कृषी महाराष्ट्र

कीटकनाशकाच्या बाटलीचा प्रवास ! चार आण्याची कोंबडी बारा रुपयांपर्यंत

कीटकनाशकाच्या बाटलीचा प्रवास ! चार आण्याची कोंबडी बारा रुपयांपर्यंत

कीटकनाशकाच्या

कीटकनाशकाची बाटली दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रवास करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. पण या प्रवासात चार आण्याची कोंबडी बारा रुपयांपर्यंत महागते. सरकारी फायलींवर ठेवलेल्या वजनांसह, कंपन्यांनी विक्रेत्याला थायलंडमध्ये दिलेल्या मसाजचे बिलदेखील शेतकऱ्याच्या खात्यातूनच वजा होते, या खडतर प्रवासामुळे लहानसहान उत्पादक, नवीन संशोधक आणि या व्यवसायात येऊ इच्छिणारे उद्योजक, ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमजोर, पण गुणवान मुले या व्यवसायापासून वंचित राहतात. पण गब्बर राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्या मात्र या व्यवसायात विनासायास घुसतात.

आपल्या शेतात, बागेत वापरत असलेलं कीटकनाशक (Insecticide) आपल्या बंधाशी येईपर्यंत कोणकोणत्या दिव्यांतून पार पडतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. डिलरच्या दुकानातून विकल्या जाणाऱ्या कीटकनाशकाचा जन्म उत्पादकाच्या / उद्योजकाच्या प्रयोगशाळेत किंवा फॅक्टरीत होतो सक्रिय घटक बनवून त्याचे फॉर्म्युलेशन म्हणजे सूत्रीकरण केले जाते. मग सुरू होते सर्वात महत्त्वाची प्रक्रिया, ती म्हणजे कीटकनाशकाची नोंदणी.

जसं बाळ जन्माला आल्यावर ग्रामपंचायतीत जन्मनोंद करावी लागते ना तशी कीटकनाशकाची देखील नोंद करणे आवश्यक आहे. इथं कीटकनाशके म्हणजे फक्त किड्याला मारणारे नव्हे, तर कीटकनाशक, बुरशीनाशक, जिवाणूनाशक, तणनाशक, कोळीनाशक, वृद्धी संजीवक या सर्वांचा समावेश आहे.

कीटकनाशक नोंदणीसाठी उद्योजकाचा सीआयबी म्हणजे केंद्रीय कीटकनाशक बोर्ड या जादुई कार्यालयाशी संबंध येतो, सीआयबी हे भारतामधील वनस्पती कीड आणि रोग नियंत्रणा संबधीच्या बाबी नियंत्रित करणारे सरकारी कार्यालय. नवीन कीटकनाशकाच्या नोंदणीपासून ते जुन्या असंबद्ध उत्पादनांवर बंदी घालण्यापर्यंतचे काम सीआयबी करते.

दिल्लीजवळील फरिदाबाद येथे सीआयबीचे कार्यालय आहे. ते केंद्रीय कीटकनाशक कायदा, १९६८ नुसार काम करते. सध्या ९७५ कीटकनाशके सीआयबीच्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केले गेले आहेत. त्यापैकी ८२० उत्पादनांची नोंदणी भारतात केली गेलीय. कोणतेही कीटकनाशक बनवायचे असल्यास ते सीआयबीच्या शेड्यूलमधील ९७५ उत्पादनांच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.

जर ते या यादीत नसेल तर मात्र त्याला नवीन उत्पादन म्हणून नोंदवणे आवश्यक असते. त्यासाठी सीआयबीमध्ये नवीन उत्पादन नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. सीआयबी बरोबर काम करणे म्हणजे निखाऱ्यावर चालण्यासारखे आहे. इथून काम काढायचे असेल तर दलाल गाठावा लागतो, तोही साहेबांच्या मर्जीतला. हे दिल्लीतील दलाल हलाल करण्यासाठी बकरे शोधात असतात. सीआयबी ही भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली संस्था म्हणून प्रसिध्द आहे. कीटकनाशकाच्या नोंदणीला लागलेली कीड पुढे ते शेतात पोहोचेपर्यंत झिरपत जाते.

रासायनिक चाचण्या, विषशास्त्रीय चाचण्या, पॅकिंग आणि शेल्फ लाइफ, जैव परिणामकारकता चाचण्या यांसारख्या अभ्यास चाचण्यांसाठी लाखो, करोडो रुपये खर्च करावा लागतो. त्यासाठी कीटकनाशक नोंदणीसाठी सीआयबीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

पुलंच्या म्हणण्यानुसार जसे पुण्यातील दुकानांत सर्वांत दुर्लक्ष करण्याजोगी गोष्ट म्हणजे गिन्हाईक असते, तशी सीआयबीच्या वेबसाइटवर तिला भेट देणारा जास्तीत जास्त गोंधळात कसा पडेल, असा प्रयत्न केलेला प्रत्येक क्लिकगणिक जाणवतो. थोड्या अवकाशानंतर तिला रिफ्रेश करावी लागते, बऱ्याच वेळा या वेबसाइटवर ऑनलाइन चलन भरणे म्हणजे सरकारी प्रेसमध्ये चलन छापून घेण्यापेक्षाही कष्टप्रद काम असते.

या जादुई ऑफिसमध्ये कामाचा निपटारा टेबलावर कमी आणि टेबलाखाली जास्त होतो. सीआयबीमध्ये न्यूटनचा जडत्वाचा नियम निकामी होतो. आपली फाइल उडून जाऊ नये म्हणून तिच्यावर भक्कम वजन ठेवावे लागते.

source : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top