कृषी महाराष्ट्र

मुरघासाबद्दल संपूर्ण माहिती ! मुरघास म्हणजे काय ? व त्याची निर्मिती कशी करावी ?

मुरघासाबद्दल संपूर्ण माहिती ! मुरघास म्हणजे काय ? व त्याची निर्मिती कशी करावी ?

 

निर्मिती

-दुग्धव्यवसाय करीत असताना वर्षभर दुभत्या गाईंना पौष्टिक आहार पुरवणे फार गरजेचे असते.
-आपल्या देशात मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्यांची उभारणी करण्यात आली.
-परंतु अशा प्रकारच्या छावण्या हा काही कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी हिरवा चारा वर्षभर साठविण्याचे नियोजन म्हणजेच मुरघास निर्मिती हा एकमेव पर्याय आहे.
-दूध उत्पादक शेतकरी वर्षभर पौष्टिक हिरवा चारा जनावरांना उपलब्ध करून देऊ शकत नाही. म्हणून पाऊस पडल्यावर जे पहिले पीक तयार होते, म्हणजेच ज्या वेळी मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो, त्याच वेळी त्याचा मुरघास बनवून दीर्घ काळ साठवुनिकीची सोय करणे फायदेशीर असते. आणि हे काम अतिशय कमी खर्चात करता येऊ शकते.
-मागील आठवड्यात आपण येथे मुक्त-संचार पद्धतीच्या गोठ्याची माहिती घेतली. या आधुनिक पद्धतीच्या गोठ्याला जर आधुनिक पद्धतीचं चारा नियोजन म्हणजे मुरघास निर्मितीची जोड दिली तर, सोने पे सुहागा म्हणत तुमचा दूध व्यवसाय वाऱ्याच्या वेगाने नफा कमविण्याकडे वाटचाल करू लागेल. आणि हे कमीत कमी कष्टात जास्त नफा देणारे तंत्रज्ञान आहे.

मुरघास म्हणजे काय ?

 

-मुरघास म्हणजे मुरलेला चारा (घास). अगदी आपल्या मुरांबा किंवा मोरावळ्या सारखा.
-हिरवा चारा त्याच्या पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवाबंद करून वेगवेगळ्या मार्गांनी साठवून ठेवणे म्हणजे मुरघास होय. लोणचे किंवा मोरावळा दीर्घकाळ टिकविण्यासाठी जे पिढ्यानं पिढ्या चालत आलेले मूलभूत तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच काहीसे तंत्रज्ञान मुरघास बनवताना हि लागते.
-मुरघासाला इंग्लिश मध्ये silage सायलेज असे म्हणतात.

मुरघास बनवताना कोणती पिके वापरावीत ?

 

-मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, व काही गवती चारा पिके वापरली जातात.
-यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो.
-मक्याचा मुरघास अतिशय चांगला होतो असा अनुभव आहे. मुरघासासाठी चिकातील मका व फुलोऱ्यातील ज्वारीचा वापर हमखास केला जातो. याबरोबरच ल्युसर्न (lucern) सारखे पीकही एकत्र करून मुरघास बनविता येतो.

मुरघासाचे फायदे !

 

-आधी सांगितल्याप्रमाणे मुरघासामुळे वर्षभराच्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन आगाऊ, पावसाळा असतानाच करता येते.
-उन्हाळ्यातही जनावरांना हिरवा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याची कमाल साधता येते.
-रोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे कष्ट वाचतात, तोच वेळ शेतकरी इतर नफेशीर गोष्टींसाठी देऊ शकतो.
-वर्षभर चांगल्या प्रतीचा एकसारखा चारा मिळत राहिल्याने जनावरांमधील पोटाचे आजार कमी होऊन आरोग्य वाढते. चाऱ्याच्या प्रतीमध्ये पारंपरिक पद्धतीने पावसाळा आला कि हिरवागार आणि उन्हाळ्यात कडबा, सुकलेले गवत यामुळे जनावरांचे आरोग्य बिघडते आणि दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
-कमीत कमी जमीन असणारा दूध उत्पादक शेतकरीसुद्धा मुरघास केल्यावर जास्त गाईंचा आरामशीर सांभाळ करू शकतो, तेदेखील चाऱ्यावरील खर्चाची पर्वा न करता !
-स्वतःचे शेत नसेल त्यांनी, किंवा इतर पिके असणाऱ्यांनी – चारा मुबलक असतो, तेव्हा त्याची किंमत कमी असते. अशा वेळी चारा विकत घेऊन त्याचा मुरघास बनविणे आणि साठवणूक करणे अतिशय हुशारीचा सौदा आहे. यामुळे खर्चात भरपूर बचत होते.
-मुरघासामुळे हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारते. खुराकामधे काही प्रमाणात बचत होते.
-जनावरे मुरघास आवडीने खातात. त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. दूध उत्पादनात अप्रत्यक्षरीत्या वाढ होते.
-दुष्काळाचा काहीही विपरीत परिणाम होत नाही.
-मुरघासाचा चारा पीक ७५ ते ८० दिवसात तयार होते. त्या जमिनीत पुन्हा लगेच दुसरे पीक घेणे सोपे जाते.

