कृषी महाराष्ट्र

शेतकरी मित्रांना ट्रॅक्टरसाठी मिळाले १३० कोटी रुपये अनुदान ! वाचा संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांना ट्रॅक्टरसाठी मिळाले १३० कोटी रुपये अनुदान ! वाचा संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांना ट्रॅक्टरसाठी

Tractor Subsidy पुणे : कोरोनानंतर राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) क्षेत्रात मोठ्या घडामोडी होत आहेत. मजूर टंचाईवर (Labor Shortage) मात करण्यासाठी इतर कोणत्याही कृषी यंत्रापेक्षा ट्रॅक्टरच्या खरेदीत (Tractor Sale) वाढ झालेली आहे.

यामुळे ट्रॅक्टर अनुदान (Tractor Subsidy) वाटपाचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १३० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कोरोनानंतर कृषी यांत्रिकीकरणाला वेग आल्याचे चित्र दिसते आहे. सुशिक्षित बेरोजगार, कृषी पदवीधर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुण शेती क्षेत्राशी संलंग्न असलेल्या उपक्रमांमध्ये आलेले आहेत.

मजूर टंचाई तसेच शेतीत आलेले नवे मनुष्यबळ यामुळे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांच्या खरेदीचे प्रमाणही वाढले आहेत.

ट्रॅक्टर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना किमान आठ तर कमाल ७० अश्वशक्तीपर्यंतचे ट्रॅक्टर विकले जात आहेत. त्यापैकी ३० ते ४० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला शेतकरी जास्त पसंती देत आहेत. Indian Tractor

शेतकऱ्यांना विकल्या जात असलेल्या ट्रॅक्टरची किंमत साडेतीन लाखांपासून ते १२ लाख रुपये किमतीपर्यंत आहे. विविध बॅंका ट्रॅक्टरसाठी विनाअडथळ्याच्या कर्जसुविधा व राज्य शासन तत्काळ अनुदान देत असल्याने ट्रॅक्टरखरेदीला वेग आलेला आहे.

अर्थात, ट्रॅक्टरची किंमत कितीही जास्त असली तरी अनुदान मर्यादा मात्र सव्वा लाखापर्यंत आहे. गेल्या वर्षी राज्यात ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना ८१ कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले होते.

मात्र, यंदा चालू आर्थिक वर्ष संपण्याआधीच आतापर्यंत १३० कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले आहे. या आकडेवारीमुळे ट्रॅक्टर खरेदी वाढल्याचे स्पष्ट होते आहे. Indian Tractor

राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर अर्ज केल्यानंतर ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो. सोडतीत शेतकऱ्याचे नाव आल्यानंतर वेळेत ट्रॅक्टर खरेदी केल्यास व त्याची पावती अपलोड केल्यास मध्यस्थाविना अनुदान मिळते.

या सहजसोप्या पद्धतीमुळेच यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील ६४४९ ट्रॅक्टरला अनुदान मिळाले आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ट्रॅक्टर खरेदीत नाशिकसह अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या भागातील शेतकरी आघाडीवर आहेत. Indian Tractor

यांत्रिकीकरणातील सर्व घटकांमध्ये सर्वात जास्त अनुदान ट्रॅक्टरसाठी दिले जात आहे. ट्रॅक्टरच्या तुलनेत यंदा पॉवर टिलरसाठी २० कोटी रुपये, अवजारे बॅंकांसाठी १२ कोटी रुपये, प्रक्रिया संचासाठी १० कोटी रुपये तर स्वयंचलित यंत्र व अवजारांसाठी सव्वा नऊ कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले आहे.

ट्रॅक्टर खरेदीत वाढ झाल्यामुळे ट्रॅक्टर कंपन्यांपाठोपाठ राज्यातील ट्रॅक्टरचलित अवजारे निर्मितीमधील छोट्या मोठ्या कंपन्यांनादेखील चांगले दिवस आले आहेत. कारण, ट्रॅक्टरचलित अवजारांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.

कृषी विभागाने यंदा आतापर्यंत अशा अवजारांवर ३०७ कोटी रुपयांचे अनुदान वाटले आहे. ही रक्कम देशात सर्वाधिक असल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अजून ७५ कोटी रुपयांचे वाटप होणार

राज्यातील ट्रॅक्टरसाठी अनुदान वाढल्याने ट्रॅक्टरचलित अवजारांची खरेदी वाढली आहे. ट्रॅक्टरला अजून किमान ७५ कोटी रुपयांचे अनुदान वाटले जाण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात केवळ २८ हजार अवजारांना अनुदान दिले गेले होते.

अनुदानाची रक्कमदेखील १२६ कोटींच्या आसपास होती. मात्र, चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ अखेरपर्यंत राज्यात जवळपास ट्रॅक्टरवरील अनुदान वाटप १३० कोटींच्या पुढे गेल्याने ट्रॅक्टरचलित अवजारांवरील अनुदान ३०७ कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top