूर्णा (डीएचएन- ६) :
* भारतीय चारा संशोधन संस्थेअंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र, धारवाड येथे विकसित या चारा जातीमध्ये ऑक्झिलिक आम्लाचे प्रमाण १.९ % व प्रथिनांचे ११ % आहे.
* कापणीनंतर जोमाने वाढते. फुटव्यांची संख्या २५ प्रति ठोंब.
* गोडवा जास्त प्रमाणात, चारा पालेदार, रसदार व रुचकर.
५) कोइमतूर-४ (CO-४) :
* तमिळनाडू कृषी विद्यापीठ येथे विकसित.
गवताचे पाते हिरवेगार, रसरशीत व स्वादिष्ट.
* प्रथिनांचे प्रमाण ११ %.
* उत्पादन हेक्टरी ३०० ते ३७५ टन.
जमीन :
संकरित नेपियर चारा पिकाची लागवड उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत करावी. दलदल, पाणथळ किंवा निचरा न होणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची वाढ खुंटते.
हलकी व मध्यम जमीन उपयुक्त. भारी जमिनीत लागवड करू नये.
सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत उत्पादन जास्त मिळते.
जमिनीचा सामू ५.५ ते ६.० दरम्यान असावा.
हवामान :
उष्ण कटिबंधातील उष्ण व कोरडे हवामान या पिकाला मानवते.
जास्त पर्जन्यमानाच्या (२५०० मि.मी.पेक्षा जास्त) प्रदेशात या पिकाची वाढ चांगली होत नाही.
योग्य वाढीकरिता ३१ अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
पूर्वमशागत :
प्रथम उभी- आडवी खोल नांगर करून कुळवाच्या २ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कोळपणीच्या वेळी हेक्टरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
त्यानंतर लागवडीसाठी सरी वरंबा तयार करावी.
लागवड काळ :
पाण्याची उपलब्धता असल्यास १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता कधीही लागवड करता येते.
पावसाळ्यात जून व ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी – मार्च या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी व स्थिरतेसाठी योग्य असते.
source : agrowon.com