Cotton Bajarbhav : कापूस बाजारावर पावसाच्या अंदाजाचा परिणाम दिसू शकतो का ?
Cotton Bajarbhav
Cotton Market : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. आज कापूस बाजारात काहीशी संमिश्र स्थिती दिसली. काही बाजारांमध्ये दरात किंचित सुधारणाही पाहायला मिळाली. पण सरासरी दरपातळी दबावातच होती.
त्यातच हवामान विभागाने यंदा काही भागात कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे कापूस लागवड किती होते आणि वेळेवर होते का? याचाही परिणाम बाजारावर दिसू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात कापूस बाजारात संमिश्र चित्र दिसलं. काही बाजारात कापसाच्या दरातील नरमाई कायम होती. तर काही बाजारांमध्ये दर स्थिर दिसले. काही ठिकाणी दरात किंचित सुधारणा झाली होती. पण एकूण सरासरी दरपातळी आजही कायम दिसली.
कापसाला आजही सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाचा भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. कापसाचे भाव दबावात आल्याने शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसत आहे. Cotton Market
आवकेचा विचार करता आजही देशातील बाजारात दबाव होता. देशात आज एक लाख गाठीच्या दरम्यान आवक झाली होती. गुजरात आणि महाराष्ट्रातील आवक जास्त आहे. दोन्ही राज्यांमध्येच जवळपास ८० हजार गाठींची आवक होत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यंदा कापूस मोठ्या प्रमाणात मागे ठेवला होता.
पण हे शेतकरी आता कापूस विकत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसत आहे. फेब्रुवारीपर्यंत देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत होता. पण सध्याचा दर पाहता शेतकऱ्यांना सरासरी दीड हजार रुपयांचा फटका बसत आहे. (Cotton Production)
खरिपाच्या लागवडीसाठी विक्री सुरु आहे. ही विक्री पुढील काही दिवसांमध्ये कमी होऊ शकते. कारण आर्थिक नड असलेले शेतकरी मिळेल त्या भावात कापूस विकत आहेत. पण खरिपाच्या पेरण्या झाल्यानंतर शेतकरी या भावात कापूस विकणार नाहीत.
तसेच जे शेतकरी जास्त काळ थांबू शकतात, त्यांचाही कापूस लगेच बाजारात येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जून महिन्यातही संपूर्ण कापूस बाजारात येण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. (Cotton Market)
हवामान विभागाने काल देशातील माॅन्सून काळात किती पाऊस पडेल याचा अंदाज व्यक्त केला. त्यातच महत्वाच्या कापूस उत्पादक भागांमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरातमध्ये कापूस लागवड जास्त असणाऱ्या काही भागातही सारसरीपेक्षा पावसाचे प्रमाणा कमी राहू शकते, असा अंदाज आहे.
तसेच कापूस लागवडीसाठी महत्वाचा असलेल्या जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे खरिपात कापूस लागवड किती होते आणि केव्हा होते, हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच यामुळे बाजारात चढ उतारही दिसू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
source : agrowon