कापसाची उत्पादकता आधुनिक लागवड तंत्रातून वाढेल ! वाचा सविस्तर
कापसाची उत्पादकता
Cotton Crop : कापूस या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. लागवड मध्यम ते भारी जमिनीमध्ये करावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते.
फेरपालट -पीकपद्धतीप्रमाणे बागायती लागवडीमध्ये गहू, भुईमूग ही पिके घेतलेल्या शेतात, तर कोरडवाहू क्षेत्रात ज्वारी, सोयाबीन ही पिके घेतलेल्या शेतात कापसाचे पीक घ्यावे.
वाणाची निवड- बाजारात उपलब्ध असणाऱ्या वाणांतून योग्य वाण निवडताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.
-हा वाण रस शोषण करणाऱ्या किडी- रोगांना सहनशील असावा. ज्यामुळे फवारण्यांची संख्या कमी झाल्यामुळे कीड – रोग व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल.
-कोरडवाहूसाठी वाण पाण्याचा ताण सहन करणारा असावा.
-सघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण (उंची व फांद्यांची लांबी कमी) असणारा असावा.
-अधिक वाढ असणारा वाण सघन लागवडीमध्ये उपयुक्त राहणार नाही.
-आपल्या भागात अधिक उत्पादन देणारा असावा. त्याचे धाग्याचे गुणधर्म सरस असावेत. ज्यामुळे बाजारभाव अधिक मिळेल. (Cotton Production)
वाणाची निवड
कोरडवाहू लागवडीसाठी कमी (१४०-१५० दिवस) ते मध्यम (१५०-१६० दिवस) कालावधीचा, तर बागायतीसाठी बीटी वाणाचा कालावधी १६० ते १८० दिवस असावा. बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम (३ ते ४ ग्रॅम), तर बागायतीसाठी मोठा (४ ग्रॅमपेक्षा जास्त) असावा.
लागवडीची वेळ- कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर लागवडीच्या वेळेवर अवलंबून असते. मराठवाड्यामध्ये पूर्वहंगामी (बागायती) कापूस पिकाची ठिबक सिंचन पद्धतीने लागवड १ ते ७ जून या काळात (तापमान ३९ अंशांपेक्षा कमी झाल्यावर) करावी, तर कोरडवाहू लागवड मॉन्सूनचा ७५-१०० मिमी पाऊस झाल्यावर करावी.
लागवडीचे अंतर लागवड प्रकार बागायती कोरडवाहू
१) मराठवाडा पारंपरिक पद्धत ६ बाय एक फूट ४ बाय १.५ फूट
किंवा ५ बाय १ फूट.
जोड ओळ ४-२ बाय १ फूट
सघन ——- ३ बाय १ फूट
२) विदर्भ —— ४ बाय ३ फूट ३ बाय २ फूट
३) पश्चिम महाराष्ट्र व खानदेश ४ बाय २ फूट मध्यम
जमीन- ३ बाय २ फूट.
३ बाय ३ फूट भारी जमीन- ३ बाय ३ फूट.
बीज प्रक्रिया
बुरशीनाशक- स्युडोमोनास फ्लुरोसन्स १० ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मर व करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी)
जिवाणूसंवर्धके- अॅझॅटोबॅक्टर (नत्र स्थिरीकरणासाठी) व स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (अविद्राव्य स्फुरद विद्राव्य करण्यासाठी). मात्रा- द्रव स्वरूपातील- १० मिलि प्रति किलो बियाणे.
बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी.
आंतरपिके- फायदेशीर पद्धती
कापूस + मूग (१:१)
कापूस + उडीद (१:१)
कापूस + सोयाबीन (१:१)
रुंद ओळींमध्ये कापूस + मूग (१:२)
कापूस + तूर (४-६:१ किंवा ६-८:२)
कापूस + ज्वारी + तूर + ज्वारी (६:१:२:१)
सघन लागवड पद्धत
लागवड अंतर : ९० × ३० सेंमी (३ × १ फूट)
वाण – फक्त आटोपशीर ठेवण (फांद्यांची लांबी आणि उंची कमी) असणारेच वाण निवडावे.
वाढनियंत्रकाचा वापर- क्लोरमेक्वाट क्लोराइड या वाढ नियंत्रकाची पाते व फुले लागताना दोन वेळा जमिनीत ओल असताना फवारणी करणे आवश्यक. यासाठी १२ मिलि प्रति १० लिटर पाणी असे त्याचे प्रमाण वापरावे.
सघन लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा २५ टक्के जास्त (१५०:७५:७५ नत्र, स्फुरद व पालाश किलो प्रति हेक्टर) वापरावी. Cotton Production
एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
-सेंद्रिय खते- कोरडवाहू लागवडीसाठी पाच टन शेणखत तर बागायतीसाठी १० टन शेणखत प्रति हेक्टर
-बागायती व कोरडवाहूसाठी रासायनिक तसेच विद्राव्य खतांच्या मात्रा, विभागणी व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर यांचे वेळापत्रक संबंधित लेखक तज्ज्ञांकडून घेता येईल.
तण नियंत्रण व्यवस्थापन
लागवडीपासून ३० दिवसांपर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. दोन वेळा निंदणी व ३ ते ४ वेळा वखरणी करावी.
तणनाशके :
१) उगवणीपूर्व- पेंडीमिथॅलीन ३० ईसी २.५ ते ३.३ लिटर प्रति हेक्टर (२५ ते ३३ मिली प्रति १० लिटर पाणी) – लागवडीनंतर परंतु उगवणीपूर्वी ओलसर जमिनीवर समप्रमाणात फवारावे. फवारणीसाठी हेक्टरी एकहजार लिटर पाणी वापरावे.
२) उगवणीपश्चात- पायरीथायोबॅक सोडिअम ६ टक्के अधिक क्विझॉलफॉप इथाइल ४ टक्के एमईसी (लेबल क्लेम) – ६२५ मिलि प्रति हेक्टर- लागवडीनंतर २१ ते २८ दिवस किंवा तणे २-४ पानावर असताना वापरावे, फवारणीसाठी हेक्टरी ५०० लिटर पाणी वापरावे.
कीड नियंत्रण
-कापसाच्या पऱ्हाट्या व अवशेषाची शेतात, बांधावर व गावात साठवण करू नये.
-दीर्घ कालावधीच्या वाणांची लागवड करू नये.
-पीक फेरपालट करावी.
-शिफारशीपेक्षा अधिक प्रमाणात नत्राचा वापर टाळावा.
-मूग, उडीद, सोयाबीन, चवळी, झेंडू, मका, ज्वारी, राळा, भगर, एरंडी आदी आंतरपिके घ्यावीत.
-कडुनिंबाच्या बिया (निंबोळी) जमा करून वाळवून ठेवाव्यात.
संपर्क – डॉ. खिजर स. बेग, ७३०४१२७८१०, डॉ. अरविंद पांडागळे, ७५८८५८१७१३
(डॉ. बेग कापूस संशोधन केंद्र, नांदेड येथे कापूस विशेषज्ञ, डॉ. पांडागळे सहायक कृषिविद्यावेत्ता तर डॉ. भेदे सहायक कीटकशास्त्रज्ञ आहेत.)