हरभऱ्यातील घाटे अळीचे व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण
हरभऱ्यातील घाटे
रब्बी हंगामात मुख्य डाळवर्गीय पीक म्हणून हरभरा पिकाची लागवड केली जाते. हरभरा पिकांत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.
रब्बी हंगामात (Rabi Season) मुख्य डाळवर्गीय पीक म्हणून हरभरा पिकाची लागवड(Chana Management) केली जाते. हरभरा पिकांत विविध कीड-रोगांचा (Pest-disease) प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे.
हरभरा (Chana Crop) पिकामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या अळीचे शास्त्रीय नाव हेलिकोव्हर्पा आर्मीजेरा असे आहे. ही बहुभक्षीय कीड असून, सुमारे १८१ पेक्षा अधिक पिकांवर तिचा जीवनक्रम पूर्ण करते.
सध्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटे (Chana Crop Pod Borer Management) अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
फुलोरा अवस्थेतील पिकाचे नुकसान होत आहे. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था तसेच प्रथम अवस्थेतील असल्यामुळे वेळीच उपाययोजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते.
यंदा बहुतांश भागात हरभरा पेरणीस उशीर झाला आहे. काही ठिकाणी हरभऱ्याचे पीक कळ्या, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे.
तर वेळेवर पेरणी झालेल्या ठिकाणी हरभरा पीक घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिला आहे.
हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी Tआकाराचे प्रति एकर २० पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ % इसी) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची २०० ग्रॅम १० लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. करडई पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
सध्याच्या ढगाळ व धुक्याच्या वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा अॅसिफेट (७५ %) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जीवनक्रम
या अळीच्या अंडी, अळी, कोष आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था अधिक नुकसानकारक असते.
मादी पतंग गोलाकार हिरवट पिवळसर रंगाची सुमारे साधारणपणे २५० ते ५०० अंडी पाने, कळी व फुलांवर घालते.
अंड्यातून ५ ते ६ दिवसांत अळी बाहेर पडते.
अळीचा रंग हिरवट असतो. साधारण १४ ते २० दिवसांत अळीची वाढ पूर्ण होते. त्यानंतर पिकाजवळील जमिनीत ती कोषावस्थेत जाते.
कोष अवस्था साधारण एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असतो.
नुकसानीचा प्रकार
साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश या बाबी किडीच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात.
लहान अळी पानातील हरितद्रव्ये खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसतात. मोठी अळी कळी, फुले आणि घाट्यावर उपजीविका करते.
एक अळी साधारणपणे ३० ते ४० घाटे खाते. त्यामुळे पिकांत सुमारे ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
अळीचे अर्धे शरीर हरभरा घाट्यामध्ये तर अर्धे शरीर बाहेर असे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहे.
रासायनिक नियंत्रण :
(फवारणी प्रति १० लिटर पाणी)
आर्थिक नुकसान पातळी : १ ते २ अळ्या प्रति एक मीटर ओळ किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळा.
इमामेक्टीन बेन्झोएट (०.५ टक्के एसजी) ४.४ ग्रॅम किंवा
क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एससी) ३ मिलि किंवा
इन्डोक्झाकार्ब (१५.८० ईसी) ६.६६ मिलि किंवा
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (३ टक्के ईसी) ८ मिलि
आवश्यकतेनुसार १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
(लेबलक्लेम आहेत)
एकात्मिक कीड व्यवस्थापन
उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी. त्यामुळे अळीची कोष अवस्था जमिनीवर उघडी पडून सूर्यप्रकाशामुळे किंवा पक्ष्यांमुळे नष्ट होते.
योग्य वेळी आणि योग्य अंतरावर हरभरा पिकाची पेरणी करावी.
मका किंवा ज्वारीची हरभरा पिकामध्ये पक्षिथांबे म्हणून लागवड करावी.
पीक ३० ते ४५ दिवसांचे झाल्यानंतर आंतरमशागत व कोळपणीची कामे करावीत.
आंतरमशागत करून तणवर्गीय वनस्पती जसे कोळशी, रानभेंडी, पेटारी इत्यादी काढून टाकावे.
शेतामध्ये एकरी २० ते २५ पक्षिथांबे उभारावेत.
एकरी ५ ते ६ कामगंध सापळे लावावेत.
मुख्य पिकाभोवती एक ओळ झेंडूची लावावी. जेणेकरून कीड झेंडूकडे आकर्षित होईल.
पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
पीक कळी अवस्थेत असताना अझाडिरेक्टीनची (३०० पीपीएम) फवारणी करावी.
प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) १ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.
– अमोल ढोरमारे, ९६०४८३३७१५
(लेखक कीटकशास्त्र विषयाचे अभ्यासक असून, वडवणी येथील विधाका शेतकरी उत्पादक कंपनीत कार्यरत आहेत.)
– विजय शिंदे, ९७६७८२२१५७
(सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय डोंगर शेळकी तांडा,
उदगीर, जि. लातूर)