मुरघास न करण्याची सांगितली जाणारी कारणे !

 

-चांगला पौष्टिक चारा खराब होण्याची भीती वाटते.
-काही ठिकाणी मुरघास खराब झालेला पाहिल्याचा अनुभव असतो.
-मुरघास तयार करणे आणि वापरणे हा फक्त मोठ्या गोठ्यांसाठीच आहे अशी शंका.
-मुरघास खर्चिक आहे अशी समजूत.
-मुरघास निर्मिती का आणि कशा पद्धतीने करायची याची योग्य माहिती नसणे.

मुरघास बनविण्याचे प्रकार !

 

-बॅगेतील मुरघास
-खड्ड्यातील मुरघास
-बांधकामातील मुरघास

मुरघास बनविण्याची प्रक्रिया !

 

-मका व ज्वारी सारखी चारापिके ७५-८० दिवसात कापणीला येतात. चारापिके त्यांच्या चिकाच्या किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत आली की कापावीत.
-मुरघास बनविताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असावे. त्यापॆक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून पीक कापणी नंतर थोड्यावेळ साठी चारा सुकू द्यावा.
-त्यानंतर कुट्टी मशीन च्या साह्याने चाऱ्याचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून ना ठेवता त्वरित बॅगेत, खड्ड्यात किंवा बांधकाम केलेल्या जागी आणून टाकावी.
-कुट्टी टाकल्यानंतर ती पसरवावी. धुमश्याने किंवा पायाने अथवा ट्रॅक्टरने तुडवावी. यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते. व कुट्टी दाबून बसते. कडांवरची कुट्टी विशेषतः चांगली दाबून घ्यावी.
-एकावर एक चाऱ्याचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लॅस्टिक चे आच्छादन घालावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होतो. मुरघासाबद्दल मुरघासाबद्दल मुरघासाबद्दल मुरघासाबद्दल 
-त्यानंतर प्लॅस्टिक आच्छादना वर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
एक चौरस फूट जागेत १५ ते १६ किलो चारा तयार होतो. म्हणून त्यानुसार गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे.
-मुरघास बनविताना प्रत्येक थरावर काही जिवाणू असलेले द्रावण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही. मुरघासाबद्दल मुरघासाबद्दल
-बहुतेक वेळा या सर्व गोष्टींची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे मुरघास तयार करताना अपयश येते. त्यामुळे पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. प्रायोगिक तत्वावर मुरघास करून पाहावा. शिकून घ्यावे. शक्य असल्यास जिवाणूंचे द्रावण फवारावे. त्यामुळे चार खराब होण्याची शक्यता कमी होते. पहिल्याच प्रयत्नात चांगला मुरघास तयार होतो.
-आपण चारा हवाबंद केल्यानंतर त्यामध्ये राहिलेल्या हवेतील प्राणवायूचे श्वसन हिरव्या चाऱ्यामुळे होते. हवाबंद झाल्याने बुरशी लागत नाही. बुरशीला प्राणवायू मिळत नाही व जिवाणूंमार्फत लॅक्टिक ऍसिडची निर्मिती झाल्यामुळे चारा टिकून राहतो.
-मशीन द्वारे देखील तुम्ही मुरघास बनवू शकता.
-हिरवा चारा व्यवस्थित हवाबंद करून साठवून ठेवल्याने फायदाच फायदा आहे.

  • मनातील शंका कुशंका काढून आत्मविश्वासाने मुरघास निर्मिती करा आणि दुधाचे भरघोस, बक्कळ उत्पादन दरवर्षी घ्या.

 

संदर्भ :- powergotha.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top