कृषी महाराष्ट्र

Weather Forecast : थंड आणि कोरड्या हवामानाची शक्यता !

Weather Forecast : थंड आणि कोरड्या हवामानाची शक्यता !

Weather Forecast

मंगळवारी (ता. २४) महाराष्ट्राचे उत्तर भागावर १०१२ व दक्षिण भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होताच, थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल. कमाल व किमान तापमानात अल्पशी वाढ होईल. ही स्थिती आठवडा अखेरपर्यंत कायम राहील.

महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब (Air Pressure) आज व उद्या (ता.२२,२३) राहील. त्यामुळे सध्याचे थंडीचे प्रमाण कायम (Cold Weather) राहील.

मात्र, मंगळवारी (ता. २४) महाराष्ट्राचे उत्तर भागावर १०१२ व दक्षिण भागावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब होताच, थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल. कमाल व किमान तापमानात (Minimum Temperature) अल्पशी वाढ होईल. ही स्थिती आठवडा अखेरपर्यंत कायम राहील.

महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे समुद्राकडून येणारे वारे अल्पशा प्रमाणात ढग वाहून आणतील. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) निर्माण होईल.

तसेच किमान व कमाल तापमानात किंचित वाढ होईल. थंडीचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवेल. हवेत आर्द्रतेचे प्रमाण सामान्यतः कमी राहण्यामुळे महाराष्ट्रात हवामान थंड व कोरडे राहील.

मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. या पुढील काळात दिवसाचा कालावधी हळूवारपणे वाढत जाऊन रात्रीचा कालावधी कमी होत जाईल.

अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस तर बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील.

प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे प्रशांत महासागराच्या दिशेने हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन वारे त्या दिशेने वाहण्यास सुरवात होईल. ( Weather Forecast )

पश्‍चिमी चक्रावाताचा प्रभाव वाढल्यास उत्तर भारतात हवामान बदल जाणवतील. महाराष्ट्रात हवामान स्थिर राहील.

कोकण :

कमाल तापमान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात २८ ते २० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. मात्र ठाणे व पालघर जिल्ह्यात आकाश निरभ्र राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७८ टक्के तर रायगड जिल्ह्यात ५२ टक्के, ठाणे व पालघर जिल्ह्यात ४७ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यात २६ ते २८ टक्के तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा ठाणे जिल्ह्यात आग्नेयेकडून व उर्वरित जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. (Weather Forecast)

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २८ ते २९ अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान नाशिक जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस राहील, तर जळगाव जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील.

नाशिक व जळगाव जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ३० ते ३७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ कि.मी. आणि दिशा आग्नेय व नैऋेत्येकडून राहील.

मराठवाडा :

कमाल तापमान उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील.

वाऱ्याच्या दिशेतील बदलाने असे घडेल. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस तर जालना जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील.

नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

जालना व औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४५ टक्के राहील. बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ५८ टक्के तर उस्मानाबाद, लातूर व नांदेड

जिल्ह्यात ६१ ते ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २५ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा वेग उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ताशी १७ कि.मी. राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ९ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व नैऋेत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ :

कमाल तापमान अकोला व वाशीम जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, अकोला व अमरावती जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३३ टक्के राहील.

वाशीम जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ किमी, तर उर्वरित जिल्ह्यात ताशी ८ ते १३ किमी राहील. वाऱ्याची दिशा बुलडाणा जिल्ह्यात नैऋेत्येकडून व इतर जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ :

यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६२ टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. हवामान कोरडे राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ४७ ते ५५ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ६८ ते ७१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २४ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर सातारा, पुणे व नगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पुणे व नगर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ४८ टक्के तर सातारा व सोलापूर जिल्ह्यात ५७ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २२ ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात ताशी ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला :

१) सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. त्यात कोथिंबीर, मुळा, घेवडा यांसारखी आंतरपिके घ्यावीत.

२) कलिंगड, खरबूज, काकडी, भेंडी, दोडका, गवार, तीळ, मधुमका, बाजरी या पिकांची लागवड बागायत क्षेत्रात करावी.

३) आंबा झाडांस आलेल्या मोहराची काळजी घ्यावी.

४) उन्हाळी तीळ पिकाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करावी.

Source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top