कृषी महाराष्ट्र

पुरवठा प्रक्रिया साखळी करा सक्षम तरच थांबेल भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी

पुरवठा प्रक्रिया साखळी करा सक्षम तरच थांबेल भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी

पुरवठा प्रक्रिया साखळी

भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी थांबवायची असेल तर क्लस्टरनिहाय शीत साठवणुकीच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील. पुरवठा साखळी सक्षम करावी लागेल. भोगी तसेच संक्रांतीच्या पार्श्वभुमीवर १-२ दिवस फळे भाजीपाल्यांचे दर वधारले होते. वाल, वांगी, गाजर ह्या भाज्या ३०-४० रुपये पाव अशा दराने ग्राहकांना घ्याव्या लागल्या. देशी पावटा दराने तर विक्रमच (२०० रुपये प्रतिकिलो) केला.

अर्थात सणावारांनिमित्त फळे भाजीपाल्याला मिळणाऱ्या चढ्या दराचा फायदा उत्पादक शेतकऱ्यांना झालाच नाही. मध्यस्थ, व्यापारीच अशावेळी स्वतःची चांदी करून घेतात. भोगी संक्रांत सण संपत नाही तोच भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. टोमॅटोच्या दरात तर नेहमी चढ उतार दिसून येत असतात. टोमॅटो आता बाराही महिने उपलब्ध होत असल्याने अधिकांश काळ टोमॅटोचे दर पडलेलेच असतात, यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान टोमॅटो दराचा आलेख चढता राहिला तर नोव्हेंबर ते जानेवारी आत्तापर्यंत हा आलेख सारखा खाली खाली जात आहे.

सध्या ३ ते ४ रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना टोमॅटो विकावे लागत आहेत. मेथीपासून ते कोबीपर्यंत अशा इतरही भाज्यांचे दर कमीच आहेत. भाजीपाला हा नाशवंत असल्याने काढणीनंतर १-२ दिवसांत विकावाच लागतो, नाहीतर तो खराब होऊन शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागतो, उत्पादक शेतकऱ्यांच्या या मजबुरीचा फायदा व्यापारी मध्यस्थ घेत असतात.

खरेतर मागणी पुरवठ्यानुसार भाजीपाल्याचे दर ठरायला हवेत. परंतु असे नेहमीच होत नाही. अनेकवेळा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असला तरी भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत नाही. सध्या टोमॅटोच्या बाबतीत असे घडत आहे. हेही मध्यस्थ तसेच व्यापाऱ्यांची खेळी असते.

काही वेळा शेतरस्त्याच्या कडेला टोमॅटोसह इतरही नाशवंत भाजीपाला फेकून दिलेला आपण पाहतो, तर काही शेतकरी कोबी, टोमॅटो, वांग्याच्या उभ्या शेतात जनावरे सोडतात, अथवा त्या शेतात थेट रोटर फिरवितात अशावेळी उत्पादक शेतकऱ्यांना या बाबत विचारले असता, त्यांचा उत्पादन खर्च तर सोडाच, परंतु अशा शेतीमालास मिळत असलेला दर आणि त्यातून आलेल्या पैशातून तो बाजारात नेऊन विकण्याचाही खर्च निघत नाही, असा त्यांचा अनुभव असतो, हे सर्व भीषण आहे. अनेक वेळा भाजीपाल्यास शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना द्यावा लागत असलेला दर यात ४-५ पटींचा फरक असतो.

अर्थात बहुतांश वेळा भाजीपाल्यास मागणी असते, दरही चांगला असतो, तो उत्पादकांच्या पदरात मात्र पडू दिला जात नाही. फळे भाजीपाल्याची साठवण तसेच पुरवठा व्यवस्था सक्षम नसल्यामुळे आणि बाजार समित्यांमध्ये व्यापारी, मध्यस्थांची मनमानी चालत असल्याने असे घडते. कोणताही भाजीपाला आता जवळपास वर्षभर मिळत असला तरी त्यांचा मुख्य हंगाम हा हिवाळी आहे, खरिपात नैसर्गिक आपत्ती तर उन्हाळ्यात पाणीटंचाई यामुळे रब्बी हंगामात भरपूर भाजीपाला पिकतो. भाजीपाल्याच्या दरात व्यापाऱ्यांची मनमानी थांबवायची असेल क्लस्टरनिहाय शीत साठवणुकीच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील, त्याचबरोबर पुरवठा साखळी सक्षम करावी लागेल.

व्यापाऱ्यांच्या कार्टेलला बळी न पडण्यासाठी शेतकऱ्यांनी, त्यांचे गट, उत्पादक कंपन्या यांनी थेट विक्रीत उतरायला पाहिजेत, असे झाल्यास उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील, ग्राहकांनाही ताजा भाजीपाला सध्याच्या तुलनेत थोड्या कमी दरातच मिळेल, भाजीपाला प्रक्रिया आणि निर्यातीतही मोठ्या सुधारणा आवश्यक आहेत. ज्या भागात जो भाजीपाला पिकतो, त्यावर त्याच भागात प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत. यातही शेतकऱ्यांचे गट, कंपन्या यांनीच आघाडी घ्यायला हवी. युरोप, आखाती देशांसह आपल्या शेजारील पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका या देशांत ताजा भाजीपाला तसेच प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे झाले तर भाजीपाल्याचे दर टिकून राहतील तसेच उत्पादकांच्या पदरी निराशा नाही तर चार पैसे देखील पडतील.

Source : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top