शेवग्याची पाने जनावरांना चारा म्हणूनही उपयुक्त ? वाचा संपूर्ण माहिती
शेवग्याची पाने
Shevga Leaves : शेवगा झाडांची विशेषतः घराभोवती किंवा शेताच्या बांधावर घरगुती वापरासाठी लागवड केली जाते. शेवग्याचे (Moringa) मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीत केला जातो.
हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. त्यामुळे बाजारपेठेत शेवग्याची मागणी (Demand Of Moringa) दिवसेंदिवस वाढत आहे.
महाराष्ट्रात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू (Rainfed) आहे. त्यामुळे बऱ्याचशा जमिनी हलक्या आणि नापिक म्हणून पडून आहेत.
शेवगा पीक पावसाच्या पाण्यावर येणारे असल्यामुळे अशा जमिनीत शेवग्याची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येते.
शेवग्याचा पानांचा उपयोग चारा म्हणून केल्यास चारा टंचाईच्या काळात शेवगा हे पीक फायदेशिर ठरु शकते.
शेवग्यामध्ये टॅनिन, ट्रीप्सीन आणि अमायलेज या घटकांचे प्रमाण अतिशय कमी असते. तर पानांमध्ये २१.८ टक्के प्रथिने, २२.८ टक्के तंतूमय पदार्थ, ४.१२ टक्के स्निग्ध पदार्थ, २१.१२ टक्के कार्बोदके असतात. Moringa
फायदे काय आहेत ?
मेंढ्याच्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश केल्यास मेंढ्यांच्या वजनामध्ये वाढ, दुध उत्पादनात वाढ आणि शेळ्यांच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा आढळून आलेली आहे.
शेवग्याची पाने वाळवूनही जनावरांना खाऊ घालता येतात.
शेवग्याच्या पानांची कापणी
शेवग्याच्या पानांची कापणी झाडाची उंची १.५ ते २ मीटर म्हणजेच लागवडीनंतर ६० ते ९० दिवस झाल्यानंतर करावी. कापणी करताना जमिनीपासून २० ते ४५ सेंमी उंचीवर करावी. त्यामुळे नविन अंकूर फुटण्यास वाव मिळतो. त्यानंतरची कापणी ३५ ते ४० दिवसांनी करावी. (Fodder Management)
चाऱ्यासाठी शेवग्याची कापणी करायची असल्यास ७५ दिवसानंतर करावी. अंतरपीक म्हणून शेवग्याची लागवड केली असल्यास २ ते ४ महिन्याच्या अंतराने कापणी करावी.
अशावेळी कापणी करताना दुसऱ्या आंतरपीकावर शेवगा झाडाच्या सावलीचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.
source : पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन